चेतक फेस्टिव्हलला विदेशी पर्यटक लावणार हजेरी

08 Dec 2018 10:27:00

पर्यटन विकास महामंडळाचे संचालक अभिमन्यू काळे यांची माहिती; सारंगखेडा येथे पाहणी

 
 
नंदुरबार  :
 
पर्यटन विभागाने चेतक फेस्टिव्हलचा देशभरात प्रचार-प्रसार केला आहे. त्यामुळे यंदा पर्यटकांची संख्या वाढेल. विदेशी पर्यटकांनाही चेतक फेस्टिव्हलविषयी अवगत करण्यात आल्याने यावर्षी विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येतील, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली.
 
 
चेतक फेस्टिव्हलची गेल्या काही दिवसांपासून वेगात तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी काळे यांनी सारंगखेडा येथे भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
 
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, विभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे, स्थापत्य अभियंता महेश बागुल, प्रकल्प अभियंता रोहित अहिरे, सारिका बारी, सहायक पोलिस अधिकारी गणेश न्हायदे, ग्रामविकास अधिकारी पी.डी. पाटील आदी उपस्थित होते.
 
 
अभिमन्यू पाटील म्हणाले की, सारंगखेडा येथे दरवर्षी एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त चेतक फेस्टिव्हल होतो. चेतक फेस्टिव्हलला पर्यटन विभागाचे पाठबळ असून, पुष्करला भरणार्‍या मेळाव्याच्या धर्तीवर या ठिकणी फेस्टिव्हल भरवला जात आहे. यंदा पुष्करच्या मेळाव्यात चेतक फेस्टिव्हलची माहिती देण्यात आली.
 
 
विदेशी पर्यटक येथे येतील, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. या वेळी चेतन फेस्टिव्हलच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच विविध विषयांवर चर्चा झाली.
 
पर्यटकांची संख्या वाढेल
 
अभिमन्यू काळे यांनी सांगितले की, पर्यटन विभागाने देशातील सर्व पर्यटनस्थळी चेतक फेस्टिव्हलचा प्रचार-प्रसार केल्यामुळे यंदा पर्यटकांची संख्या वाढेल. स्थानिकांसाठी या ठिकाणी असलेल्या टेंट सिटीत कार्यक्रम होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेतक फेस्टिव्हलकडे लक्ष दिल्याचे ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0