विनोद निंद्य आहे किंवा विनोद करणे वाईट आहे, असे समर्थांनी कुठेही म्हटलेले नाही. उन्मत्त माणसाला छंद आवडतात. तामसी माणसाला स्वस्थ बसवत नाही. तो सतत कुलंगड्या करीत असतो. त्याप्रमाणे टवाळ माणसाला येता जाता पांचट विनोद करणे आवडते, हे समर्थांना सांगायचे आहे.
जो येता जाता पोरकट, पांचट, पाचकळ विनोद करतो आणि टिंगल टवाळी करून हीन दर्जाचा आनंद मिळवतो, तसेच तो विकृत आनंद इतरांनाही देत असतो, अशा माणसाला ‘टवाळ’ म्हणता येईल. वरील विधान ज्या ओळीत आले आहे, ती दासबोधातील ओवी अशी आहे
टवाळा आवडे विनोद ।
उन्मत्तास नाना छंद ।
तामसास अप्रमाद ।
गोड वाटे ॥ (दा. 7.9.51)
मूर्ख होये नादलुब्धी ।
निंदक पाहे उणी संधी ।
पापी पाहे पापबुद्धी ।
लाऊन अंगी ॥ (52)
दासबोधातील श्रवण निरूपण (7.9) समासात कोणाला काय आवडते, कशात गोडी वाटते यासंबंधी विवरण आले आहे. टवाळांना आणि वात्रटांना विनोद आवडतो हे खरे आहे. पण, विनोद निंद्य आहे किंवा विनोद करणे वाईट आहे, असे समर्थांनी कुठेही म्हटलेले नाही. उन्मत्त माणसाला छंद आवडतात. तामसी माणसाला स्वस्थ बसवत नाही. तो सतत कुलंगड्या करीत असतो. त्याप्रमाणे टवाळ माणसाला येता जाता पांचट विनोद करणे आवडते, हे समर्थांना सांगायचे आहे. ‘टवाळा आवडे विनोद’ याचा अर्थ ज्याला विनोद आवडतो, तो टवाळच असतो असा कोणी काढू नये. तार्किकदृष्ट्या ते चुकीचे आहे. समर्थांचे एकंदर व्यक्तिमत्त्व पाहता ते गंभीर प्रवृत्तीचे होते असे वाटत नाही. या उलट ते खेळकर, आनंदी व निकोप वृत्तीचे, परंतु शिस्तप्रिय होते. त्यांच्या मिश्कील स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या अनेक घटना त्यांच्या उपलब्ध चरित्रग्रंथांतून काढून दाखवता येतील. वयाच्या बाराव्या वर्षी रामदास लग्नमंडपातून पळाले. नंतर २४ वर्षांनी वयाच्या ३६ व्या वर्षी ते आईला भेटायला जांब गावी आले. आईने त्यांना ओळखले, पण तिच्या मनात आले की, हा नारायण २४ वर्षे घराबाहेर राहिला म्हणजे त्याला काहीतरी भूतबाधा झाली असावी. त्याकाळी तसा समज होत असे. त्यामुळे आई म्हणाली, “नारायणा, तुला चांगल्याच मोठ्या भूताने पछाडले होते.” त्यावर रामदास स्वामी हसले व विनोदाने आईला म्हणाले, “आई, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. ते महाभूत आहे. त्यानेच मला वेड लावले आहे.” त्यावेळी त्यांनी ‘हेचि भूत गे माय’ हे कवन आईला ऐकवले.
होते वैकुंठीचे कोनी ।
शिरले आयोद्धा भुवनी ।
लागे कौसल्येचे स्तनी ।
तेचि भूत गे माय॥
सर्व भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय।
रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माय॥
हसत खेळत आईला रामरायाची करून दिलेली ओळख गंभीर प्रकृतीच्या माणसाला जमणार नाही. आणखी एक मजेशीर प्रसंग पाहा. मसूरला असताना रामनवमीच्या मिरवणुकीत झेंडा नेताना रस्त्यात काही झाडांच्या फांद्या आडव्या येत होत्या. झेंडा तर वाकवायचा नाही. फांद्या तोडण्याची परवानगी समर्थांनी अगोदरच घेऊन ठेवली होती. मार्गात एक फांदी विहिरीवरून पुढे रस्त्यावर आली होती. ती फांदी तोडण्यासाठी तरुण मुले आपापसात भांडू लागली. तो वाद समर्थांनी विनोदी पद्धतीने सोडवला. समर्थ म्हणाले, “ही फांदी तोडणाऱ्या ने शेंड्याकडे बसून फांदी तोडली पाहिजे.” सर्व मुले मागे हटली. उलटे बसून फांदी तोडायची, तर फांदीबरोबर आपणही विहिरीत पडणार. तरीही अंबाजी पुढे आला. फांदी तोडल्यावर तो फांदीबरोबर विहिरीत पडला. समर्थांनी त्याला बाहेर काढले. ते म्हणाले, “गुरूआज्ञा प्रमाण मानून परिणामांची काळजी न करता तू काम केलेस. तुझे कल्याण झाले. आजपासून तुझे नाव कल्याण.” हेच पुढे समर्थांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी होत. असे कितीतरी विनोदी प्रसंग समर्थचरित्रातून काढून दाखवता येतील. त्यावर आमचे विद्वान प्राध्यापक मित्र म्हणतील, “हे खरे कशावरून? या भाकडकथा असू शकतात.” तेव्हा समर्थांनी विनोदाबद्दल काय लिहिले आहे, ते पाहणे संयुक्तिक ठरेल. निखळ विनोदाने खिलाडूवृत्ती वाढते. कधी कधी मनमोकळेपणे हसणे, हे उत्तम टॉनिक आहे. तरीदेखील विनोदाचा अती वापर माणसाला पोरकटपणाकडे किंवा पांचटपणाकडे नेतो. ज्या विनोदाचा वापर टवाळखोरीसाठी होतो तो रजोगुण समजावा. या रजोगुणी हास्य विनोदाचे पर्यवसान टिंगल, टवाळी अशा प्रकारात होते.
