...याची मोठी किंमत मोजावी लागेल : ट्रम्प

09 Apr 2018 11:25:07

रशियासह इराणला ट्रम्प यांचा इशारा




वॉशिंग्टन डी.सी :
सिरीया येथे नुकताच झालेल्या रासायनिक हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या देशांना या हल्ल्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच ओबामांनी आपली रेड लाईन या अगोदरच ओलांडली असती, तर सिरीयावर अशी परिस्थिती आलीच नसती, असे देखील ट्रम्प यांनी म्हटले आहे.
 
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून सिरीया येथे झालेल्या हल्ल्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या वक्तव्यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि इराणचा स्पष्टपणे उल्लेख करत ट्रम्प यांनी 'या हल्ल्यासाठी त्यांना जबाबदार धरले आहेत. तसेच या हल्ल्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असा थेट धमकीवजा इशारा देखील त्यांनी दिला आहे.



 
'सिरीयामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. हा हल्ला करणाऱ्यांची तुलना एखाद्या पशु सोबतच केली जाऊ शकते' अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. तसेच ओबामा यांनी आपल्या कार्यकाळामध्ये स्वतःहून तयार केलेल्या आपल्या मर्यादा तोडल्या असत्या, तर अशी भयानक परिस्थिती उद्भवलीच नसती, असे देखील ट्रम्प यांनी म्हटले आहे.


दरम्यान हल्ल्यानंतर सर्व परिसराला सिरीयन सैनिकांनी घेराव घातला आहे. त्यामुळे त्याठिकाणी मदत पोहचवणे अवघड झाली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा परिसर मोकळा करून जखमी नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवल्या जाव्यात, असे देखील ते म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0