#शक्तीपूजन - आदिशक्तीचा उत्सव

29 Sep 2017 20:52:27

 

त्या त्या वेळेला ह्या ज्योती लावल्या गेल्या, काळोख हळूहळू दूर होत गेला आणि त्याच्या प्रकाशाने आज अनेक आयुष्य उजळली. काही स्वयंप्रकाश होताच, मात्र काजळी दूर करण्याचं कामही महत्त्वपूर्ण!


 

शारदीय नवरात्र, एक आदिशक्तीचा उत्सव! चराचरातील आदिमायेची पूजा करून स्त्री चैतन्याला जागवण्याचा उत्सव! स्त्रीचैतन्य एकाच वेळेस गौरी, पार्वतीसारखं सौम्य तर कधी दुर्गा, चंडीसारखं रौद्र! हे स्त्रीचैतन्य आदिम काळापासून युगानुयुगे निरंतर पूजलं गेलं पण काळाच्या ओघात मात्र त्याचं अखंडत्व केवळ नवरात्रीमध्ये सलग नऊ दिवस दिवा तेवत ठेवून प्रतीकात्मक उरलं. असुरांचा प्रादुर्भाव विचारांमध्ये होत गेला आणि वरचढ झाला तसा स्त्रीलाही त्याचा विसर पडला का? पण आदिम चैतन्य हे कायमस्वरूपी निद्रावस्थेत राहण्याची शक्यता नाही. टाळांचा एकच जागर आवश्यक होता ज्याने ते चैतन्य पेटून उठणार होतं. मागच्या शंभर दोनशे वर्षात अशा निद्रिस्त स्त्रीचैतन्याला जागवणाऱ्या विभूतींविषयक म्हणूनच ही कृतज्ञता. ह्या विभूतींनी वेळीच स्त्रीचं महत्त्व जाणलं, निव्वळ मखरात उरलेलं स्थान प्रत्यक्ष संसारी जगात निर्माण करायला मोलाचा हात दिला आणि नंतर त्यापासून सुरुवात होऊन अनेक सरस्वती, लक्ष्मी, रणचंडीका अवतरत राहिल्या.

 


हा मोलाचा हात पुरुषांनी दिलाच नसता तर त्या अजूनही निद्रितावस्थेत असत्या का? किंवा त्याच्या कुठल्या टप्प्यावर असत्या? सौदीमध्ये नुकताच स्त्रियांना वाहन चालविण्याचा अधिकार देण्यात आलाय आणि असा अधिकार देणारा(?) तो जगातील सर्वात शेवटचा देश म्हणून प्रसिद्ध झालाय. ह्या तुलनेत भारतीय स्त्री आज कुठे असती हा प्रश्न राहून राहून पडतो. असा प्रश्न पडण्याइतपत तिला तिच्या चैतन्याशी ओळख करून देण्याचं काम हे मला कुठल्याही आरतीइतकंच मोठं वाटतं.

 


ज्यांच्यामुळे १८२९ चा सतीप्रतीबंधक कायदा पास होऊन सती कुप्रथेचं निर्मुलन झालं ते राजा राम मोहन रॉय. धर्मातल्या कुप्रथा जाणून त्यासाठी लढा देऊन स्त्रीला मानवी हक्क मिळवून देण्यात त्यांचा बहुमोल सहभाग. हे एक उदाहरण, मात्र त्यामुळे कितीतरी स्त्रियांच्या मनात आपल्या मानवीय हक्कांसाठी जाणीवजागृती होऊन त्याचा फायदा इतर हक्कांसाठी लढण्यामध्ये झाला असेल त्याची मोजदाद अशक्य.

 


ज्योतीराव फुले ज्यांनी १८४८ साली पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरु केली आणि पत्नी सावित्रीबाई फुले ह्यांना त्यामध्ये प्रथम स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळाला. पहिल्या स्त्री शिक्षिका, बालहत्या प्रतिबंधक गृह चालविणे, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध कवितांमधून लेखन हे ज्योतीराव फुलेंची प्रेरणा आणि सहयोग ह्याशिवाय अशक्य म्हटलं तर वावगं ठरू नये. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाने झालेला वटवृक्ष असला तरी त्याचं बीज ज्योतीरावांचंच!

