हिमनायक शिवा

07 Dec 2018 20:23:51


 


‘लुज’सारख्या खेळाचं अस्तित्व भारतात नसताना, त्या खेळात सहावेळा सुवर्णपदक जिंकणाऱ्या ध्येयवेड्या ‘शिवा केशवन’ची कहाणी...


मी भुकेला सर्वदाचा,

भूक माझी फार मोठी,

मंदिरी या बैसलो मी,

घेऊनिया ताटवाटी...

ज्ञानमेवा रोज खातो,

भूक माझी वाढताहे,

सेवितो आकंठ तरिही,

मी भुकेला राहताहे...

 

या काव्यपंक्ती खरंतर प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनात कोरून ठेवायला हव्यात. पण, प्रत्येक माणसाची ही ‘भूक’ वेगळी असते. काहींना पैशाची भूक असते, काहींना खाण्याची भूक असते, तर काहींना कसली वेगळीच... पण, काही लोकं एवढी ध्येयवेडी असतात की, त्यांना फक्त आणि फक्त जिंकण्याची भूक असते. अशी माणसं खरंतर यश संपादन करण्यासाठी कोणत्याही थरावर जाऊ शकतात. असाच जिंकण्यासाठी आणि आपल्या ध्येयासाठी वेडा होणारा शिवा केशवन हा अवलिया. शिवा गेली २० वर्षे थंडीत गारठ्यात आहे, तेही आपल्याच देशासाठी...

 

आपल्याला आट्यापाट्यापासून अगदी स्केटिंग, फुटबॉलपर्यंत बरेच खेळ ऐकीवात असतात. पण तुम्ही कधी ‘लुज’ या खेळाचे नाव ऐकले आहे का? कदाचित आजतागायत आपण पाश्चिमात्त्य देशांकडून घेतलेल्या किंवा अंगीकारलेल्या बऱ्याच खेळांपैकी हा एक खेळ नक्कीच मजेदार आहे. पण, हा अनोखा खेळ भारतात आणण्याचं पूर्ण श्रेय जातं ते शिवाला. ज्या काळात आपल्याकडे फक्त क्रिकेट, फुटबॉलसारख्या नावाजलेल्या खेळांमध्ये लोकं रमली होती, त्या काळात शिवा ‘लुज’ हा खेळ खेळत होता. त्याचं या खेळाकडे वळणं ही एक कहाणीच आहे. हिमाचल प्रदेश येथील बर्फाच्छादित पर्वत-शिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष असलेल्या मनाली या शहरात वाढलेल्या शिवाला लहानपणापासून आकर्षण होतं ते बर्फाचं. म्हणून तो लहानपणी आपल्या मित्रांसोबत स्किईंग करत असे. असच एकेदिवशी शाळेतून आल्यानंतर त्याने आपल्या मित्राकडे ‘विंटर ऑलिम्पिक’चे काही सामने पाहिले. खरंतर भारतात १९८०च्या दशकात आपल्याला ‘समर ऑलिम्पिक’ माहीत होतं, त्यामुळे या मुलाची ध्येयं वेगळी आहेत, हे त्याच्या मित्राला तेव्हाच कळलं. विंटर ऑलिम्पिकमध्ये शिवाने पहिल्यांदा ‘लुज’ हा खेळ काय असतो तो पाहिला. थोडक्यात, ‘लुज’ खेळात एका लाकडी पट्टीवर बसून बर्फाच्छादित रस्त्यावर ‘स्कि’ म्हणजे सरकत जातात. हा खेळ वाचायला सोपा वाटत असला तरी, तो सोपा अजिबात नाही. असं म्हणतात ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांना हा खेळ पाहण्यासही मनाई केली जाते. असा हा खेळ शिवा वयाच्या चौदाव्या वर्षापासून खेळत आहे. भारतात या खेळाबद्दल कोणालाच काही माहीत नसल्यामुळे या खेळाचं प्रशिक्षण मिळणं शक्यचं नव्हतं. त्यामुळे १९९६ साली ऑस्ट्रलियातील गंथर लेमर यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी शिवाचे प्रयत्न सुरू केले आणि १९९८च्या नगानो येथे झालेल्या विंटर ऑलिम्पिकमध्ये वयाच्या १६व्या वर्षी शिवाने भाग घेतला. विंटर ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा तो एकमेव भारतीय ठरला आणि त्याला युवा लुज ऑलिम्पियन’ होण्याचाही मान मिळाला. पण, त्यावेळी त्याला कोणतेही पदक मिळाले नाही.

 

“मी ज्या खेळाडूंना टीव्हीवर पाहायचो, त्यांच्यासोबत मी प्रतिस्पर्धी म्हणून उभा होतो, यापेक्षा मोठं पदक माझ्यासाठी असूच शकत नाही,”असं शिवा भारतात आल्यानंतर म्हणाला. त्यानंतर त्याने एकही ऑलिम्पिक स्पर्धा चुकवली नाही. अखेर २००५च्या विंटर ऑलिम्पिकमध्ये त्याला कांस्यपदक मिळालं आणि त्याचा आनंद द्विगुणित झाला. “मी आजवर एकही सामना चुकवला नाही. चुकांमधून शिकत गेलो आणि आज या कांस्यपदकाने माझी जिंकण्याची भूक अजून वाढवली आहे,” असं म्हणणाऱ्या शिवाने २०११ ते २०१७ पर्यंत सुवर्णपदक काही सोडले नाही. १९९३ साली आलेल्या ‘कुल रनिंग’ हा हॉलिवूड चित्रपट पाहून ‘लुज’ शिकणाऱ्या शिवाने हा खेळ भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कसा पोहोचेल, यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मनालीमध्ये त्याने ‘नॅशनल टॅलेंट स्काऊट’च्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आणि त्याच्या या योगदानामुळे २० वर्षांनंतर भारताला आणखी काही ‘लुज’ खेळणारे शिलेदार मिळाले. २०१२ साली ‘अर्जुन पुरस्कारा’साठी त्याला नामांकन मिळाले होते. मात्र, त्याला ‘अर्जुन पुरस्कार’ काही मिळाला नाही. त्यावर त्याने पत्रकारांना खूप सुरेख उत्तर दिले होते, “मी खेळाडू आहे, अभिनेता नाही. त्यामुळे पुरस्कार मिळाला नाही म्हणून हिरमुसून जाण्यात अर्थ नाही. मला भारताचा झेंडा छातीवर लावून खेळता येतं, हाच माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे.” पहाडी मुलांसाठी शिवा हा त्यांचा आदर्श आहे. २०१८ साली फेब्रुवारीमध्ये झालेली विंटर ऑलिम्पिक ही स्पर्धा शिवासाठी शेवटची ठरली. त्याने निवृत्ती जरी घेतली असली तरी, २०१८च्या स्पर्धेतत्याने १३० किलोमीटर प्रतितास वेगाने आपली स्पर्धा पूर्ण केली आणि ही त्याच्या कारकिर्दीतील दुसरी सर्वोत्तम वेळ ठरली. शिवा सध्या हिमाचल सरकारसोबत ‘लुज’ हा खेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कसा असावा, याविषयावर काम करीत आहे. त्यांच्या मते, “पहाडी भागात मुले पर्यटन क्षेत्रात फार लवकर वळतात. त्यात गैर काही नाही. मात्र, मुलांमध्ये आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या स्वप्नांचे बीज नक्कीच रोवले पाहिजे,” अशा या सहावेळा ‘लुज ऑलिम्पियन’ ठरलेल्या शिवाची ही जिंकण्याची भूक कायम राहावी एवढीच इच्छा...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0