तूतुकुडीमधील घटनेचा अहवाल सादर करण्याचे गृहमंत्रालयाच्या आदेश

24 May 2018 15:36:16



तूतुकुडी :
येथील नागरिकांच्या निदर्शनावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारा संबंधी तातडीने चौकशी करून त्याचा अहवाल केंद्र सरकारसमोर सादर करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने आज दिले आहे. तूतुकुडीमध्ये गोळीबार करण्याचा आदेश नेमका कोणी दिला आणि या घटनेची नेमकी पार्श्वभूमी काय होती ? यासर्व गोष्टींचा अभ्यास यात करण्यात यावा, असे देखील मंत्रालयाने आज स्पष्ट केले आहे.

स्टरलाईट कॉपर प्लान्टविरोधात सुरु असलेल्या नागरिकांच्या निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारावर संपूर्ण देशभरात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर गृह मंत्रालयाने देखील यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गृह मंत्रालयाने यावर शोक व्यक्त करत, या घटनेच्या चौकशीचे आदेश तामिळनाडू राज्य सरकारला दिले. या घटनेची सखोल चौकशी करून याचा अहवाल तातडीने सरकार समोर सादर करावा, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.



दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री इ. पलानिसामी यांनी देखील या घटनेवर दुःख व्यक्त करत, या घटनेच्या चौकशी साठी एक समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना रुपये १० लाख तर जखमींना रुपये ३ लाखांपर्यंत आर्थिक मदत देण्याची देखील घोषणा केली आहे. दरम्यान सरकारच्या प्रयत्नांनंतर देखील स्टरलाईट कंपनीविरोधातील नागरिकांची निदर्शने अजून पर्यंत थांबलेली नाहीत. उलट या गोळीबारानंतर काही ठिकाणी या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचेही समोर आले आहे.

Powered By Sangraha 9.0