 


नवव्या वर्षी लग्न, चौदाव्या वर्षी मूल होऊन लगेचच दगावणं आणि त्यातून डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न करणं. ही १८८० साली अशक्य वाटणारी गोष्ट! पण ती शक्य झाली ती केवळ पती गोपाळराव जोशी ह्यांच्यामुळे. डॉ. आनंदीबाई जोशी ह्यांनी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. मात्र ह्या सगळ्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणे, त्यासाठी आनंदीबाईंना उद्युक्त करणे, प्रकृति अस्वास्थ्यामुळे आपलं ध्येय मिळवण्यात येणाऱ्या अडचणींमुळे हतबल वाटत असताना त्या वेळोवेळी ज्वलंत ठेवणे आणि ते प्राप्त होण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणे ह्याचा मान मात्र गोपाळराव जोशींचा!

 


साधारण त्याच सुमारास लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे आपल्या साप्ताहिक प्रभाकर मधून स्त्री शिक्षण, बालविवाह, हुंडा, बहुविवाह ह्या प्रथांवर कोरडे ओढून समाजप्रबोधानाचं काम करत होते जी पुढे लोकहितवादींची शतपत्रे म्हणून प्रसिद्धीस आली. राजा राम मोहन रॉय ह्यांच्यासारख्या समाज सुधाराकांचा वारसा चालवत लोकहितवादी ह्यांनी केलेलं जाणीवजागृतीचं काम निर्विवाद मोठं. बालविवाह प्रतिबंध कायदा, हिंदू विवाह कायदा आणि भारतीय दंडविधान ह्यामधील बहुविवाहाच्या तरतुदी ह्यासाठी समाजमन तयार करणं आणि त्यायोगे स्त्रियांच्या उन्नतीसाठी, शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करणं ही एक मोठी भर.

 


स्त्रियांसाठी समान हक्कांचा प्रचार करण्याबरोबरच ज्यांनी स्त्रियांना संस्कृत वा हिंदीमधून वेदपठणाचा व त्यावरील भाष्य वाचण्याचा हक्क ह्यांचाही प्रचार केला आणि ते वाचण्यासाठी स्त्रियांना प्रवृत्त केले हा धर्मसुधारणेची स्त्रीसंदर्भात केलेली आधुनिक क्रांतीच! ती ज्यांनी केली ते स्वामी दयानंद सरस्वती!

 


भारतामध्ये एका बाजूला हे बदल होत होते आणि दुसरीकडे भारतीय तत्त्वज्ञानाकडे विदेशी आकर्षितही होत होते. एका बाजूला गोपाळराव आणि आनंदीबाई जोशींना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला गेला होता आणि दुसरीकडे मात्र मार्गारेट नोबल के स्कॉटीश आयरिश महिलेने स्वामी विवेकानंदांचं शिष्यत्व स्वीकारलं. भगिनी निवेदिता नावानं आपलं संपूर्ण आयुष्य भारतामध्ये अनेक प्रकारच्या सेवाकार्यामध्ये वाहिलं. अशा तर कितीतरी मिशनरीजनी अनेक कार्ये भारतामध्ये केली मात्र भगिनी निवेदितांचं कार्य हे इथल्या भूमीशी नाळ जोडणारं होतं, त्याला अध्यात्मिक स्पर्श होता. दयाबुद्धीतून सेवाकार्य ह्यापेक्षा वेगळी अजून पुढची विवेकानंदांनी दिलेली ती कर्तव्यभावनेची शिकवण होती. विवेकानंदांच्या प्रेरणेने भगिनी निवेदितांनी भारतामध्ये मुलींसाठी शाळा सुरु केल्या, शिक्षणासाठी प्रवृत्त केलं, आपली भाषणे आणि लिखाणाद्वारे परदेशातून भारतामधल्या स्त्री शिक्षणासाठी मदत मागितली, प्लेगच्या साथीत अनेक गरीब रुग्णांची सेवा केली, भारतीय इतिहास आणि संस्कृती ह्यांचा प्रचार केला. आपल्या लेखन आणि भाषणाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना वृद्धिंगत करण्याचं मोठं काम त्यांच्या नावावर आहे. तसंच त्यासाठी योग्य मार्गदर्शन, प्रेरणा देण्याचं पूर्ण श्रेय अध्यात्मिक गुरु म्हणून स्वामी विवेकानंदांकडे.

