आता बुद्धही नजरकैदेत!!!

02 Oct 2018 19:07:00


 


चीनमधील लाखो वर्षांपूर्वीच्या दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतातील बुद्ध प्रतिमा ही जगातील सर्वात उंच प्रतिमा मानली जाते. बुद्धांच्या विचाराने आजवर अनेक विद्वानांनी स्वत:ला स्वत:च्या नजरकैदेत ठेवले, मात्र आता गौतम बुद्ध स्वतः नजरकैदेत राहणार आहेत.


शांततेचे प्रतीक म्हणून जगभरात गौतम बुद्धांची ख्याती. त्यांच्या विचारांमुळे त्यांचे जगभरात अनेक अनुयायीही आहेत, तेवढीच जगभरात बुद्धांची असंख्य मंदिरे आणि तेवढ्याच मन थक्क करणाऱ्या प्रतिमा. बुद्धाच्या प्रत्येक मंदिर आणि प्रतिमेची एक वेगळी अशी खासियत. मात्र, चीनमधील लाखो वर्षांपूर्वीच्या दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतातील बुद्ध प्रतिमा ही जगातील सर्वात उंच प्रतिमा मानली जाते. बुद्धांच्या विचाराने आजवर अनेक विद्वानांनी स्वत:ला स्वत:च्या नजरकैदेत ठेवले, मात्र आता गौतम बुद्ध स्वतः नजरकैदेत राहणार आहेत. कारण, चीनमधील सिचुआन प्रांतातल्या या बुद्धमूर्तीला तडे गेले आहेत. त्यामुळे पुढील चार महिने या मूर्तीच्या देखभाल दुरुस्तीचे काम चालणार असून यासाठी बुद्धांची ही प्रतिमा ‘युनेस्को’च्या नजरकैदेत ठेवण्यात येईल. या दरम्यान या प्रतिमेच्या विविध चाचण्याही केल्या जाणार आहेत. आजवर ज्या गौतम बुद्धांनी लोकांना जगण्याचा मार्ग दाखवला, त्यांच्या प्रतिमेकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे या प्रतिमेच्या डागडुजीच्या कामाची जबाबदारी थेट ‘युनेस्को’ने घेतली आहे.

 

चीनमधील लेशान शहराबाहेरच्या भागात ही प्रतिमा एका भिक्षुकाने स्वतः दगडात कोरून घडवली होती. बुद्धांची ही प्रतिमा जवळजवळ २३३ फूट उंच आणि दिसायला अत्यंत सुबक अशी. जगातील सर्वात मोठी बुद्धमूर्ती असलेल्या या मूर्तीच्या निर्मितीसाठी सुमारे ९० वर्षांहून अधिक काळ लागला. या मूर्तीची निर्मिती तांग वंश (६१८ ते ९०७) या राजघराण्याच्या शासनकाळात ७१३ साली सुरू करण्यात आली होती. या मूर्तीला ‘युनेस्को’ने जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित केले. या बुद्धमूर्तीची अनेकदा देखभाल- दुरुस्तीही करण्यात आली. मात्र, बदलत्या हवामानामुळे या बुद्धमूर्तीच्या छाती आणि पोटाकडील भागाला तडे गेले. तसेच काही ठिकाणी ही मूर्ती तुटल्याचे लेशान बुद्ध क्षेत्रातील प्रबंधन समितीने आपल्या अहवालात म्हटले.

 

जागतिक तापमानात झालेल्या वाढीमुळे या प्रतिमेचे विघटन होते आहे की काय, अशी भीतीही व्यक्त होत असताना, बुद्ध आपल्यावर नाराज आहेत की काय असे अनेक तर्क-वितर्कही सध्या चीनमध्ये लढवले जात आहेत. मात्र, सध्या तरी येणारे चार महिने ही बुद्धांची प्रतिमा नजरकैदेत असेल. या लेशान शहरात मोठ्या संख्येने पर्यटक केवळ बुद्धांची प्रतिमा पाहण्यासाठी येतात. मात्र, या चाचण्यांमुळे पर्यटनासाठीसुद्धा चार महिने हा भाग बंद ठेवण्यात येईल. ही बुद्धांची प्रतिमा चीनसाठी एक सांस्कृतिक ठेवा असली तरी, ‘युनेस्को’कडून आता या प्रतिमेचे जतन केले जाईल. याकरिता सांस्कृतिक स्मृतिचिन्हांबाबतच्या तज्ज्ञांच्या निरीक्षणाखालीच या मूर्तीची तपासणी करण्यात येईल. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानही वापरण्यात येईल म्हणजे, बुद्धांच्या या प्रतिमेला नजरकैदेत ३ डी लेझर स्कॅनिंगचा त्रासही सहन करावा लागणार आहे.

 

या पूर्वीही २००१ मध्ये या मूर्तीच्या डागडुजीसाठी सुमारे ३७ दशलक्ष डॉलर्स खर्चाने एक प्रकल्प आयोजित करण्यात आला होता. मात्र, लेशान बुद्ध क्षेत्रातील प्रबंधन समितीने प्रकल्पाकडे विशेष लक्ष न दिल्याने २००३मध्ये या मूर्तीची पुन्हा डागडुजी केली गेली, तर २००७मध्ये हवामान आणि आम्लवर्षावामुळे झालेल्या नुकसानाची दुरुस्ती करण्यासाठी या पुतळ्याला आणखी एक बदल मिळाला. बुद्धांनी आपल्या विचारांनी अनेकांना दिशा दिली, मात्र जगातील त्यांच्याच सर्वात मोठ्या प्रतिमेची ही अशी दुर्दशा झाली. त्यामुळे चीन असेल अथवा आपल्या देशात, अशा पुरातन वास्तूंची, शिल्पांची व्यवस्थित देखभाल करणे ही आपल्याच हाती आहे. कारण, हा केवळ सांस्कृतिक ठेवा नाही, तर मानवी कलाविष्काराचे संचितच आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0