अभ्यंगं आचरेत् नित्यम् भाग -२

22 Jun 2018 16:42:38



 

काळाची वाढती गरज आहे अभ्यंग. म्हणूनच मागील लेखात आपण अभ्यंगाची पद्धत जाणून घेतली. आज अभ्यंगामुळे होणारे विविध फायदे या लेखातून विस्तृतपणे जाणून घेऊया.


अभ्यंगाचे मुख्य फायदे आपण मागील लेखात वाचले (वातावर मात, control आणि वार्धक्यावरचे रोक - delayed ageing process) आता पुढील फायदे

शरीराची अभ्यंगाने पुष्टी होते. आयुर्वेदात अभ्यंगाचा फायदा सांगताना असे सांगितले आहे की, जो कृश व्यक्ती आहे तो स्वस्थ होईल आणि त्याचबरोबर जो लठ्ठ व्यक्ती असेल, त्याची शरीरही सुदृढ होईल. म्हणजेच, शरीरयष्टी प्रभावी करण्यासाठी आणि राखण्यासाठी अभ्यंगाचा फायदा होतो. याचबरोबर शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. म्हणजे फक्त दिसायला आकर्षक शरीर मिळत नाही, तर आरोग्यदायी शरीरही तयार होते. असे सक्षम शरीर असल्यावर जंतुसंसर्गापासूनही वाचण्याची ताकद बळावते. जंतुसंसर्गापासून प्रतिकारशक्ती वाढते. म्हणूनच लहान बदलांमध्ये ज्यांच्यात नियमित अभ्यंग केले जाते, ते कमी आजारी पडतात. त्यांना वारंवार दवाखान्यात न्यावे लागत नाही.

 
श्रमाने शांत झालेले शरीर शांत करायची क्षमता अभ्यंगात आहे. खूप चाल झाली, पाय दुखत असल्यास मॉलिश केल्यावर बरे वाटते. झोाप चांगली लागते. तसेच अति कष्टाचे श्रमाचे काम जे करतात., त्यांच्या शरीरात ही झीज भरून काढण्यासाठी, लवचिकता टिकविण्यासाठी, थकवा घालविण्यासाठी अभ्यंगाचा उपयोग होतो. शरीराची ताकद टिकविण्यासाठीही अभ्यंगाचा फायदा होतो. पण, वरील फायदे नित्य उपक्रमात अभ्यंग जे आचरतात, त्यांच्यातच दृश्यमान होतात.
 
जेवढे शारीरिक फायदे अभ्यंगाचे आहेत, तेवढाच सकारात्मक फायदा मानसिक स्वास्थ्यावरही होतो. त्वचा हे पंचज्ञानेद्रियांतील एक इंद्रिय आहे. त्वचा सर्व शरीर व्यापी आहे. शरीरावर असा एकही भाग नाही, जेथे त्वचेचे आच्छादन नाही. संपूर्ण त्वचा ही रोमयुक्त (with pores) आहे. त्यामुळे अभ्यंगाच्या वेळेस तेल जे लावले जाते, ते आत शिरते व ज्ञानेंद्रिय असल्यामुळे या स्नेहाचा भाव मनापर्यंत पोहोचतो. आपल्या दैनंदिन जीवनात आपण पदोपदी याची प्रचिती घेतो. अंग मॉलिश करुन घेताना झोप लागते. शांत वाटते. डोक्यावर मसाज केल्यावर शीत वाटते, हलके वाटते. तळव्यांना तेल लावले की झोप शांत लागते. जसे जसे शरीरात तेल मुरत जाते, जिरत जाते स्नायूंमधील (spasm) कमी तर होतोच, पण मनातील घालमेल अस्वस्थताही कमी होत जाते. शांतता अनुभवली जाते (sense of peace) म्हणून परीक्षेच्या दिवसांमध्ये अति ताणतणाव असलेल्या अवस्थेमध्ये अभ्यंग अवश्य करावा. 
 
अभ्यंगामुळे दृष्टी निर्मळ होते. नजर सुधारते. अंगाला तेल लावले तर शरीरातील रक्त संवहन सुधारते. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर उत्सर्जित करण्यास अभ्यंगाची मदत होते. शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते. डोळे हे तेज महाभूताचे प्रतीक आहेत. त्यातील उष्णता नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे, जे अभ्यंगामुळे होते आणि दृष्टी स्वच्छ होते व राखली जाते. 
 
त्वचेवर अभ्यंगाचा परिणाम चटकन जाणवतो. त्वचेवर चकाकी येते, त्वचा मऊ मुलायम होते, त्वचा उजळते, कांती सुधारते आणि उत्तम वर्ण प्राप्त होतो. त्वचा लहान मुलांसारखी तुळतुळीत आणि सुकुमार (नाजूक) होते. पण, सुकुमार असली, तरी त्याची लवचिकता उत्तम असल्यामुळे ती सुदृढ असते. म्हणजे, भेगाळणे, कापणे, खरखरीत होणे इ. होत नाही. त्वचेचे आयुष्यमान सुधारते. त्वचेचा पोत (skin tone) सुधारतो आणि त्यामुळे आयुष्यही वाढते.
 
