संघशक्ती कलियुगे...

22 Feb 2018 16:17:53


‘‘सामान्यतः सैनिक तयार करण्यासाठी सेनेला सहा ते सात महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी लागतो. मात्र, हेच कामसंघ तीन दिवसांत करू शकतो,’’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नुकत्याच केलेल्या विधानाचा नुकताच विरोधकांसह माध्यमांनीही केवळ राजकारणासाठी विपर्यास केला. त्यामुळे नेमका सरसंघचालकांच्या बोलण्याचा अर्थ काय, त्यामागचे संदर्भ कोणते यांचा ऊहापोह करणारा हा लेख...


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ११ फेब्रुवारी रोजी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे संघ स्वयंसेवकांसमोर मार्गदर्शनपर भाषण केले. त्यातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला अंश असाः ‘‘सामान्यतः सैनिक तयार करण्यासाठी सेनेला सहा ते सात महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी लागतो. मात्र, हेच कामसंघ तीन दिवसांत करू शकतो. ती आमची क्षमता आहे. जर तशीच परिस्थिती उत्पन्न झाली व राज्यघटनेने अनुमती दिली तर शत्रूशी मुकाबला करण्यास संघ स्वयंसेवक तयार असतो. मात्र, संघ हे सैनिकी वा अर्धसैनिकी संघटन नव्हे. उलटपक्षी सैन्यात तशी शिस्त रुजवली जाते तशा शिस्तीचे हे पारिवारिक संघटन आहे. स्वयंसेवक हे देशासाठी सर्वोच्च त्याग करण्यास सदैव तयार असतात.’’ हे भाषण पूर्ण न वाचता काही वाक्यांचा संदर्भ सोडून गैरअर्थ काढला जात आहे. देशभरातील प्रसिद्धीमाध्यमे व समाजमाध्यमे या भाषणावरून सध्या जो गदारोळ माजवित आहेत, तो केवळ निषेधार्ह नसून देशहिताला बाधा आणणारा आहे.


दैनंदिन शाखांच्या माध्यमातून स्वयंसेवकांवर देशभक्तीचा नित्य संस्कार करणे, हा संघाच्या कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. तो संघाचा श्वास आहे. नित्यसिद्ध व संघटित शक्ती समाजात उभी करणे, हे देशातील अंतर्गत व बाह्य आक्रमणाला कायमचे उत्तर आहे. ही संघाची भूमिका संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघ स्थापनेपासूनच निः संदिग्ध शब्दांत अधोरेखित केली आहे. कठोर शिस्त, राष्ट्रभक्ती, निःस्वार्थवृत्ती, समर्पणभाव व समाजप्रेम प्रत्येक स्वयंसेवकात विकसित करणे, हा संघाचा जीवनोद्देश आहे. याच स्पष्ट ध्येयानुसार संघाची वाटचाल गेली ९२ वर्षे अहर्निशपणे चालू आहे. संघशाखेतील विविध कार्यक्रमांतून हे संस्कार दररोज करण्यात येतात. त्यातून त्याची जी वृत्ती बनते व मानसिकता विकसित होते, त्यातून त्याला देशासमोरील अस्मानी व सुलतानी संकटांचा स्वयंस्फूर्तीने सामना करण्याची प्रेरणा मिळते. त्यासाठी त्याला वरिष्ठांच्या परवानगीची गरज भासत नाही. याची शेकडो उदाहरणे समाजासमोर संघसेवकांनी आपल्या कार्याने व कर्तृत्वाने ठेवली आहेत. संघाच्या कार्यपद्धतीचे हे मर्म व वैशिष्ट्य समजून घेतले, तर डॉ. भागवतांच्या म्हणण्यातील आशय व अन्वयार्थ समजू शकेल. मोहनजींनी स्वयंसेवकांची तुलना सैन्याशी वा सैनिकांशी केलेली नाही. तसा विचार त्यांच्या मनात, स्वप्नातही येणे अशक्य आहे. म्हणूनच त्यांच्या विधानाचा संदर्भरहित अर्थ काढून त्यांच्यावर हे आरोप करणे हे केवळ चुकीचेच नव्हे, तर घृणास्पद आहे.


