रौप्यपदकाचा सुवर्णप्रवास...

25 Aug 2018 14:46:49


 


दंगामस्ती करण्याच्या वयात 240 किमीचा प्रवास करुन आशियाई स्पर्धेत देशाचा झेंडा अटकेपार रोवणारा 15 वर्षांच्या शार्दुलचा सुवर्णमय प्रवास...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

ज्या वयात मुलं शाळेत दंगामस्ती करतात, त्या वयात आपल्याच देशातील काही मुलं देशाचा झेंडा अटकेपार रोवत आहेत. 250 किमीचा रोजचा प्रवास... होय... खरंतर 250 किमी हा आकडा वाचूनच आपले डोळे भिरभिरायला लागतात. पण, वयाच्या सातव्या वर्षापासून रोज अडीचशे किमीचा प्रवास आणि वयाच्या 15व्या वर्षात आपल्या देशासाठी रौप्यपदकाची कमाई, ही कोणत्याही सिनेमाची कहाणी नसून आपल्याच देशातील शार्दुल विहान या नेमबाज चॅम्पियनची आहे. त्याला आणि त्याच्या वडिलांना क्रीडाप्रकारांची भयंकर आवड. आपल्या मुलाने कोणत्या खेळात आपलं नावं कमवावं, असं त्यांना नेहमी वाटायचं. आता भारतात खेळ आणि आवड म्हटलं की, डोळ्यांसमोर क्रिकेट हा एकच खेळ येतो. तसंच वयाच्या सहाव्या वर्षी शार्दुलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली; पण अवघ्या एका वर्षात त्याचा क्रिकेटमधील रस निघून गेला. कारण, त्याला प्रशिक्षक फक्त क्षेत्ररक्षण करायला सांगत असत. मग, शार्दुलने आपला मोर्चा वळवला तो बॅडमिंटनकडे. पण, त्यातही त्याचं मनं रमेना... मग शेवटी आपल्या मुलाने काहीतरी शिकावं म्हणून त्याला नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात दिवाळीच्या सुट्टीत पाठवायचे त्याच्या पालकांनी ठरवले. पण, वय कमी म्हणून त्याला दाखल करुन घेण्यास प्रशिक्षकांनी मनाई केली. शार्दुलचे वडील ऐकायला तयार नाही म्हणून शार्दुलला एक संधी दिली गेली आणि त्याने हातात रायफल घेऊन अगदी अचूक निशाणा लावला आणि त्यानंतर त्याचा नेम कधी चुकलाच नाही. ज्या गोळ्यांच्या आवाजाने आपल्याला भीती वाटते, त्या बुलेटशी शार्दुल वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून खेळायला लागला आणि त्याने सध्या जर्कातात सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत ‘डबल ट्रॅप’ प्रकारात भारतासाठी रौप्यपदक पटकावले.
 

तो आला आणि त्याने जिंकले,’ असा त्याचा प्रवास तर नक्कीच नव्हता. कारण, शार्दुल 15 वर्षांचा असला तरी मेहनत करण्यास तो कधीच घाबरला नाही. उत्तर प्रदेशातील मेरठमधून सुरू झालेला त्याचा प्रवास जर्कातापर्यंत येण्यामागे त्याचे वडील आणि काकांचा मोलाचा वाटा आहे. मेरठमध्ये नेमबाजी प्रशिक्षणाच्या योग्य सोयी नसल्यामुळे त्याला दररोज मेरठ ते दिल्ली असा 240 किमींचा प्रवास रोज करावा लागत होता. त्याची दिनचर्या पाहून हा खरंच 15 वर्षांचा आहे का? असाच प्रश्न पडतो. रोज पहाटे 4 वाजता उठून, दिल्ली-मेरठ हा प्रवास आणि मग आठ तास सलग सराव करायचा आणि फावल्या वेळेत शाळेचा अभ्यास. “मला चॅम्पियन बनायचं आहे,” हे जणू शार्दुलने आपल्या मनात कोरलचं होतं. आता त्याचा हा सगळा प्रवास वाचून शार्दुल ‘स्टार चॅम्पियन’ झाला आहेच, पण तो एका दिवसात ‘चॅम्पियन’ झाला नाही हे नक्की. त्याची मेहनत आणि आपल्या खेळाप्रतीची निष्ठा पाहून त्याच्या स्वप्नांवर असलेले त्याचे निस्सीम प्रेम स्पष्टपणे जाणवते. तो आपल्या बाबांना नेहमी म्हणायचा की, “मला खेळात खूप पुढे जायचं आहे आणि छोट्या शहरातील मुलांसाठी आशेचा किरण बनायचं आहे.” एवढ्या लहान वयात शार्दुलची समज ही त्याला नक्की खूप दूरवर घेऊन जाईल. शार्दुल त्याच्या विजयाचे श्रेय आपले वडील आणि काकांना देतो. मेरठ-दिल्ली या त्याच्या प्रवासात त्याच्या वडिलांपेक्षा त्याचे काका त्याच्या जास्त जवळ असायचे. शार्दुलच्या या मेहनीतीची दखल माजी नेमबाज आणि केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही घेतली.

 

स्वप्नांना वय नसतं म्हणतात ना, ते खरंच आहे. आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळवूनही शार्दुल निराश होता. कारण, त्याने आपल्या वडिलांना आणि प्रशिक्षकांना सुवर्णपदक जिंकून येईन, असे सांगितले होते. शेवटच्या क्षणी केवळ एका गुणाने शार्दुलचे सुवर्णपदक हुकले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विहान सुरुवातीपासून आघाडीवर होता. पण, जेव्हा फक्त तीन स्पर्धक उरले, तेव्हा विहानला दक्षिण कोरियाच्या शिनने कडवे आव्हान दिले. सुवर्णपदकासाठी जेव्हा स्पर्धा सुरू झाली, तेव्हा शिननने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि ती कायम ठेवली. यावेळी विहानकडून झालेल्या चुकांचा फटका बसला आणि त्याला अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, तो यावर थांबणारा नाही. आता त्याचं मुख्य लक्ष आहे, ते येणार्‍या ‘ज्युनिअर डबल ट्रॅप स्पर्धा’ आणि अर्थातच ऑलिम्पिककडे. ऑलिम्पिक स्पर्धेत त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळेलच, पण त्याच्या या रौप्यपदकापर्यंतचा प्रवास मात्र ‘सुवर्णमय’ होता, एवढं मात्र नक्की.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0