 


एकूणच समाजातील भेदभावांकडे गंभीरपणे बघत त्याच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न करणारे बाबासाहेब आंबेडकर ह्याचं नाव भारताच्या स्त्रीसक्षमीकरणाच्या इतिहासात इतकं मोठं आहे की त्याची खरंतर तुलनाच होऊ शकत नाही. स्त्रीला कायद्याची ओळख करून देण्याच्या सर्वात महत्वपूर्ण कार्याचे ते मानकरी. हिंदू संस्कृतीचा पाया असलेले मात्र कालानुरूप बदल करून हिंदू कोड बिल पासून ते हिंदू वैयक्तिक कायदे लिहित स्त्रियांसाठी एक कधी न विझणारी ज्योत लावण्याचं हे काम. ते ह्याच संविधानाचे शिल्पकार आणि जनक ज्यामध्ये स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी समता आणि आदर ह्यावर आधारित मूलभूत हक्कांमध्ये अत्यंत आवश्यक अशा तरतुदी आहेत. कायदा आणि प्रत्यक्ष प्रेरणा ह्यामुळे स्त्रियांना आपल्या हक्कांसाठी उपाययोजना निर्माण करणं ह्यामध्ये त्यांचं मोठं योगदान.

 


आपल्या कथांमधून स्त्रीचा तथाकथिक संघर्ष, तिच्यावरचे अन्याय, तिचे लढे, तिचे हक्क अशा कुठल्याही गोष्टीचं भडक चित्रीकरण न करता अत्यंत सौम्यपणे स्त्रीच्या मनाचे भावविश्व उभे करणारे, तिचं प्रेम, तिचा विरह, तिची मैत्री, मोह, द्वेष, श्रद्धा, सूड, तिचे आदर्श, तिचं स्वातंत्र्य, तिची निर्णयक्षमता तिच्या भूमिकेत जाऊन लिहिणारे आणि स्त्रीचं तेज ओळखणारे रवींद्रनाथ टागोर हे स्त्रीला तिच्या आधुनिकतेची ओळख करून देणारे महान लेखक मला वाटतात. सुमारे एका शतकापूर्वी लिहिल्या गेलेल्या ह्या कथांतून भेटणारी कणखर स्त्री आपल्या डोळ्यासमोर आली कि आपण अवाक होतो. त्यातल्या स्त्री पात्रामुळे आणि ज्यांनी त्या काळात तिची अशी प्रतिमा रंगविली अशा काळाच्या शेकडो पावले पुढे असलेले रवींद्रनाथ आधुनिक स्त्रीत्वाचे जनक वाटतात. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथांमधील स्त्री मुलतःच स्वतंत्र आहे आणि त्याची जाणीव तिला खोलवर आहे. साहित्यातून खऱ्या स्त्रीस्वातंत्र्याची आणि सामर्थ्याची जाणीव करून देणं हीदेखील स्त्रीसक्षमीकरणासाठी खूप मोठी गोष्ट मला वाटते.

 


काळाची गरज ओळखून महिलांच्या खासकरून विधवांच्या शिक्षणासाठी भरघोस आणि विधायक कार्य करणारे तसेच विधवाविवाहाच्या प्रसारासाठी स्वतः विधवेशी लग्न करून उदाहरण घालून देणारे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे. विधवांसाठी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आश्रम आणि महिलाश्रम हायस्कूल स्थापना ह्याद्वारे कर्वेंनी केलेली स्त्री शिक्षणाची पायाभरणी आता संस्थेच्या अत्यंत व्यापक अशा स्वरुपात उभी असून ६० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था आणि शाखांद्वारे स्त्री शिक्षणाचा वसा चालवत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांमुळे शिक्षणविषयक निर्माण झालेली स्त्रियांची आस्था सर्वदूर पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महर्षी कर्वेंचे.

