कागदी घोडे नाचवू नका; कामे करा !

19 Mar 2018 11:09:46

पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी अधिकारी-कर्मचार्‍यांना सुनावले खडेबोल


 
पाचोरा :
पाचोरा-भडगाव तालुक्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. मात्र, तरीही उपाययोजना नाहीत. हे चालणार नाही. नुसते कागदी घोडे नाचवू नका. पाणीटंचाई निवारणार्थ काम करा. गावनिहाय उपलब्ध पाणीसाठा आणि गावाला लागणारे पाणी याचा वास्तव आराखडा तयार करा. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेईल. तेव्हा उपाययोजना दिसल्या नाहीत तर तुमची खैर नाही, अशा शब्दात आमदार किशोर पाटील यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना खडेबोल सुनावले.
 
 
पाचोरा-भडगाव तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आमदार पाटील बोलत होते. बैठकीला प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पाचोरा व भडगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार, जि.प. सदस्य मनोहर पाटील, पदमसिंग पाटील, संजय पाटील, आमदारांचे स्वीय सहायक राजेश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आमदार पाटील यांनी दोन्ही तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा जाणून घेतला. पाचोरा व भडगाव तालुक्यातील ज्या गावांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेले आहे; त्या गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या काय आहे? तसेच किती गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर आहे? किती गावात पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे? याचीही माहिती त्यांनी विचारली. धरणात पाण्याचा साठा कमी आहे. त्यामुळे हा जलसाठा पिण्यासाठी आरक्षित करून भरारी पथकांची नेमणूक करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
 
 
आर. ओ. प्लान्ट निर्माण करा
प्रत्येक गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता १४ वित्त आयोगामार्फत आर.ओ. प्लान्ट निर्माण करावे. तसेच पाणीपुरवठा विहिरीचे वीज बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे असलेल्या १४ वित्त आयोगातून कमी आराखड्यात तरतूद करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
 
 
‘जलयुक्त’च्या तक्रारी निकाली काढा
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांचीही आमदार पाटील यांनी माहिती जाणून घेतली. काही गावातील कामांबाबत तक्रारी असल्याने त्या निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच जलयुक्त शिवार ही शासनाची महत्त्वाकांशी योजना असून, त्यात बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा दमही आमदारांनी भरला. अवैध वाळू वाहतूक पूर्णपणे थांबलीच पाहिजे. त्यासाठी कडक धोरण राबवा. अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांची गय करू नका, असेही आमदार पाटील म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0