को जागरति कोजागिरी

22 Oct 2018 19:42:00



आज ‘कोजागिरी पौर्णिमा.’ कोजागिरी पौर्णिमा म्हणजे रात्री चांदण्यात बसायचे, जागरण करायचे, मसाला दूध प्यायचे इ. आपल्याला माहीत आहे. पण, याला शास्त्राधार आहे का? का फक्त एक रूढी चालत आली आहे? यावर प्रकाश टाकणारा आजचा लेख...


‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणजे अश्विन शुद्ध पौर्णिमा. या वेळेस पावसाळा संपून उन्हाळा जाणवू लागतो. यालाच आपण ‘ऑक्टोबर हीट’ म्हणतो. आसमंतातील बदल बघायचे झाले, तर दिवसा खूप उकडते, सूर्यकिरणांनी तापून निघते आणि रात्री थंडावा असतो, आकाश निरभ्र असते, क्वचितच पांढरे शुभ्र ढग असतात, रस्त्यालगत असलेली सप्तपर्ण, कोरांटी (कुरण्टक), जपाकुसुम (जास्वंद), विजयसार इ. वृक्षांना बहर आलेला असतो. पांढऱ्या रंगाची फुले ज्यामध्ये मोगरा, तगर, जाई, जुई इ. ही अधिक बहरतात. दिवसा तापलेले आणि रात्री थंड मंद वारे असतात. खोलगट जामिनीतील पाण्याचे बाष्पीकरण होउन तिथे थोडा चिखल राहतो. उंचवट्याशी पावसाचे पाणी सुकून जमीन संपूर्णपणे कोरडी होते. समतल जमिनीवर सपाट भागावर मुंग्या मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. हे सगळे आसमंतातील बदल शरद ऋतूत घडतात. अश्विन आणि कार्तिक हे दोन महिने मिळून शरद ऋतू होतो. सूर्याचे दक्षिणायन सुरू असते शिशिर-वसंत-ग्रीष्म हे तीन ऋतू म्हणजे उत्तरायण आणि वर्षा-शरद-हेमंत या ऋतूंमध्ये सूर्याची गती दक्षिणेकडे असते. खरंतर सूर्य कुठेच हलत नाही पण, पृथ्वीच्या सूर्यकेंद्रक गतीमुळे (Heliocentric) पृथ्वीच्या दक्षिणेस सूर्य अधिक असतो. यामुळे स्वाभाविकपणे सूर्याच्या किरणांमधील प्रखरता पृथ्वीवर हळूहळू कमी होते. चंद्र अधिक बलशाली होतो. दक्षिणायनाला ‘विसर्ग काळ’ असे म्हटले जाते. कारण, सूर्याच्या स्वाभाविक मार्गसंक्रमणामुळे त्याची तीव्रता कमी होऊ लागते. (वर्षा ऋतूपेक्षा शरद ऋतूत आणि शरदापेक्षा हेमंत ऋतूत सूर्याची प्रखरता हळूहळू कमी जाणवते) यामुळे पृथ्वीवर चंद्राचे बळ अधिक जाणवते. पृथ्वीवर उत्तरोत्तर अधिक सौम्यांश मिळतो व प्राणिमात्रांचे स्वाभाविक बळ वाढते. म्हणून दक्षिणायनाला ‘विसर्ग काळ’ असेही म्हटले जाते. साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर शरीराची रोग प्रतिकारक शक्ती हळूहळू वाढू लागते. पावसाळी संसर्गजन्य होणारे रोगही लोप पावतात. पचनशक्ती सुधारू लागते. म्हणजेच, शरीररुपी बँकेमध्ये बळ, ताकद, प्रतिकारशक्ती जमा होऊ लागते. ऋतूनुरूप आहार (खानपान), विहार (राहणीमान), आचार (वागणूक) केल्यास स्वस्थरुपी बँकेत अधिक बळ जमा होत जाते. दक्षिणायनाचा कर्ता हा चंद्र (सोम) आहे. त्यामुळे वातावरणातील ही तीव्रता हळूहळू कमी होते. चंद्राची किरणे भूमंडलावर पसरून संपूर्ण विश्वाला आच्छादित करतात, तृप्त करतात. ही तृप्तीची अनुभूती चंद्र निर्माण करतो. शरदामध्ये वर्षाकालीन पावसाळा नसतो. पावसाने शरीरात शीतसात्म्यता उत्पन्न होते. सूर्याच्या प्रखरतेने शरीरही तप्त होते. यामुळे आधी जे साठलेले, संचित झालेले पित्त असते, त्याचा शरीरात प्रकोप (वाढ) होतो. हे प्रकुपित पित्त शरीरात राहिल्यास विविध त्रास उद्भवतात. ते होऊ नयेत, टळावेत म्हणून ‘विरेचन’ हे पंचकर्म शरद ऋतूत करून घ्यावे. शरदातील ‘विरेचन’ हे Preventive तसेच Curative अशा दोन्ही पद्धतीचे असते. म्हणजे स्वस्थ व्यक्तीनेही शरद ऋतूमध्ये शरीरशोधनासाठी शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन करून घ्यावे आणि रुग्णाने पित्ताच्या त्रासापासून मुक्तता मिळविण्यासाठीदेखील शरदात विरेचन अवश्य करून घ्यावे. प्रकुपित दोष, वाढलेले दोष शरीरातून काढल्यानंतर त्या-त्या ऋतूनुरूप आचरण केल्यास रोगापासून मुक्त राहणे अधिक सुकर होते. ‘आयुर्वेद’हा आयुष्याबद्दल सांगणारा वेद (शास्त्र) आहे. तो केवळ रुग्णासाठी नाही, तर स्वस्थ व्यक्तींसाठी स्वस्थ राहण्यासाठी, स्वास्थ्य टिकण्यासाठी आहे. त्यामुळे खान-पान, राहणीमान, विचार, इ. सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर विवेचन आयुर्वेदाने केलेले आहे.

