व्यंगचित्रकार वैज्ञानिक

08 Jun 2018 20:20:13

 

व्यंगचित्रांमधून विज्ञान शिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम केला आहे डॉ. विनीता भरत या एका भारतीय स्त्रीने विनीताताईंची व्यंगचित्रं पाहताना अक्षरश: भारावून जायला होतं.
 

'कट्यार काळजात घुसली’ या नाटकात एक सुंदर वाक्य आहे. 'विद्या ही बाहेरून आत येते, तर कला ही आतून बाहेर पडते.' संगीत, नृत्य यांसारखीच माणसाला मोहित करणारी कला म्हणजे चित्रकला. चित्रकलेमध्येसुद्धा व्यंगचित्रकला ही आणखी आकर्षक वाटते. व्यंगचित्रं माणसाला नुसती सौंदर्याचा आनंदच देत नाहीत, तर माणसाला हसवतात. तिथे व्यंगचित्रकाराच्या विनोदबुद्धीचा कस लागतो. आर. के. लक्ष्मण यांच्यासहित बहुतांश व्यंगचित्रकार हे राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवर उपरोधिक भाष्य करतात. हल्ली जवळ जवळ सगळ्याच दैनिकांमध्ये वा मासिकांमध्ये व्यंगचित्रांमधून राजकारण वा कौटुंबिक विषयांवर खोचक भाष्य केलेलं दिसतं. व्यंगचित्रांमधून विज्ञान शिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम केलाय डॉ. विनीता भरत या एका भारतीय स्त्रीने विज्ञानावरचं प्रेम आणि व्यंगचित्रकला यांचा सुरेख संगम म्हणजे डॉ. विनीता भरत. 'फझी सिनॅप्स’ या आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून त्या स्वत:ची विज्ञानविषयक व्यंगचित्रं प्रसिद्ध करतात.

 

डॉ. विनीता भरत या न्युरोसायंटिस्ट आहेत. २०११ साली दिल्ली विद्यापीठातून शास्त्र शाखेची पदवी मिळवलेल्या विनीताताई सध्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल शिक्षण घेत आहेत. जर्मनीमधील 'इंटरनॅशनल मॅक्स प्लँक स्कूल’ येथे पीएचडी करत असताना त्यांना वैज्ञानिक व्यंगचित्रांची कल्पना सुचली आणि त्यांनी 'फझी सिनॅप्स’ ही स्वत:ची वेबसाईट सुरू केली. डॉ. विनीता यांची व्यंगचित्रं जगप्रसिद्ध झाली आहेत. व्यंगचित्रांचा वापर करून, विज्ञानातल्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या करून मांडण्याचा त्यांचा प्रयोग एकमेवाद्वितीय ठरला आहे. व्यंगचित्रं चटकन लक्ष वेधून घेतात. विज्ञानाची आवड निर्माण होऊन, विज्ञान सखोल अभ्यासण्यासाठी आवश्यक असते ती जिज्ञासा. विनीताताईंची व्यंगचित्रं ही जिज्ञासा निर्माण करण्याचं काम पुरेपूर करतात. वेबसाईट सुरू करण्यापूर्वी विनीताताई प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन, लहान मुलांना स्वत: काढलेली व्यंगचित्रे आणि स्वत: तयार केलेले अॅयनिमेशन व्हिडिओज दाखवून, मुलांना विज्ञानाची गोडी लावायचं काम करायच्या. हे काम त्या अजूनही करतात. २०१७ साली त्यांनी स्वत:ची वेबसाईट सुरू करून, आपल्या कलेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिलं. 'फझी सिनॅप्स’ या वेबसाईटच्या नावाला एक विशिष्ट अर्थ आहे. 'सिनॅप्स’हा जीवशास्त्रातला शब्द असून 'दोन न्यूरॉन्सची एकमेकांशी जोडणी’ असा त्याचा अर्थ होतो. समाज आणि विज्ञान या दोन 'न्यूरॉन्स’ना जोडण्याचं काम करणारी म्हणून त्यांनी या वेबसाईटला 'फझी सिनॅप्स’ हे नाव दिलं आहे. या वेबसाईटला आपण भेट दिली, तर विज्ञान गंमतीशीर भाषेत समजावून देणारी व्यंगचित्रं आणि चित्रफीती आपल्याला पाहायला मिळतील. ते पाहून आपल्याला 'वैज्ञानिक कलाकार’ असलेल्या विनीताताईंंच्या निर्मितिशीलतेचा प्रत्यय येतो. त्या म्हणतात, 'विज्ञान हा लहानपणापासून माझ्या आवडीचा विषय होता. मात्र विज्ञान हा विषय पाठ्यपुस्तकात बंदिस्त होता कामा नये. पाठ्यपुस्तक वाचनातून मुलांना विज्ञानाची गोडी लागणं अशक्य आहे. व्यंगचित्रं हे विज्ञानाची गोडी लावण्याचं साधन होऊ शकतं का याचा प्रयोग मी करून पाहिला आणि त्याला उत्तरोत्तर यश मिळत गेलं. विज्ञान आणि कला या दोन टोकाच्या गोष्टी वाटतात, पण या दोघांचा सुरेख संगमही साधता येऊ शकतो हे मला आता उमगलं आहे. माझ्या या कामाला एक निश्चित अशी दिशा देण्यात माझ्या मित्रमंडळींचा खूप मोठा वाटा आहे.'

 

विनीताताईंची व्यंगचित्रं पाहताना अक्षरश: भारावून जायला होतं. त्यांची बरीचशी व्यंगचित्रं ही जीवशास्त्रविषयक, विशेषत: मेंदुरचनाशास्त्रविषयक आहेत. मेंदूतल्या पेशी एकमेकांशी बोलत आहेत, अशी कल्पना करून, त्यांनी मेंदूतल्या पेशींची रचना, त्यांची कार्ये गंमतीशीर भाषेत समजावून दिली आहेत. 'फझी सिनॅप्स’ ही वेबसाईट केवळ स्वत:पुरतीच मर्यादित न ठेवता, विज्ञानविषय रंजक करू इच्छिणाऱ्या सर्व कलाकारांसाठी ते एक मोठं जागतिक व्यासपीठ निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. या आपल्या कामाव्यतिरिक्त त्या 'करियर सपोर्ट ग्रुप’, 'स्टॅनफोर्ड मेडिसिन स्कोप ब्लॉग’ अशा अनेक संस्थांबरोबर काम करतात. गेली सात वर्षे त्या जर्मनीमध्ये कार्यरत आहेत. कुठलाही कलाकार हा श्रेष्ठच असतो. परंतु आपल्या कलेचा उपयोग माणूस कशासाठी करतो यालाही तितकंच महत्त्व असतं. आपल्या कलेचा उपयोग विज्ञानाच्या प्रसारासाठी करून, कला आणि विज्ञान दोन्ही परस्परपूरकतेने सार्थकी लावणारी डॉ. विनीता भारत यांच्यासारखी माणसं विरळाच.

Powered By Sangraha 9.0