बुलेट ट्रेनसाठी सर्वतोपरी सहकार्य :आयुक्त

20 Jul 2018 20:37:52



ठाणे: शहरातील प्रस्तावित बुलेट ट्रेनचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जापनीज शिष्टमंडळास दिली.
 

शुक्रवारी सकाळी जपानचे शुन्तारो कवाहरा यांच्या नेतृत्वाखाली जपान इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सीचे मिहीर सोटी, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हाय स्पीड रेल निगम लि.चे प्रकल्प व्यवस्थापक आर. पी. सिंह यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन ठाणे शहर हद्दीत म्हातार्डी येथे प्रस्तावित बुलेट ट्रेनविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच या प्रकल्पाचे सादरीकरण केले.

 

केंद्र शासनाच्यावतीने मुंबई उपनगर ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे. त्यातील 4 स्थानके महाराष्ट्रात येतात. यामध्ये मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर आदी चार स्थानकांचा समावेश आहे. ठाणे शहरामध्ये म्हातार्डी येथे हे स्थानक प्रस्तावित आहे. या स्थानकाचा आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विकास योजनेमध्ये जे जे बदल करणे आवश्यक आहेत, ते करण्याची ग्वाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. याबाबत शहर व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर आणि शहर विकास विभागाचे अधिकारी यांनी अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी दिले.

Powered By Sangraha 9.0