मुंबई : सोमवारी महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली. आता त्याची मतमोजणी गुरुवारी २४ ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी काही राजकीय पक्षांनी ईव्हीएम हॅकिंग करता येऊ नये म्हणून स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्रांवर जॅमर बसवण्याची मागणी केली होती. यावर कुठल्याही केंद्रावर जॅमर बसवला जाणार नाही असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
"काही राजकीय पक्षांनी ईव्हीएम हॅकिंग प्रकरणासाठी स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवण्याची मागणी केली होती. मात्र ईव्हीएम यंत्रे हॅक होऊ शकत नसल्याचे सिद्ध झाले आहे. या यंत्रांना बाह्य संपर्क यंत्रणेद्वारे हाताळता येऊ शकत नाही. त्यामुळे मतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे बलदेव सिंह यांनी यावेळी सांगितले.