टवाळी ढवाळी निंदा । सांगणे घडे वेवादा।
हास्य विनोद करी सर्वदा । तो रजोगुण ॥ (दा. 2.5.25)
येता जाता विनोद करण्याच्या सवयीमुळे हसता हसता चिडण्याचा प्रसंग येतो. त्याचे पर्यवसान भांडणातून कुठल्या थराला जाईल ते सांगता येत नाही, अशांना मूर्खच म्हणायला पाहिजे.
पत्य राखो नेणे कदा ।
विनोद करी सर्वदा।
हासता खिजे पेटे द्वंद्वा । तो येक मूर्ख ॥ (दा. 2.1.48)
‘कीर्तन भजन निरूपण’ या समासात प्रसंगानुरूप वीररसाबरोबर विनोदही करीत जावा, असे समर्थांनी शिष्यांना सांगितले आहे.
पदे दोहडे श्लोक प्रबंद ।
धाटी मुद्रा अनेक छंद ।
वीर भाटीव विनोद ।
प्रसंगे करावे ॥ (दा. 4.2.14)
मूर्खांची लक्षणे, पढतमूर्खांची लक्षणे, निद्रा निरूपण या समासात कितीतरी विनोद आहेत. समर्थांनी विनोदाचे अनेक प्रकार हाताळले. समर्थ भाषाप्रभू होते. तेव्हा शाब्दिक कोट्या करणे त्यांना जमले असते. पण, दासबोधात फक्त एका ठिकाणी शाब्दिक कोटी आढळली. ‘देव’ म्हणजे ‘मला काहीतरी द्या’ अशी ती आहे.
जनाचा लालची स्वभाव ।
आरंभीच म्हणती देव ।
म्हणिजे मला कांहीं देव ।
ऐसी वासना ॥ (दा. 18.7.1)
आता विसंगतीतून विनोद पाहा.
काखे घेऊनिया दारा ।
म्हणजे मज संन्यासी करा ।
तैसा विषई सैरावैरा ।
ज्ञान बडबडी ॥ (दा. 5.3.66)
उपरोध हेही विनोदाचे अस्त्र आहे.
उपरोधाचा वापर पाहा.
शिष्यास न लाविती साधन ।
न करविती इंद्रियें दमन ।
ऐसे गुरू अडल्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ॥ (दा. 5.2.21)
असाच एक सुंदर उपरोधिक प्रसंग दासबोधात आहे.
कोणीयेक ध्यानस्त बैसला ।
कोणीयेक सिकवी त्याला ।
मुकुट काढूनि माळ घाला । म्हणिजे बरे ॥ (दा. 14.8.43)
प्रसंग असा आहे की, एक अतिकंजुष मनुष्य ध्यान लावून मानसपूजा करीत आहे. मानसपूजेत प्रत्यक्षात काही साहित्य लागत नाही. कल्पनेत जे जे उत्तम त्याची कल्पना करून देवास अर्पण करायचे असते. परंतु, त्या कंजुष माणसाने माळ कल्पिली ती छोटी. आखूड माळ देवाच्या गळ्यात घालता येईना. तेव्हा त्याने गुरूला विचारले. गुरूही त्यातलाच. त्याने सांगितले, “साधा उपाय आहे. देवाच्या डोक्यावरचा मुकुट काढ. म्हणजे माळ घालता येईल.” यावर समर्थ म्हणतात, “जेथे मनाचा कंजुषपणा आणि कल्पनेचा दुष्काळ तेथे कोण काय करणार? सांगणारा आणि ऐकणारा दोघेही मूर्खच.”
वरील विवेचनावरून हे स्पष्ट होईल की, समर्थांना विनोद आवडत होता. ‘टवाळा आवडे विनोद’ असे जे रामदास म्हणाले ते अधम विनोदाबद्दल होते. याच विवेचनावर आधारित पत्र मी वसंत कानेटकरांना लिहिले होते आणि त्यांना ते विचार मान्य झाले होते. समर्थांच्या विनोदाबद्दल त्यांचा गैरसमज दूर झाला होता.
- सुरेश जाखडी