 

शरद ऋतूमध्ये ‘साठेसाळी’ (साठ दिवसांमध्ये तयार होणारा भात शेतात तयार होतो. याचाच ‘नवान्न’ म्हणून वापर सांगितलेला आहे.) मूग, दूध, ऊस व यापासून बनविलेले पदार्थ (जसे खवा, साय, साखर इ.) मध, जव, गहू इ .खावे. गहू पचायला जड असतो पण, जसजशी थंडी वाढू लागते. भूकही वाढते आणि पचनशक्तीदेखील उत्तम होते. म्हणून वरील पदार्थ खावेत. चवीला गोड, पचायला हलके, स्वभावाने थंड (कारण शरीरात पित्त वाढलेले असते त्यामुळे त्या गुणांच्या विपरीत अन्नसेवन करावे) किंचित कडू व पित्तशामक अन्नपान असावे. हे अन्न ही भूक असेल तितक्याच मात्रेत (प्रमाणात) खावे. पित्तवृद्धी जसजशी कमी होईल तसतशी भूक वाढू लागते. शरदऋतूत शारीरिक बळ मध्यम प्रतीचे असते (वर्षा ऋतू- हीन (कमी) बळ व हेमंत ऋतू- उत्तम बळ) शरद ऋतूला 'Period of Nutrition / Liberation'’ असेही म्हणतात. भूतलावरच्या पदार्थांमध्येही मध्यम स्नेह व लवण रसाची स्वाभाविक वृद्धी होते. पित्तवृद्धी होते. पित्तवृद्धीमुळे खूप तीक्ष्ण, तेलकट, दही इ. खाऊ नये. पूर्वेकडील वाऱ्यात बसू नये. पूर्वेकडे बंगालची खाडी आहे. इथून वाहणारा वारा दमट असतो. या वाऱ्यात बसल्याने जुनाट संधिशूलाचा (सांधेदुखी) त्रास बळावू शकतो. म्हणून प्राग्वात (पूर्वेकडील वारे) टाळावेत. शरद ऋतूमध्ये ‘हंसोदक’ प्यावे, असे सांगितले आहे. ‘हंसोदक’ म्हणजे काय? तर दिवसभर सूर्यांच्या किरणांनी तापलेले पाणी रात्री चांदण्यात ठेवून थंड करावे. हे असे केल्याने पावसाळ्यातील दूषित पाणी काळ स्वभावाने निर्दोषहोते. अगस्त्य ताऱ्याच्या किरणांनी हे पाणी विषरहित होते. अगस्त्य ताऱ्याचा हा प्रभाव सांगितला आहे. असे पाणी चवीला गोडसर, थंड, बुद्धिवर्धक पवित्र आणि स्फटिकासमान निर्मळ होते. या पाण्याचा वापर पिण्यासाठी आंघोळीसाठी तसेच अवगाहनसाठी (tub bath) करावा. पिण्यासाठी हंसोदकामध्ये चंदन व भीमसेनी कापूर थोडे घालून हे सुवासिक पाणी प्यावे. त्यामुळे तृप्ती, समाधान अधिक होते. त्याचबरोबर पित्तही शांत होते. तजेला वाढतो. शरद ऋतूत पांढऱ्या फुलांचे गजरे, हार घालावेत. स्वच्छ हलकी वस्त्रे परिधान करावीत आणि प्रदोष काळी म्हणजे रात्रीच्या पहिल्या प्रहरी चांदण्यांमध्ये बसावे. शास्त्रात अन्य ठिकाणी लवकर झोपावे असे सांगितले आहे. पण, आल्हाददायी व बळदायी अशा शरद ऋतूत (विशेषत: पौर्णिमेला) पहिल्या प्रहरापर्यंतच फक्त जागायला सांगितले आहे. कारण, चंद्र त्यांच्या परमोच्च सीमेवर असतो आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येतो. वरील सर्व नियम हे स्वस्थवृत्ती असणाऱ्यांच्या पालनार्थ सांगितले आहेत. त्या अनुषंगानेच विभाजन (ऋतूंचेही ) केले आहेत. वरीलप्रमाणे मात्रेत अन्नग्रहण केल्यास बल-वर्ण (ताकद व glow) यांची निश्चित वाढ होते. चला, तर मग कोजागिरी साजरी करूया आणि आरोग्याचे जतन करूया.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0