वीज खात्याच्या अनागोंदी कारभाराचा बदलापूरकरांना फटका

11 Jun 2018 22:26:25



बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात महावितरणाच्या अनागोंदी आणि ढिसाळ कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. दुरुस्ती झाल्यानंतरही अवघ्या काही तासांतच पुन्हा वीजपुरवठा खंडित होत असल्याने बदलापूरकर संतप्त होत आहेत. रात्री-अपरात्री वीज गायब होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महावितरणाचे करायचे काय?, असा संतापजपनक सवालही ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र, वाढलेल्या लोकसंख्येला वीजपुरवठा करण्यात महावितरण विभाग कमी पडत असल्याचे सातत्याने समोर आले आहे. त्यातही उंच-सखल भागांत असलेल्या इमारती, जुने विद्युत खांब, रोहित्र, जुन्या झालेल्या वाहिन्या, खांबाशेजारी असलेल्या झाडांची न झालेली छटाई अशा असंख्य गोष्टींमुळे गेल्या काही वर्षांत तासंतास वीजपुरवठा खंडित झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींमुळे एका दिवसात अनेकदा वीजपुरवठा खंडित होण्याचा जणू काही विक्रमच झाला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या पावसांच्या सरींमुळे तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कारभारावर नागरिक संतप्त झाले आहेत. वीजबिल भरण्यास एका दिवसाचा जरी विलंब झाला, तरी महावितरणचे कर्मचारी मीटर जोडणी तोडण्यासाठी घरोघरी पोहोचतात. मात्र तासंतास खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची जबाबदारी घेताना मात्र महावितरण दिसत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत.

Powered By Sangraha 9.0