दुसर्‍या महायुद्धाच्या काळात तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी जनतेला युद्ध सज्ज होण्याचे आवाहन करताना, ‘‘हे युद्ध आपल्याला घराघरात, शेतात, कारखान्यात, शाळा-महाविद्यालयात लढायचे आहे,’’ असा प्रेरणादायी संदेश दिला होता. याचा अर्थ युद्ध केवळ देशाच्या सीमेवर लढले जात नाही व ते लढण्याची जबाबदारी केवळ सैनिकांचीच नसते, तर पिछाडीला असणार्‍या देशातील प्रत्येक नागरिकाची असते. त्यासाठी शिस्त, कठोर परिश्रमव समर्पण भावना प्रत्येक व्यक्तिमात्रात निर्माण करावी लागते. देशकेंद्री विचार व त्याग भावना जनमानसात रुजण्यासाठी तशी वृत्ती विकसित करावी लागते. गेली नऊ दशके संघशाखेत शिस्त, अनुशासन व सेवा यांचा आग्रह धरीत असल्यामुळेच तीन दिवसांत सैनिकी प्रशिक्षण देऊन सैनिकी वृत्तीचा स्वयंसेवक देशकार्यासाठी तयार करण्याची संघाची क्षमता आहे, असा विश्वास सरसंघचालकांनी आपल्या भाषणात व्यक्त केलेला दिसतो. जे संघाचे हे कार्य उघड्या डोळ्याने पाहतात, त्यांना ते सहजपणे दिसते. झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे कसे करणार?


दुसरे असे की, डॉ. भागवत जे म्हणाले ते तसे अगदी नवीन नाही. रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांनी हाच मुद्दा वेगळ्या शब्दात मांडला होता. आपल्या एका भाषणात ते म्हणाले, ‘‘संघाचे स्वयंसेवक हा समाजाचा घटक आहे. त्याने कोणात राहू नये, समाजात होणार्‍या प्रत्येक घडामोडीबाबत तो जागरूक असला पाहिजे. समाजाच्या सुखदुःखात त्याने स्वाभाविकपणे सहभागी झाले पाहिजे. समाजात जे परिवर्तन अपेक्षित आहे, ते स्वयंसेवकाच्या दैनंदिन व्यवहारात दिसले पाहिजे. संघशाखा केवळ खेळ खेळण्याचे अथवा कवायत करण्याचे स्थान नाही, तर सज्जनांच्या सुरक्षेचे मूक अभिवचन आहे. तरुणांना व्यसनमुक्त करणारे, चंगळवादापासून दूर ठेवणारे संस्कारपीठ आहे. समाजावर येणार्‍या अस्मानी व सुलतानी संकटात त्वरित व निरपेक्ष मदतीचे आशाकेंद्र आहे. महिलांसाठी निर्भयता व सभ्य आचरणाचे आश्वासन आहे. दुष्ट व राष्ट्रद्रोही शक्तींसाठी धाक निर्माण करणारे शक्तीकेंद्र आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाज जीवनातील विभिन्न क्षेत्रात सुयोग्य कार्यकर्ते उपलब्ध करून त्यांना प्रशिक्षण देणारे विद्यापीठ आहे. संघाला कोणताही विषय वर्ज्य नाही.’’ (संदर्भ - ‘द्रष्टा संघटक - बाळासाहेब देवरस’ सांस्कृतिक वार्तापत्र विशेषांक) या पार्श्वभूमीवर डॉ. भागवतांचे विचार समजावून घेतले तर सुज्ञ माणसाचे गैरसमज होणार नाहीत. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या संत तुकारामांच्या वचनाचा भावार्थ आम्ही लक्षात घेणार आहोत की नाही? सतत जागरुकता ही लोकशाहीसाठी, स्वातंत्र्यासाठी मोजावी लागणारी किंमत आहे, अशा आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. तशी मानसिकता समाजात नित्यसिद्ध स्वरूपात उत्पन्न करणे, हे कोणत्याही राष्ट्रनिष्ठ संघटनेचे कर्तव्य आहे. रा. स्व. संघ आपल्या परीने ते कर्तव्य पार पाडीत आहे. त्याचे तात्त्विक व व्यावहारिक दर्शन समाजाला घडवित आहे. पाहण्यासाठी दृष्टी मात्र हवी.


