चारकोप मतदारसंघात यंदा भाजपची हॅट्ट्रिक?

16 Oct 2019 21:17:00



उत्तर मुंबईतील चारकोप विधानसभा मतदारसंघ सध्या येथील महायुतीचे उमेदवार योगेश सागर यांच्यामुळे चर्चेत आहेत. योगेश सागर हॅटट्रिक करणार का, हाच येथे चर्चेचा मुद्दा आहे. साळसूद व्यक्तिमत्त्व आणि नागरिकांना तात्कळत न ठेवता त्यांच्या कामाबाबत 'होय' अथवा 'नाही' या दोन शब्दांत उत्तरे देणे या स्पष्टवक्तेपणाबाबत ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्याबाबत आदर आहे.

 

एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या चारकोप विधानसभा मतदारसंघात आता भाजपचे 'कमळ' चांगलेच फुलले आहे. २००९ च्या निवडणुकीत सागर यांना विधानसभेसाठी भाजपतर्फे तिकीट मिळाले आणि काँग्रेसचे भरत पारेख यांचा त्यांनी दणदणीत पराभव केला. त्यावेळी योगेश सागर यांना ५८,६८७ मते मिळाली. पारेख दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. २०१४ च्या निवडणुकीत तर मोदी लाट होती. त्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नव्हती. भाजप-शिवसेना म्हणजे 'काँटे की टक्कर' होती. त्यावेळीही योगेश सागर यांनी बाजी मारली. त्यांच्या मतात भरघोस वाढ झाली. त्यांना ९६,०९७ मते मिळाली. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावरून काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर घसरली आणि शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. उमेदवार कोणीही असो. मात्र, योगेश सागर यांनी फडकावलेला भाजपचा झेंडा प्रत्येक वेळी नव्या तेजाने फडकू लागला. 'काँग्रेसमुक्त भारत'ची सुरुवात योगेश सागर यांनी चारकोपमधून केली असे म्हणण्यास हरकत नाही. २००९ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस २०१४ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. २०१९ च्या निवडणुकीत तर त्यांच्याकडे नावाजलेला उमेदवारच नाही.

 

 
 

गेली दहा वर्षे योगेश सागर चारकोपचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून फडणवीस सरकारमध्ये त्यांना गृहनिर्माणचे राज्यमंत्रिपद मिळाले. गुजराती-उत्तर भारतीयांचे प्राबल्य असणाऱ्या या मतदारसंघात चाळी आणि इमारतीत राहणारी मिश्रवस्ती आहे. त्यामुळे येथील मतदारांना त्यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. सध्या तरी त्यांना तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे सागर हॅटट्रिक करतील का, याचे उत्तरही या उमेदवारांचे कर्तृत्व लक्षात घेता मतदारांना मिळाले आहे, असे दिसते. सागर यांच्या विरोधात काळू बुधेलिया (काँग्रेस), मॉरिस बैनी किणी (वबआ), फारूक अब्दुल मन्नान खान (बसपा) यांच्यासह जनार्दन गुप्ता, मोहम्मद इब्राहिम खान, अन्सारी आझाद असे सहा उमेदवार आहेत. मात्र, उमेदवार कसेही असोत, सागर यांनी त्यांच्या प्रचारात कमतरता ठेवलेली नाही. प्रचार फेऱ्या आणि मतदार संपर्कावर त्यांनी भर ठेवलेला दिसत आहे. काँग्रेस, वंचित आघाडी यांच्या उमेदवारांचाही प्रचार चालू आहे. ते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा मतदारांवर कितपत प्रभाव पडेल हे निवडणूक निकालादिवशीच कळेल.

 

- अरविंद सुर्वे

Powered By Sangraha 9.0