बंगळूरूमधून ४ कोटी रुपयांची रोकड जप्त

27 Apr 2018 19:45:00

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाची कारवाई



बंगळूरू :
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने बंगळूरूमधून आज ४ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. बंगळूरूमधील तीन कंत्राटदारांकडून आज ही रोखड जप्त केली असून रुपये २ कोटींचे दागिने देखील विभागाने जप्त केले आहे.

आयकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार बंगळूरूमधील तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या घरी विभागाने आज सकाळी धाड टाकली. याधाडीमध्ये एकूण ४.०१ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि २.२० कोटी रुपयांचे दागिने असा मुद्देमाल विभागाच्या हाती लागला. याविषयी विचारणा केली असता तसेच याचा तपशील मागितला असता, या तिन्ही कंत्राटदारांना तो देता आला नाही. त्यामुळे विभागाने हा सर्व मुद्देमाल जप्त करत, या तिन्ही कंत्राटदारांना आपल्या ताब्यात घेतले आहे.

दरम्यान ही रोकड निवडणुकीमध्ये मतदारांना वाटण्यासाठी आणल्याचा प्राथमिक अंदाज आयकर विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुढील महिन्यांच्या १२ तारखेला राज्यात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना पैसे वाटण्याच्या घटना घडत आहेत. यापार्श्वभूमीवर आयकर विभागाने अनेक ठिकाणी सध्या छापे टाकून रोक रक्कम जप्त केलेली आहे. त्यामुळे ही रक्कम देखील त्यासाठीच आणली असावी, असा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे. परंतु याविषयी अधिक माहिती तपासानंतरच समोर येईल.
Powered By Sangraha 9.0