जीएसटी दिनानिमित्त ठाण्यात कार्यक्रमांचे आयोजन

30 Jun 2018 18:52:25



 

कराविषयीचे गैरसमज दूर करणार

 

ठाणे : वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी होऊन आता एक वर्ष पूर्ण होत असून १ जुलै रोजी वस्तू व सेवाकर विभाग ठाणे यांच्या वतीने सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे परिक्षेत्राचे अपर राज्यकर आयुक्त सुमेरकुमार काळे यांनी ही माहिती दिली असून वस्तू व सेवा कर कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे पश्चिम येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

 

वस्तू व सेवा कर हा कायदा अंमलात आल्यानंतर राज्याच्या तिजोरीत २८.०७ टक्क्यांची वृद्धी झाली आहे आणि त्यामुळेच प्रतिकात्मकरित्या काही करदात्यांचा दि. १ जुलै रोजी सन्मानही करण्यात येणारा आहे, अशी माहिती समेळकुमार काळे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला राज्य कर सहआयुक्त ठाणे शिवाजीराव केनवडेकर हेदेखील उपस्थित राहणार असून विविध विषयांवर काही मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

 

जनतेला वस्तुस्थितीदर्शक माहिती देणार

 

वस्तू व सेवा कराविषयी अधिक विस्तृत आणि सर्वसामान्याना कळेल अशा स्वरूपात माहिती द्यावी जेणेकरून या कराविषयी जनतेत सकारात्मकता निर्माण होईल यादृष्टीने विविध कार्यक्रम ठाणे जिल्ह्यात आयोजित केले जातील असे सुमेरकुमार काळे यांनी सांगितले. नव्या करपद्धती, अनुपालनाच्या नवीन पद्धती आत्मसात करित करदात्यांशी योग्य समन्वय ठेवत कर संकलनात राज्याने आपले स्थान अग्रस्थानी ठेवण्यात यश मिळविले आहे. कामाच्या वाटणीनुसार केंद्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाचाही यामध्ये मोलाचा सहभाग आहे, असल्याचेही ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0