ग्राहक मंचचा महावितरणला दणका!

13 Jul 2018 11:17:21

 
 
जळगाव :
शहरातील भवानीपेठेत राहणारे दिलीपकुमार जैन यांना महावितरणने दिलेले अवाजवी वीज बील अर्ज देवूनही कमी न करता विद्युत पुरवठा खंडीत केला होता. महावितरणविरूध्द जैन यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाखल केलेल्या तक्रारीचा निकाल मंचने देताना महावितरणने वाढीव बील रद्द करून विद्युत नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या वीज दराप्रमाणे वीज बिलाची आकारणी करावी आणि आर्थिक त्रास व तक्रार खर्चापोटी १५ हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहे.
 
 
दिलीपकुमार हिराचंद ऍन्ड कंपनीचे दिलीपकुमार जैन यांचे भवानीपेठेत घर आहे. फेब्रुवारी २०१६ ते मे २०१६ दरम्यान त्यांचा दरमहा वीजवापर ८० ते १५० युनिट होता. त्यांनी नियमित बिले भरलेली असतानाही जून २०१६ नंतर देण्यात आलेल्या बिलांमध्ये सरासरी दरमहा वापर २३९ ते ५०० युनिट वापर दाखविण्यात आला होता. जैन यांना ४ मार्च २०१८ रोजी बजावण्यात आलेल्या बिलामध्ये थकबाकीसह ३७ हजार ३०० रूपयांचे अवाजवी बिल देण्यात आले होते.
 
 
वाढीव बील कमी करून मिळावे, अंदाजे टाकण्यात आलेले युनिट न दाखविता रिडींगप्रमाणे वीज बिले द्यावीत यासाठी जैन यांनी दोनवेळा महावितरणला विनंती अर्ज देखील दिले होते. दोन्ही अर्जांना उत्तर न देता महावितरणने १५ मार्च रोजी त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत केला होता.
 
वाढीव वीज बील महावितरणनने कमी न केल्याने दिलीपकुमार जैन यांनी ऍड.हेमंत भंगाळे यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांविरूध्द जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली होती. महावितरणतर्फे ग्राहक मंचाकडे अवाजवी बिलाबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. तसेच प्रति युनीटसाठी आकारण्यात आलेला दर देखील राज्य विद्युत नियामक आयोगाने निर्धारीत केलेल्या दराप्रमाणे नसल्याचे आढळून आले.
Powered By Sangraha 9.0