कुलगाममध्ये लष्कराची मोठी कारवाई
कुलगाम : लष्कर-ए-तोयबाचे कुख्यात अतिरेकी शाकोर दार आणि अबू बकर या दोघांचाही भारतीय लष्कराने आज खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे या दोघांचाही लष्कराने खात्मा केला असून यांच्या अन्य एका साथीदाराचा लष्कराकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान भारतीय लष्कराची ही अत्यंत मोठी कारवाई मानली जात असून राज्यात झालेल्या अनेक अतिरेकी कारवायांमध्ये या दोघांचा देखील हात होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांचा लष्कराला शोध होते. परंतु अखेर आज दोघांचाही लष्कराने खात्मा केला आहे.
कुपवाडा जिल्ह्यातील चद्दर येथे लष्कराने आज ही कारवाई केली आहे. चद्दर येथील एका घरामध्ये लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर लष्कराने यासंपूर्ण परिसराला वेढा टाकून दहशतवाद्यांची सर्व बाजूनी नाकेबंदी केली होती. यानंतर दहशतवाद्यांनी देखील जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून लष्कराने देखील जोरदार उलट कारवाई करत, दार आणि बकर या दोघांचा खात्मा केला. दरम्यान यातील एक दहशतवादी मात्र अजून लष्कराच्या हाती लागला नसून त्याच्या शोधासाठी म्हणून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.
राज्यात राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतरच लष्कराची ही आणखी एक मोठी कारवाई आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये भारतीय लष्कराने लष्कर-तोयबाच्या अतिरेक्यांविरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे. लष्कराच्या या कारवाईवर तोयबाच्या म्होरक्याने देखील आज संतप्त प्रतिक्रिया दिली असून भारतीय लष्कर काश्मीरच्या अस्मितेविरोधात कारवाई करत असल्याचे म्हटले आहे. तसेच लष्कर जाणूनबुजून सामान्य जनतेलाच त्रास देत असल्याचेही तोयबाने म्हटले आहे.