अमेरिकेच्या 'त्या' पावलाचे भारताकडून स्वागत

02 Aug 2018 08:15:29


नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासंबंधीच्या अमेरिकेच्या निर्णयाचे भारत सरकारकडून स्वागत करण्यात आले आहे. अमेरिकेने घेतलेला निर्णय हा अत्यंत योग्य असून यामुळे भारत आणि अमेरिका यांच्या दहशतवादीविरोधी भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

'अमेरिकेने उचलले पाऊल हे अत्यंत स्तुत्य असे असून यामुळे भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला अधिक बळ मिळाली आहे, असे मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेने हे पाऊल उचलल्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या मंगळवारी अमेरिकेने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अब्दुल रेहमान अल-दाखिल याच्यासह अन्य दोघाजणांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. १९९४ ते २००२ दरम्यान भारतात आणि विशेषतः काश्मिरात झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये अब्दुलचा हात असल्याचे पुरावे अमेरिकेला मिळाले होते. त्यानुसार अमेरिकेने यावर कारवाई करत अब्दुल आणि अन्य दोघाजणांना जागतिक दहशतवाद्यांच्या यादीमध्ये सामील केले आहे.
Powered By Sangraha 9.0