तामिळनाडू व आंध्रप्रदेशला 'गज'चा धोका!

15 Nov 2018 14:21:28



चेन्नई : तामिळनाडू व आंध्रप्रदेशच्या किनारी आज गज चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. तसेच भारतीय नौदल आणि तीस हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.

 

जवळपास १०० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ आज सायंकाळपर्यंत तामिळनाडूच्या पंबन आणि कुड्डलोर येथे धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

 

दरम्यान, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर देखील परिणाम होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता असून मराठवाड्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0