ग्रामस्थांचा पाणीटंचाईतून मोकळा श्वास

06 Oct 2018 12:32:22


 


भिवंडी : तालुक्याच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणीटंचाईतून ‘मोकळा श्वास’ घेता येणार असून, भाजपचे खा. कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने जलसंपदा विभागाने 34 गावांसाठी 8.49 दशलक्ष लिटर वाढीव पाणीकोटा मंजूर केला आहे. या निर्णयामुळे हजारो ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, खा. पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.

 

भिवंडी तालुक्यातील 34 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी 1982 मध्ये योजना सुरू झाली. त्यावेळी एका माणसामागे 40 लिटर याप्रमाणे पाणी पुरविण्यासाठी 11 दशलक्ष लिटर पाणीकोटा मंजूर करण्यात आला. मात्र, 2018 पर्यंत लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतरही केवळ 11 दशलक्ष लिटर पाणी पुरविले जात होते. त्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत होती. वर्षानुवर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाकडे खा. कपिल पाटील यांच्याकडून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला जात होता. या संदर्भात मंत्रालयात बैठकही झाली होती.

 

या टंचाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. त्यानंतर जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्टेमला 8.49 दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याचा आदेश दिला आहे. या संदर्भात 26 सप्टेंबर रोजी स्टेमला निर्देश देण्यात आले. या वाढीव पाणीकोट्यामुळे भिवंडीच्या ग्रामीण भागाची पाणीटंचाई दूर होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे खासदार कपिल पाटील यांनी आभार मानले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0