समुद्रकिनार्याजवळची जमीन ही वालुकामय (पुळणीची) असते. या जमिनीत काही ठराविक वनस्पतीच जगतात आणि वाढतात. तिवर, सुरू, माड, रुई या त्यातल्या प्रमुख. यांतली आणखी एक प्रमुख वनस्पती म्हणजे ‘उंडिल’ अथवा ‘उंडल.’ भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यावर आढळणारी ही वनस्पती आजही ग्रामीण लोकजीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. नारळासारखंच हे एक बहुउपयोगी झाड. हा एक सदाहरित वृक्ष आहे. फणसाच्या पानाच्या आकाराची याची पानं गर्द हिरवी असतात.
उंडल ही वनस्पती काही प्रमाणात माहिती असण्याचं कारण म्हणजे उंडलीच्या फळापासून मिळणारं बहुउपयोगी ‘कडूतेल.’ कोकणात पूर्वी जवळजवळ प्रत्येक गावात एकतरी कडूतेलाचा घाणा असायचा. आजही काही गावांमध्ये तो पाहायला मिळतो. उंडिलाच्या गोलाकार छोट्या फळात तेलाचं प्रमाण भरपूर असतं. हेच ते ‘कडूतेल.’ चिकट, हिरव्या रंगाचं आणि दुर्गंधीयुक्त असलेलं हे कडूतेल मुख्यत: पूर्वी जेव्हा रॉकेल नव्हतं तेव्हा दिव्यांमध्ये वापरलं जायचं. आज ते मुख्यत: जनावरांच्या त्वचारोगांवर औषध म्हणून वापरलं जातं. गुरांच्या अंगाला कडूतेल फासलं की गोचिड तात्काळ उतरते. गोचिड लागू नये आणि उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून गुरांना अधूनमधून भादरतात.(केस कापतात) गुरांना भादरल्यानंतर थंडाव्यासाठी कडूतेल फासतात. आपण डोक्यावर जसं खोबरेल तेल घालतो तसंच गुरांच्या डोक्यावर कडूतेल थापतात. याशिवाय वंगण म्हणून कडूतेलाचा मोठा उपयोग आहे. रहाट, बैलगाडी, मोट अशी लाकडी चाकं जिथे वापरली जातात तिथे वंगण म्हणून कडूतेलाचा वापर होतो. कडूतेल शरीराला लावल्यावर डास चावत नाहीत, तसंच माशाही बसत नाहीत. ते एक नैसर्गिक ‘ओडोमास’ आहे. गावांमध्ये बर्याचदा बायका चार कापायला जाताना वा दूध काढायला जाताना हातापायाला कडूतेल लावतात. कडूतेल काढल्यावर मागे जी पेंड (साका) उरते ती उत्तम सेंद्रिय खत आहे. उंडिलाचं लाकूड हे कठीण असून ते खास करून होड्या बनविण्यासाठी वापरतात. लाकडात तेलाचा अंश जास्त असल्याने पाण्यातसुद्धा ते खराब होत नाही.

शिवाय होड्यांचं लाकूड खराब होऊ नये म्हणून होडीला बाहेरून कडूतेल फासतात. त्याला कोकणातल्या स्थानिक भाषेत ‘चोपडाण’ म्हणतात. उंडिलाच्या लाकडात तेलाचा भरपूर अंश असल्याने त्याचं ओलं लाकूडही सहज जळतं. त्यामुळे किनारी भागांत स्मशानात मृतदेहाला अग्नी देण्यासाठी खास करून उंडिलाची लाकडं वापरतात.
उंडिलाची फळं गळवावर उत्तम औषध आहे. उंडिलाचं फळ उगाळून लावल्यास गळू फुटायला मदत होते. शिवाय उंडिलाची फळं हे वटवाघळांचं आवडतं खाणं आहे.
- हर्षद तुळपुळे