थकबाकीवरून महापालिका-महावितरणमध्ये कलगीतुरा

09 Mar 2018 13:42:26

जळगाव :
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीसंदर्भात महापालिकेने महावितरणला नोटीस बजावल्याने महावितरणच्या आयएमआर कॉलेजजवळील कार्यालयाने महापालिकेस पत्र देवून थकित वीज बिलात मालमत्ताकर व पाणीपट्टी बिलाची रक्कम समायोजित केली आहे, असे पत्र दिले. त्यावर महापालिकेने थकबाकी समायोजित करता येत नाही. थकबाकीची रक्कम रोखीने अथवा धनादेशाद्वारे भरावी, अन्यथा जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणला दिला आहे.
 
 

महावितरण व महापालिका प्रशासनात इच्छादेवी चौक ते डी-मार्ट व कोर्ट चौक ते गणेश कॉलनी चौकादरम्यान रस्त्यावर असलेले विद्युत पोल स्थलांतरावरून चांगलेच युद्ध रंगलेले आहे. महावितरणने थकित वीज बिल भरण्यासाठी तगादा लावल्याने महापालिकेनेही मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी नोटीस सत्र सुरू केले आहे.

 
महापालिकेने महावितरणच्या गणेश कॉलनी, शिवाजीनगर तसेच निमखेडी परिसरात कार्यालयांची मालमत्ता कर तसेच पाणीपट्टीची सुमारे २५ लाख रुपयांची थकबाकी काढून पैसे भरा; नाही तर कार्यालय सील करू, अशी भूमिका घेतली. यावर महावितरणच्या कर्मचार्‍यांनी आधी पैसे भरण्यास होकार दिला. त्यात आयएमआर कॉलेज समोरील महावितरण कार्यालयाने श्रीकृष्ण कॉलनीतील महापालिकेचे वीज कनेक्शनचे थकित बिल हे मालमत्ता व पाणीपट्टीच्या बिलात समायोजित केले असल्याचे पत्र पाठविले. त्यामुळे पुन्हा महावितरण आणि महापालिका प्रशासनात वाद सुरू झाला असून, महापालिकेने महावितरणला गुरुवारी पुन्हा पत्र पाठविले. त्यात रक्कम समायोजित करणे हे नियमात नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0