मुंबईकरांना दिलासा: दुसऱ्या सागरी पुलाचे काम सुरु

05 Sep 2018 15:44:55

 


 
 
 
मुंबई: मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्यासाठी आणखी एक सागरी पूल बनणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील भार हलका करण्यासाठी हा सागरी पूल उपयुक्त ठरणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि रिलायन्स इन्फ्रास्टक्चर यांच्यामध्ये मंगळवारी या प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाला आहे. या पुलाची लांबी १७.१७ किलोमीटर आहे. २ ते ३ तासाचा पल्ला यामुळे अवघ्या १५ मिनिटांमध्ये गाठता येऊ शकेल.
 

पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये बांधकामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ललित जलन यांनी दिली. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि इटलीच्या अस्लादी कंपनी या दोघांनी बांद्रा-वर्सोवा पुलाच्या बांधणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी (एमएसआरडीसी) एक हा करार केला आहे.

 

या प्रकल्पाला पूर्ण होण्यासाठी ५ वर्षाचा कालावधी लागेल, असेही ललित जलन यांनी पत्रकारांना सांगितले. एमएसआरडीसीच्या वांद्रे येथील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात या सागरी पूलच्या उभारणीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. त्या वेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ललित जालान आदी उपस्थित होते.

 

बांद्रा-वर्सोवा समुद्रतळावर पहिल्या दिवशी सुमारे ६० हजार वाहने ये-जा करण्याची अपेक्षा आहे आणि हळूहळू ही संख्या एका वर्षांत १० लाखपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे मोपलवार म्हणाले. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वर्सोवा-अंधेरी, बोरीवली या भागांतील लोकांना दक्षिण मुंबईत येण्यासाठी दोन ते तीन तासांचा वेळ लागतो. मात्र पुलामुळे प्रवास कोंडीमुक्त होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0