- ० तापमानात जवानांनी केले बचावकार्य

10 Jan 2019 17:10:23

 

 
 
 
 
गंगटोक : शून्य अंशाहूनही कमी तापमान असलेल्या वातावरणात लाचूंग घाटामध्ये १५० पर्यंटक अडकले होते. या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याची कामगिरी भारतीय जवानांनी केली आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून जवानांनी हे बचावकार्य केले. यासाठी भारतीय जवानांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 

लाचूंग घाटामध्ये सुमारे १५० पर्यटक अडकून पडल्याची माहिती सिक्कीममधील त्रिशक्ती कॉर्प्सच्या मुख्यालयाला मिळाली होती. त्यानंतर तातडीने त्रिशक्ती कॉर्प्सचे जवान कामाला लागले. लाचूंग घाटात प्रचंड बर्फवृष्टी होत होती. अशा परिस्थितीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता भारतीय जवानांनी या १५० पर्यटकांना घाटातून सुरक्षित बाहेर काढले. या पर्यटकांना ठेवण्यासाठी कोणतेही सुरक्षित स्थळ नव्हते. पर्यटकांसाठी जवानांनी स्वत:च्या बराकी रिकामी केल्या.

 

पर्यटकांकडे खाण्यापिण्यासाठी काहीच नव्हते. हे लक्षात आल्यावर भारतीय जवानांनी स्वत: अर्धपोटी राहून पर्यटकांना जेवण दिले. या बचावकार्या दरम्यान एका महिलेचा हात फॅक्चर झाला होता. तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. अनेक पर्यटकांना चक्कर येत होती. काहींना श्वसनाचा त्रास उद्भवला होता. तर काहींना थंडीताप भरला होता. भारतीय जवानांनी या पर्यटकांवर औषधोपचार करत त्यांची व्यवस्थित सोय केली. भारतीय जवानांनी केलेली ही मदत पाहून पर्यटक अतिशय भावूक झाले. याबद्दल भारतीय जवानांच्या धाडसाचे आणि त्यांनी केलेल्या त्यागाचे कौतुक करण्यात आले. काही दिवसांपूर्वी गंगटोक आणि नथुला मार्गावर अडकलेल्या सुमारे ३ हजार पर्यटकांचीही अशाचप्रकारे भारतीय जवानांनी सुटका केली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0