आपण केलेल्या देशकार्याची वा समाजकार्याची टिमकी वाजविण्याची गरज संघाला वा संघस्वयंसेवकांना कधीच वाटली नाही, पण काही गोष्टी समाजासमोर ठेवणे आवश्यक आहे.


अ) १९४७ साली भारताच्या विभाजनानंतर पाकिस्तानने काश्मीर ताब्यात घेण्यासाठी युद्ध पुकारले होते. शत्रूच्या फौजा काश्मीरच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचल्या होत्या. त्यावेळी संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी संघाच्या स्वयंसेवकांना रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष करण्याचे आवाहन केले होते. श्रीनगरच्या विमानतळाची धावपट्टी संघस्वयंसेवकांनी प्राणाची बाजी लावून काही तासांत दुरुस्त करून वायुदलाचे काम सुकर केले, याची नोंद जनरल करिअप्पांनीही घेतली होती. फाळणीच्या वेळी हिंसाचार व रक्तपात यांनी थैमान मांडले होते. त्यावेळी ३००० मदत छावण्या उभारून संघाने निर्वासित बांधवांना मदत केली. तत्कालीन केंद्र सरकारने या संघकार्याची नोंद घेतली.


ब) १९६२ साली झालेल्या चीनबरोबरच्या युद्धात विशेषतः ईशान्य भारतात हजारो स्वयंसेवकांनी भारतीय सैन्यदल व स्थानिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले. वैद्यकीय छावण्या उभारून जखमी सैनिकांवर उपचार केले. या भरीव योगदानाचा परिणाम म्हणजे संघविरोधी असूनही तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांनी पुढील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्यासाठी संघाला विशेष निमंत्रण दिले.




क) १९६५च्या भारत-पाक युद्धात संघाने सर्वत्र रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. श्रीनगर हवाई दलाच्या विमानतळावर साचलेले बर्फाचे थर हटविले. धावपट्टी दुरुस्त केली आणि हवाई दलाचे कार्य सुकर केले. याच काळात दिल्लीच्या वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने संघ स्वयंसेवकांवर सोपविण्यात आली.

या तिन्ही युद्धांतील संघाचे योगदान निमलष्करी स्वरूपाचे होते. संघ, स्वयंसेवकांची मानसिकता कशाप्रकारे घडवतो, याचे हे प्रत्यंतर आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. भागवतांच्या उपरोल्लेखित विधानांचा अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे.


ड) दक्षिण भारतातील त्सुनामी, गुजरात व आंध्र प्रदेशातील महापूर, उत्तराखंडातील अतिवृष्टी व भूस्खलन, देशाच्या विविध भागांतील भूकंप या वेळीही हजारो संघ स्वयंसेवक कार्यरत होते. जेव्हा देशातला नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला, तेव्हा सडलेले मृतदेह उचलण्यापासून जखमींना मदत करण्यापर्यंत आणि अनेक गावांचे पुनर्वसन करण्यापर्यंतची सेवाकार्ये संघाने केली आहेत. तीही अगदी निरपेक्ष व निःस्वार्थ भावनेने.


इ) देशाच्या विविध भागांत आज संघाच्या वतीने सुमारे दीड लाख समाजोपयोगी सेवाकार्ये भारतात समाजाच्या सहकार्याने कोणतेही शासकीय अनुदान न घेता सुरू आहेत.


ज्यांना प्रत्येक गोष्टीचे क्षुद्र राजकारणच करायचे आहे, त्यांना हे सर्व समजणे कठीण आहे. सत्तेबाहेर फेकली गेलेली कॉंग्रेसची मंडळी, गटागटात विभागलेले समाजवादी व साम्यवादी यांच्या प्रतिक्रियेतून दिसून येणारी द्वेषमूलक भावना व तगमग आपण समजून घेतली पाहिजे. त्यांच्यासाठी हे टिपण नाही. मात्र, सामान्य नागरिकांच्या मनात कळत नकळत गैरसमज होणे देशहिताचे नाही, म्हणून काही गोष्टी नीटपणे समोर येणे आवश्यक होते. म्हणून हा लेखनप्रपंच.


- प्रा. श्याम अत्रे
Powered By Sangraha 9.0