व्यापारयुद्धाचा भडका

21 Jun 2018 20:16:49

 

 
भारताने नुकताच अमेरिकेतून आयात होणाऱ्या ३० वस्तूंवरचा आयातकर वाढवून ‘जशास तसे’ उत्तर दिले. याबाबतचा प्रस्ताव भारताने गेल्याच आठवड्यात जागतिक बँकेला दिला होता. ४ ऑगस्टपासून ही नवी आयात करवाढ लागू होईल. यामध्ये बरेचसे अन्नपदार्थ आणि स्टील उत्पादने यांचा समावेश आहे.
 

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-चीन व्यापारयुद्धाची खूप चर्चा सुरू आहे. मात्र, असेच व्यापारयुद्ध सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात पेटले आहे. गेल्या शुक्रवारच्या ‘जगाच्या पाठीवर’ या सदरात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिका यांच्यातील अमेरिकेच्या दृष्टीने प्रतिकूल अशा व्यापार असमतोला बद्दल केलेल्या वक्तव्यांचा ऊहापोह केला होता. गेल्या काही दिवसांतील घटना भारत, चीन, युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यात ‘आयातकर युद्ध’ सुरू झाल्याचं दर्शवतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या तथाकथित ‘स्वदेशी’ धोरणावर भारत, चीन आणि युरोपियन युनियनकडून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या शुक्रवारी अमेरिकेने चिनी वस्तूंवर जास्त आयातकर लावल्याबद्दल चीनने लगेच ५० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर करवाढ केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या सुमारे २०० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर १० टक्के आयातकर वाढविण्याचं सुतोवाच केलं होतं. जर चीनने यावर काही प्रतिक्रियात्मक पावलं उचलली तर आणखी २०० डॉलर्सच्या वस्तूंवर १० टक्के आयातकर वाढवला जाईल, असा इशारा दिला होता. यावर चीनने अजून तरी काही धोरणात्मक निर्णय घेतला नसला तरी ‘अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल,’ असं म्हटलं आहे.

 

भारताने नुकताच अमेरिकेतून आयात होणाऱ्या ३० वस्तूंवरचा आयातकर वाढवून ‘जशास तसे’ उत्तर दिले. याबाबतचा प्रस्ताव भारताने गेल्याच आठवड्यात जागतिक बँकेला दिला होता. ४ ऑगस्टपासून ही नवी आयात करवाढ लागू होईल. यामध्ये बरेचसे अन्नपदार्थ आणि स्टील उत्पादने यांचा समावेश आहे. भारताचा हा निर्णय हे अमेरिकेने तीन महिन्यांपूर्वी भारतीय उत्पादनांवर लादलेल्या आयातकराला प्रत्युत्तर आहे. भारतातून दरवर्षी अमेरिकेत सुमारे दीड अब्ज डॉलर्सची स्टील आणि अॅ्ल्युमिनियमची निर्यात होते. मार्च महिन्यात अमेरिकेने भारताच्या स्टील आणि अॅवल्युमिनियम उत्पादनांवर मोठा आयातकर लादला. यामुळे भारतातून स्टीलची निर्यात सुमारे १९८.६ दशलक्ष डॉलर्सने कमी झाली होती, तर अॅनल्युमिनियमची निर्यात सुमारे ४२.४ दशलक्ष डॉलर्सने कमी झाली होती. याविरोधात भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या तक्रार निवारण मंचाकडे अमेरिकेविरोधात तक्रारही केली होती. याच आठवड्यात युरोपियन युनियननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या धातूंवरचा आयातकर वाढवला. जपान, कॅनडा आणि मेक्सिकोकडूनही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

 

या सगळ्या घटना अमेरिकेने सुरू केलेलं व्यापारयुद्ध उतरोत्तर भडकत चालल्याचं दर्शवतात. जी अमेरिका एकेकाळी जागतिकीकरण घडवून आणण्यात अग्रेसर होती, तीच अमेरिका आता घूमजाव करत आहे. अमेरिकेच्या कृत्याला प्रत्युत्तर म्हणून सगळेच देश व्यापाराच्या बाबतीत संरक्षक भूमिका घेत आहेत. गांधीजी जसं म्हणतात की, “डोळ्याला डोळा या तत्त्वाप्रमाणे चालल्यास अख्खं जग आंधळं होईल,” त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारयुद्धाच्या बाबतीत प्रत्येक देशाने ‘जशास तसे’ या पद्धतीने वागल्यास भविष्यात १९२९ सारखं मोठं आर्थिक संकट उभं राहायची शक्यता नाकारता येत नाही.

 

जागतिकीकरणानंतर मुक्त आयात-निर्यात ही जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनली. प्रत्येक देशाने आंतरराष्ट्रीय व्यापाराला अनुकूल अशी आर्थिक धोरणं ठरवली. प्रचंड मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे उत्पादकांनी त्या प्रमाणात मोठी गुंतवणूक करून उत्पादन करायला सुरुवात केली. आता प्रत्येक देशाच्या संरक्षक धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारच संकोचल्यामुळे गुंतवणूकच धोक्यात आली आहे. या उत्तरोत्तर भडकत जाणाऱ्या व्यापारयुद्धामुळे उत्पादकांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरचा विश्वास उडत चालल्याची चिंता जगातल्या काही प्रमुख बँकांनी व्यक्त केली आहे. सर्वच देशांना यावर लवकरात लवकर तोडगा काढावा लागेल.

Powered By Sangraha 9.0