पाणीपुरवठा यंत्रणा प्राधिकरणाकडेच योग्य

31 May 2018 21:54:36



बदलापूर: अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याकडेच असणे योग्य असल्याचे प्रतिपादन आ. किसन कथोरे यांनी व्यक्त केले. अंबरनाथच्या चिखलोली धरणातून होणारा गढूळ आणि दूषित पाणीपुरवठा करण्यावरून अंबरनाथच्या नागरिकांना त्रास झाला होता, याची दखल घेऊन माहिती घेण्यासाठी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत अंबरनाथ शहरात आले होते. त्यावेळी विविध पक्ष, संघटना, नागरिकांनी मंत्र्यांकडे पाणी खात्याच्या अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमते विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

त्यावेळी बदलापूर भाजपचे शहर अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी पाणीपुरवठ्याच्या नियंत्रणाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काढून ती संबंधित पालिकांकडे देण्याची मागणी राज्यमंत्र्यांकडे केली होती. याबाबत प्रसंगी जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही संभाजी शिंदे यांनी दिला होता.

या मागणीबाबत स्थानिक आ. किसन कथोरे यांनी मात्र स्थानिक पालिकांचा कारभार अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे आधीच गोंधळाचा झाला असताना शहराला पाणीपुरवठा करण्याची मोठी जबाबदारी पालिकेवर टाकल्यास यात आणखी गोंधळ उडणार, अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडेच असावी, असे मत आ. कथोरे यांनी व्यक्त केले आहे.

Powered By Sangraha 9.0