तामिळनाडूमधील नागरिकांच्या निदर्शनावर पोलिसांचा गोळीबार

23 May 2018 15:36:48

११ जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी



तूतुकुडी : तामिळनाडूतील तूतुकुडी शहरामधील वेदांता स्टरलाईट कॉपर कंपनीविरोधात सुरु असलेल्या नागरिकांच्या निदर्शनांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये एकूण ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण गंभीररीत्या जखमी झाले आहे. दरम्यान पोलिसांच्या या कृत्यानंतर नागरिकांचे हे आंदोलन आणखीनच भडकले असून अनेक ठिकाणी या आंदोलनांने हिंसक वळण घेतले आहे.

गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून हे आंदोलन सुरु आहे. वेदांता स्टरलाईट कंपनीमुळे तूतुकुडी आणि त्याच्या आसपासचा परिसर मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रदूषणामुळे याठिकाणी असलेल्या नागरिकांना देखील मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे हा प्रकल्प बंद करण्याची मागणी येथील नागरिकांनी करण्यास सुरुवात केली होती. परंतु याकडे सरकारबरोबरच इतर सर्व जणांनीच दुर्लक्ष केल्यामुळे अखेरकार काल मोठ्या संख्याने नागरिकांनी कंपनीच्या दिशेने मोर्चा काढला, यावेळी पोलिसांनी या नागरिकांना अडवण्याचा प्रयत्न केला असताना दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली व परिणामी पोलिसांनी नागरिकांवर गोळीबार केला. यामध्ये एकूण ११ जण ठार झाले तर २५ जण जखमी झाले.



दरम्यान पोलिसांच्या या कृत्यानंतर राज्यभरातून स्थानिक पोलिसांवर टीका केली जात आहे, तसेच पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री इ.पलानिसामी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ३ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
Powered By Sangraha 9.0