एक देश, एक निवडणुकीला रजनीकांतचे समर्थन

15 Jul 2018 23:01:28



चेन्नई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारतर्फे प्रस्तावित ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणाला सध्या सर्व स्तरांतून तसेच, कित्येक राजकीय पक्षांकडूनही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसत आहे. नुकताच दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेते रजनीकांत यांनीही एक देश, एक निवडणूक धोरणाला आपला पाठिंबा जाहीर केला.

 

रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड यांनी नुकताच तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री व अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय पोकळी निर्माण झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अफाट लोकप्रियता असणारे रजनीकांत यांचा राज्याच्या राजकारणातील प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. तामिळनाडूत रविवारी एका कार्यक्रमात बोलताना रजनीकांत यांनी ”पंतप्रधान मोदी यांच्या ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणामुळे पैसा आणि वेळ अशा दोन्ही गोष्टींची बचत होईल,” असे मत व्यक्त केले. ही संकल्पना अतिशय वेगळी असून, त्यामुळे पैसा आणि वेळेची पूर्णपणे बचत होईल. तेव्हा सर्वच पक्षांनी या मोहिमेत सहभागी होत एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

नुकताच रालोआतील घटकपक्ष संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एक देश, एक निवडणूक धोरणाला पाठिंबा दर्शवला होता. तसेच, भाजपविरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षानेही या धोरणाला पाठिंबा दिला आहे. यानंतर आता दक्षिणेतून रजनीकांत यांच्यासारख्या वलयांकित व्यक्तिमत्त्वानेही आपले समर्थन दिल्यामुळे भाजपचा एक देश, एक निवडणूक प्रस्ताव सार्वत्रिक मान्यतेकडे वाटचाल करताना दिसत आहे. देशभरात विविध राज्यांत टप्प्याटप्प्याने होणार्‍या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांऐवजी देशात एकदाच निवडणुका व्हाव्यात, अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव आहे.

Powered By Sangraha 9.0