ताणतणाव कमी झाल्याने व शरीर शांत झाल्याने मन शांत व प्रसन्न झाल्याने झोप शांत लागते. झोप न लागणे (अनिद्रा) तुटक झोप लागणे (खंडित निद्रा) व खूप स्वप्न पडून, अपूर्ण झोप घेणे इ. तक्रारी राहत नाहीत. सकाळी ताजेतवाने वाटून, उत्साहाने व सकारात्मक दृष्टीने दिवसाची उत्तम सुरुवात होते. तसेच श्रम करण्याची, झेलण्याची ताकद आणि क्षमताही सुधारते.
 
असे विविध फायदे केवळ एका अभ्यंगाने आपल्याला मिळू शकतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काही रुग्ण म्हणतात की, पावसाळ्यात, दिवाळीत अभ्यंग होत आहे. पण, उकाड्यात नको रे बाबा! खूप चिकट वाटते! अशांसाठी अभ्यंग संपूर्ण शरीराला न करता केवळ तीन ठिकाणी करावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. हे तिसरे भाग (अवयव म्हणजे शिरप्रदेश (डोके), श्रवण (कान) आणि पाद (पाय) म्हणजे कर्णपूरण (कानात तेल) नियमित घालणे हे अत्यंत गरजेचे आहे.
 
अभ्यंग करायला सांगितल्यावर काही प्रश्‍न रुग्णांना आवर्जून पडतात. जसे-कधी लावायचे, किती वेळ चोळायचे, साबण लावायचा का? कुठले तेल वापरायचे इ. प्रश्‍नांची उत्तरे खालीलप्रमाणे-
 
अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणे. दिनचर्या म्हणजे रोज आचरणात आणण्याचे उपक्रम. अभ्यंग त्यातील एक आहे. संपूर्ण अंगाच्या त्वचेला हलक्या हाताने तेल लावणे, थोडे जिरविणे, हे अपेक्षित आहे. मालिशचे मुख्यत्वे करून तीन प्रकार आहेत. अभ्यंग आणि मर्दन. अभ्यंग या प्रकारात हलक्या हाताने तेल लावले जाते, चोळले जाते. स्वतःचे स्वतः हे जमू शकते. रोज अंघोळीपूर्वी संपूर्ण अंगाला तेल लावावे. हातापायांना लावताना खालून वर अशा दिशेने तेल लावावे. पाठीला आणि छातीला लावताना मधून बाहेरील बाजूस असे लावावे. पोटाला घड्याळाच्या दिशेने गोलाकार (वर्तुळाकार) अभ्यंग करावे. सर्व हातापायांच्या सांध्यांनाही गोलाकार तेल चोळावे. या विशिष्ट पद्धतीने तेल लावण्याचे कारणही आहे. हातापायांवर जी लव असते, ती वरून खालच्या दिशेने वाढते. तेलही जर असेच लावले, तर ते रोमरंध्रांच्या (pores) आत शिरू शकत नाही. केसांवरच राहते. असे होऊ नये, म्हणून उलट दिशेने म्हणजे खालून वर (बोटांपासून खांद्याकडे व पावलांपासून मांडीच्या दिशेने) तेल लावावे. पोटाला गोलाकार तेल चोळायचे. हे एक विशिष्ट कारण आहे. आपल्या शरीरातील नाड्या उजवीपासून डावीकडे अशा स्थित आहेत.
 
म्हणजे उजव्या बाजूला Ascending Colon, मध्यभागी transverse colon आणि डाव्या बाजूस. Descending colon डाव्या बाजूने मग ते गुद्द्वाराशी संलग्न होते. पोटाला जर उजव्यापासून डावीकडे घड्याळानुसार (clockwise direction) तेल लावले, अभ्यंग केला, तर आतड्यांच्या गतीलाही पूरक होते व मलसंचिती पुढे ढकलण्यास मदत होते. शौचास साफ होण्यास या अभ्यंगाचा फायदा होतो. तसेच circulation ही सुधारते. पाठीचे मणके हे एकावर एक स्थित असतात. माकडहाडापासून वर मानेपर्यंत सरळ दिशेने आधी अभ्यंग करावे व नंतर बाहेरच्या दिशेने चोळावे. म्हणजे मणक्यांवर तेल लावून नसांनाही तेल पोहोचते. चेहर्‍याला लावताना, गालांना आतून बाहेर व मानेपासून हनुवटीपर्यंत वर असे तेल लावावे. 
 
अभ्यंगाला दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत नाही. यात रगडणं अपेक्षित नाही. शरीरात लवचिकता असल्यास संपूर्ण अंगाला स्वतःच्या हाताने तेल लावता येतं आणि चोळताही येतं. रोज केल्याने लवचिकता नक्की वाढते. अंघोळीपूर्वी केल्याने जास्तीचे तेल कोमट पाण्याबरोबर निघून जाते. थोडा साबण लावल्यास हरकत नाही. पण, उटणं लावल्याने फक्त अतिरिक्त स्निग्धांश काढला जातो. साबणामुळे त्वचेला येणारा कोरडेपणा उटण्याने येत नाही. तेलामध्ये खूप वैविध्य आहे. पण, सामान्यतः उन्हाळ्यात खोबरेल तेल आणि पावसाळ्यात व थंडीत तिळाचे तेल लावावे. खूप थंडी असल्यास मोहरीचे तेल लावावे. वेगवेगळ्या तेलाचे गुणधर्म आणि अभ्यंगाव्यतिरिक्तचे मसाज प्रकार हे पुढील लेखात बघू.

(क्रमशः)

वैद्य कीर्ती देव

(लेखिका आयुर्वेदिक
कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

 
Powered By Sangraha 9.0