 


ह्या नऊ विभूती केवळ प्रतीकात्मक. त्यांची संख्या परिपूर्ण नाही. त्यांच्याबरोबरच अजूनही अशा अनेक हस्ती ज्यांनी वेळोवेळी समाजाच्या विरुद्ध जात रोष ओढवून घेतला, संघर्ष केला. ह्या गोष्टी – स्त्रीचा मूलभूत अधिकार होत्या. पुरुषांच्या बरोबरीने असलेला मानवी हक्क. ह्या सर्वांनीच तो हक्क वेळोवेळी घोषित केला कारण तो दिला असं म्हणणं अयोग्य. तो होताच केवळ जागृत केला. पण ह्या हक्कांच्या पुढे एक पाउल टाकत अजून एक आधुनिक हक्काची घोषणा केली गेली ती म्हणजे कुटुंब नियोजनाची. चूल आणि मूल ह्यामध्येच अडकलेल्या स्त्रीला ‘कुटुंबनियोजन’ ह्या आधुनिक विचारामुळे एक मोकळं अवकाश मिळालं. रघुनाथ धोंडो कर्वे ह्यांनी ह्या सगळ्या हक्कांच्या पुढे जात सीमोल्लंघन केलं. नको असलेल्या गर्भधारणा, त्यामुळे केले जाणारे अशास्त्रीय गर्भपात, कुटुंब सदस्य कमी असण्याकरिता त्यांनी १९२७ ते १९५३ सालच्या दरम्यान समाजस्वास्थ्य ह्या मासिकाद्वारे कुटुंबनियोजन ही संकल्पना पुढे आणली तसेच त्यासाठीची आधुनिक साधने ह्यांचा प्रचार आणि ती उपलब्ध करून दिली. पण केवळ इतकंच त्यांचं कार्य नाही तर पत्नीच्या स्वास्थ्यामुळे स्वतःही मूल न होऊ देण्याचा निर्णय, ह्या कामात पत्नीस प्रेरणा देऊन तिला सहभागी करून घेण्याचं श्रेय त्यांनाच. लिंगसमभाव रुजविण्यासाठी प्रयत्न तर त्यांनी केलेच पण स्त्रीचे स्वातंत्र्य इतक्या टोकापर्यंत मान्य केले की आजही त्यांचे लैंगिक जीवनावरचे विचार आधुनिक वाटू शकतात. कोणत्याही प्रकारे आणि प्रसंगी पुरुष वेश्यांकडूनही स्त्री आपल्या लैंगिक इच्छांचं दमन करून घेऊ शकते आणि हा तिचा अधिकार आहे हा विचार सुमारे १०० वर्षांपूर्वी मांडणं आणि काळाच्या पुढे असणं म्हणजे र. धों. कर्वेंनी केलेलं हे एकप्रकारे सीमोल्लंघनच!

 


त्या त्या वेळेला ह्या ज्योती लावल्या गेल्या, काळोख हळूहळू दूर होत गेला आणि त्याच्या प्रकाशाने आज अनेक आयुष्य उजळली. काही स्वयंप्रकाश होताच, मात्र काजळी दूर करण्याचं कामही महत्त्वपूर्ण! ते ह्या विभूतींनी केलं. त्यांना स्त्रीमधलं आदिम तेज दिसून आलं. ज्यांना त्याची जाणीव झाली तेही त्या तेजाचाच भाग मी मानते. त्याशिवाय इतकं मोठं कार्य हातून होणं अवघड! श्रद्धा, राष्ट्रीयत्व, सेवा, शिक्षण, समाजभान, कुप्रथेतल्या असुरांचा नाश, आदरयुक्त मानवी जीवन जगण्याचा हक्क, त्यासाठीच्या कायदेशीर उपाययोजना अशा अनेक ज्योतींनी आदिमायेची पूजा झाली. नऊ रात्रींचा जागर आणि दसऱ्याचं सीमोल्लंघन झालं!

- विभावरी बिडवे

 

Powered By Sangraha 9.0