दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कटिबध्द - पालकमंत्री बडोले

    21-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र शिबीर
 
 
 
गोंदिया : जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रापासून वंचित आहे. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहिम कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग प्रमाणपत्रासून वंचित राहणार नाही यासाठी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्राचे प्रमाण शुन्य टक्के आणण्यात येईल. त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन त्यांच्या सक्षमीकरणासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
 
 
२०  फेब्रुवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र शुन्य टक्के प्रमाण या विशेष मोहिम कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री बडोले यांनी केले, यावेळी ते बोलत होते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.पावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.रुखमोडे, सुनील केलनका, विरेंद्र जायसवाल, डॉ.लक्ष्मण भगत यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
 
 
राज्यातील किंवा देशातील हा कदाचित पहिला प्रयोग असावा की जेथे अपंगत्वाचे १०० टक्के प्रमाणपत्र देण्याचे काम या कार्यक्रमातून करण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या जवळपास २२ योजनांचा लाभ त्यांना मिळण्यास मदत होणार आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनेक यंत्रणांनी चांगले सहकार्य केले आहे. दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेले साहित्य देखील शिबिरातून देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे मोजमाप केल्यानंतर त्यांना साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. आपला कुणी वाली नाही ही दिव्यांग बांधवांमध्ये असलेली भावना त्यांनी दूर करावी. अडीअडचणीच्या प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असे त्यांनी सांगितले.