२०२६ आणि २०३२ च्या ऑलम्पिक स्पर्धांच्या यजमान पदासाठी भारताचे प्रयत्न

20 Apr 2018 11:58:18

 
 
भारतीय ऑलम्पिक संघाने २०२६चे युवा ऑलम्पिक खेळ आणि २०३२ चे मुख्य ऑलम्पिकचे यजमान पद भारताला मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचबरोबर २०३० सालचे आशिया खेळाचे यजमान पद मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक संघात बोली लावण्याच्या तयारीत भारत आहे, अशी माहिती भारतीय ऑलम्पिक संघाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी दिली.
 
 
आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक संघाचे अध्यक्ष थॉमस बॅच हे सध्या भारत भेटीला आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय ऑलम्पिक संघातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत बॅच देखील उपस्थित होते. बॅच यांनी भारतीय ऑलम्पिक संघाच्या या पुढाकाराची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर यासाठी जेव्हा बोली लावली जाईल त्यात भारताबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 
 
युवा ऑलम्पिक आणि समर ऑलम्पिक भारतात व्हावे, हि भारतीय खेळाडूंसाठी उत्तम आणि अभिमानस्पद बाब असेल. त्यासाठी भारतातर्फे प्रयत्न सुरु आहेत, हि देखील कौतुकास्पद बाब आहे. असे बॅच यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, यामुळे भारतात ऑलम्पिक खेळांना मोठ्याप्रमाणात चालना मिळेल. त्याचबरोबर अनेक तरुणांचा ऑलम्पिककडे येण्याचा ओढा नक्कीच वाढेल.
 
 
सध्या यजमानपदासाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरु झालेली नाही. २०२६ साली होणाऱ्या युवा ऑलम्पिकच्या बोलीची प्रक्रिया २०२० च्या शेवटी सुरु होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर २०३० चे आशियन खेळ आणि २०३२चे ऑलम्पिक याची प्रक्रिया देखील सुरु झालेली नाही.
 
Powered By Sangraha 9.0