नवी दिल्ली : चीनला आर्थिक विकासदरात मागे टाकत भारताने पुन्हा विकासदराच्या आकड्यांमध्ये सरशी केली आहे. सप्टेंबर तिमाहीच्या निकालांमध्ये विकासदर ७.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ०.८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु, गेल्या तिमाहीच्या तुलनेत १ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, झपाट्याने विकास करणारी अर्थव्यवस्था म्हणून स्थान कायम राखले आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळातील जीडीपी दरांवरून विरोधक आणि केंद्र सरकारशी वाद सुरू असतानाच गतवर्षीच्या तुलनेत अर्थव्यवस्था पुढे जात असल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले आहे. दरम्यान पहिल्या तिमाहीत विकासदर ८.२ टक्क्यांवर पोहोचला होता. अर्थतज्ज्ञांनी विकासदराची आकडेवारी घसरेल, असा अंदाज व्यक्त केला होता. रिझर्व्ह बॅंकेने विकासदर ७.५ ते ७.६ टक्क्यांवर राहतील, असा अंदाज व्यक्त केला होता. या तिमाहीत पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली वाढ याचा फटका विकासदराला बसला.
वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये प्रमुख आठ क्षेत्रांच्या पार्श्वभूमीवर उद्योग विकासदर ४.८ टक्क्यांवर पोहोचला. उत्पादनात ११.५ टक्के, कच्च्या तेलात ५ टक्के, नैसर्गिक वायुच्या उत्पादनात ०.९ टक्क्यांची घसरण झाली. दरम्यान सिमेंट, कोळसा, वीज आदींचे उत्पादन वाढले आहे. कृषि, वन आणि मस्य उत्पादन क्षेत्रात ३.८ टक्क्यांनी वाढ झाली, गेल्या वर्षी ही वाढ २.६ टक्क्यांवर होती. खनिज आणि उत्खनन क्षेत्रात २.४ टक्क्यांनी वाढ झाली. उत्पादन क्षेत्रात ७.४ टक्के वाढ झाली, गतवर्षी हा दर ७.१ टक्क्यांवर होता. वीज उत्पादन आणि अन्य क्षेत्रात ९.२ टक्क्यांनी वाढ झाली. याशिवाय बांधकाम क्षेत्रात ७.८ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.
अर्थव्यवस्था चीनच्या पुढे
दरम्यान, दुसऱ्या तिमाहीत समाधानकारक कामगिरी झाली असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था चीनच्या पुढे कामगिरी करत आहे. चीनचा तिमाही विकासदर ६.७ टक्के आहे. दरम्यान व्यापार युद्धाचाही फटका चीनच्या विकासदराला बसला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/