बहुमत चाचणीसाठी भाजप सिद्ध : प्रकाश जावडेकर

18 May 2018 17:13:12
 
 
बेंगळूरू : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर भारतीय जनता पक्ष बहुमत चाचणीसाठी पूर्णपणे तयार असून पक्ष आपले बहुमत सिद्ध करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरेल, असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच बहुमत चाचणी दरम्यान हंगामी सभापती म्हणून भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल बोपय्या यांचे अभिनंदन देखील त्यांनी केले आहे. तसेच राज्यपालांनी अत्यंत योग्य अशा व्यक्तीची बहुमत चाचणीसाठी नियुक्ती केली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


जावडेकर यांनी ट्वीट करून पक्षाच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना उद्या संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सभागृहात आपले बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनी यांनी बहुमत चाचणीसाठी म्हणून बोपय्या यांची नियुक्ती केली. तसेच येडीयुरप्पा यांना बहुमत चाचणीसाठीच्या आवश्यक त्या सूचना दिल्या. परंतु बोपय्या यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित करत, बोपय्या यांच्या नियुक्तीला आपला विरोध दर्शवला आहे. दरम्यान जावडेकर यांनी विरोधकांच्या या प्रश्नाला देखील उत्तर दिले असून बोपय्या यांची निवड योग्य असल्याचे म्हटले आहे.









कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा गाठण्यासाठी भाजपकडे अद्याप ८ आमदारांचे संख्याबळ कमी पडत आहे. दरम्यान राज्यपालांकडून करण्यात येणाऱ्या दोन अँग्लो इंडियन आमदारांच्या नियुक्तीला देखील न्यायालयाने स्थगिती दिली असल्यामुळे तसेच गुप्त मतदान न घेण्याचे आदेश दिल्यामुळे भाजपसमोर सध्या मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. परंतु पक्षाकडून मात्र बहुमत चाचणी जिंकण्याचा दावा केला जात असल्यामुळे भाजप आपले बहुमत कशाप्रकारे सिद्ध करणार याची उत्सुकता सर्व देशाला लागली आहे.
Powered By Sangraha 9.0