बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजवर कारवाई

15 Aug 2018 20:58:57




१४ लाखांचे ऐवज जप्त

ठाणे: मुंब्रा भागातील कादर पॅलेस इमारतीत बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज चालविणार्‍या तीन जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाखांचे ऐवज जप्त करण्यात आले आहे. यात सीमकार्ड, वायफाय राऊटर, लॅपटॉप आणि अँटिना केबल यांचा समावेश आहे. तसेच, आरोपींकडे पाच जिवंत काडतुसेही सापडली आहेत.

 

या टेलिफोन एक्स्चेंजच्या माध्यमातून परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय दूरध्वनी तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातून येत असल्याचे भासविले जात होते. या दूरध्वनीची डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन विभागाकडे नोंद होत नसल्यामुळे शासनाचा महसूल बुडविण्यात येत असल्याची बाब तपासात समोर आली आहे. तसेच या दूरध्वनीचा वापर देशविघातक तसेच अन्य गैरकृत्यांसाठी करण्यात आला आहे का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. शहजाद निसार शेख, शकील अहमद शेख, मोहमद हलीम खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आझमगडचे रहिवासी असून ते मुंब्य्रातील कादर पॅलेस भागातील इमारतीमध्ये राहतात.

 

सोमवारी रात्री तिन्ही घरांवर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत चौघांच्या घरातून एकूण १९ स्लीम स्लॉट बॉक्स, ३७ वायफाय राऊटर, २९१ व्होडाफोन आणि एअरटेलचे सीमकार्ड असा तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
Powered By Sangraha 9.0