भटक्या कुत्र्यांची ‘अम्मा’

23 Nov 2018 19:28:23


 

गेली १७ वर्षे फक्त शहरातील ४००हून अधिक भटक्या कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी कचरा वेचण्यापासून पाळणाघराची स्थापना करणाऱ्या प्रतिमा देवी यांची कहाणी...

 

कुत्रा म्हणजे इमानदार प्राणी, कुत्रा म्हणजे माणसाचा मित्र, हे सगळं पाळीव कुत्र्यांबद्दल आजही लोकांना वाटतं. पण भटके कुत्रे म्हटले की, आपल्याला ते नकोसे होतात. आजही जगात नैराश्यग्रस्त लोक कुत्रे किंवा इतर प्राणी पाळतात. पण दिल्लीतील एका आजीने एक नाही दोन नाही, तर तब्बल ४०० कुत्रे पाळले आहे. दिल्लीतील साकेत परिसरात राहणाऱ्या प्रतिमा देवी यांनी तब्बल ४०० कुत्रे दत्तक घेतले आहेत, तेही भटके कुत्रे. जवळजवळ ६०० हून अधिक कुत्रे त्यांच्याकडे जेवायला असतात. वाचायला थोडं विचित्र वाटेल, कारण चार पाहुणे अचानक घरी आले तरी आपण हिरमुसतो. त्या दररोज दारावर आलेल्या सगळ्या कुत्र्यांचं आदरातिथ्य करतात. आपल्या संस्कृतीत सर्वच संत किंवा थोर व्यक्ती प्राणिमात्रांवर दया करा आणि प्रेम करा’ असा संदेश देतात. मात्र, मानवाच्या स्वार्थापायी आपण त्यांच्यावर नेहमीच अजाणतेपणी का होईना, अत्याचार आणि अन्यायच केला आहे. मग, कुत्र्यांना दगड मारण्यापासून ते जळत्या आगीत टाकण्यासारख्या अनेक लहान लहान घटनांमधून त्यांना आपल्याकडून त्रास होतो. अशाच एका वाईट अनुभवातून प्रतिमा अम्मांनी या मुक्या प्राण्यांसाठी पाळणाघराची सुरुवात केली. “आपण भटक्या कुत्र्यांपासून ते चावतात म्हणून लांब पळतो पण, तुम्ही कोणाला त्रास दिलाच नाही, तर तुम्हाला कोण का त्रास देईल?” या एका साध्या विचाराने प्रतिमा देवींनी २००० सालापासून या पाळणाघराची सुरुवात केली. हे पाळणाघर म्हणजे, दिल्लीतील त्यांचे छोटंस झोपडं आणि चारही बाजूंनी असलेला कुत्र्यांचा सहवास...

 

मूळच्या कोलकात्याच्या असलेल्या प्रतिमा देवी यांचं वयाच्या सातव्या वर्षी लग्न तिच्यापेक्षा दहा वर्ष मोठ्या गृहस्थाशी झालं. पण त्यांनी बायको म्हणून कधीच काही सुख प्रतिमा यांना दिलं नाही. सततचा होणारा अत्याचार, त्यातच वयाच्या १४ व्या वर्षी पदरात असलेली दोन लेकरे यामुळे त्या काहीच करू शकत नव्हत्या आणि तो काळ सामान्य घरातील स्त्रियांनी बंड करण्याचा नक्कीच नव्हता. त्यामुळे मूग गिळून सहन करण्यापलीकडे प्रतिमा यांच्या हातात काहीच नव्हते. याच चढाओढीत १९८० साली त्या कोलकात्यावरून दिल्लीत आल्या. दिल्लीत येऊन त्यांनी मोठ्या लोकांच्या घरात घरची कामे करायला सुरुवात केली. त्यातही त्यांचं वय कमी असल्यामुळे लोकांच्या ‘नजरा’ जगू देत नव्हत्या. म्हणून त्यांनी चहाची टपरी टाकली पण, तिकडेही त्यांचे दुकान दिल्लीतील पोलिसांकडून जाळण्यात आले. त्यात त्यांच्याबरोबर अनेक भटके कुत्रेही जखमी झाले. “या सगळ्या घटना माझ्यासाठी माणुसकीवरचा विश्वास उडविण्यासाठी पुष्कळ होत्या. त्यामुळे मी पुन्हा माणसाच्या सहवासात येणं टाळलं.” ही खरी सुरुवात होती प्रतिमा यांच्या छोटेखानी पाळणाघराची. सुरुवातीला फक्त त्यांनी दिल्लीच्या साकेत परिसरातील भटक्या कुत्र्यांना इंजेक्शन व खाण्याच्या सुविधा पुरविण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी माणसांकडून कोणत्याही आणि कसल्याही अपेक्षा करणे बंद केले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांकडे राहणे सोडून दिले. “माझ्या मुलांना मी त्यांच्या घरात राहणे यासाठी पसंत नव्हते, कारण त्यांना भटक्या कुत्र्यांची भीती वाटायची. त्यामुळे त्यांची भीती घालवण्याची मला गरज वाटली नाही. म्हणून मी माझं माझ्या ४०० मुलांसोबत वेगळ घरं उभं केलं. स्वत:च्या पाकिटातून पैसे खर्च करून भटक्या कुत्र्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली.”

 

आता त्यांना शहरातील ४०० संस्था आणि हजारो लोक आर्थिक तसेच खाण्याचे पदार्थ, कुत्र्यांच्या लसीकरणासाठी मदत करतात. “कुत्र्यांमध्ये आपुलकीची भावना असते. प्रेम असतं. त्यात खोटेपणा कधीच नसतो. त्यामुळे माझ्या या छोट्याशा पाळणाघरात शनिवार, रविवार अनेक मुलं या मुक्या प्राण्यांसोबत खेळायला येतात. पण आजपर्यंत माझ्या मुलांनी कोणाला त्रास दिला नाही. फक्त प्रेम दिलं.” यातून प्रतिमा अम्मांना आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलांपेक्षा ‘या’ दत्तक मुलांबद्दल असलेला अभिमान सहज कळतो. ४०० कुत्र्यांना सांभाळणे कठीण आहे आणि कुत्रे भूक लागली की प्लास्टिक खातात, हे कळल्यानंतर त्यांनी कचरा वेचण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांना चार पैसेही मिळाले. आणि कुत्र्यांचे वेळोवेळी लसीकरण करणेही सोपे झाले. त्यांच्या या कामामुळे प्रभावित होऊन सुदेश गुहा यांनी प्रतिमा देवींवर एक छोटीशी डॉक्युमेंट्री तयार केली, ज्यामुळे देशातील सगळे लोकं त्यांना ओळखू लागले. त्यांना २०१५ चा ‘ब्रेव्हरी अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. “ ‘माणसांनी माणसांवर प्रेम करावे’ ही आपली संस्कृती असली तरी, ‘भूतदया’ हा आपल्यातील भाव आहे. त्यामुळे निसर्गाने जे दिलं त्या सगळ्या गोष्टींवर आपण प्रेम केलं पाहिजे,” हा अम्मांसारख्या अशिक्षित बाईचा विचार आज लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अशा या भटक्या कुत्र्यांच्या प्रेमळ आईला सलाम...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0