बुलडाण्यात सामाजिक न्याय दिन साजरा

    27-Jun-2018
Total Views |

विविध योजनांच्या लाभार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
समता दिंडीचे आयोजन

 
 
 
बुलडाणा : राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. सकाळी जिल्हा परिषद येथून समता दिंडीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला व्यासपीठावर आमदार हर्षवर्धन सपकाळ, समाज कल्याण सभापती डॉ. गोपाल गव्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, शिक्षणाधिकारी वराडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी उपस्थित होते.
 
 
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ते म्हणाले, समाजाला दिशा देण्यासाठी शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य समाजासाठी महत्वाचे होते. राजर्षी शाहू महाराज यांनी सर्वप्रथम पाटबंधारे धोरण आणले. त्यांनी सामाजिक विषमता दूर करून वंचित घटकाला विकासाच्या मुख प्रवाहात आणले. त्यामुळे त्यांच्या कार्याची अजूनही आठवण होते. प्रास्ताविक उपायुक्त वृषाली शिंदे यांनी केले.
 
 
कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाहीर डी. आर इंगळे यांच्या चमूने स्वागत गीत सादर केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागातंर्गत कार्यरत विविध महामंडळे, योजनांचे लाभार्थी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त विद्यार्थी यांना धनादेश व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.