विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३३

22 Sep 2017 16:22:07

 


 

मेधाकाकू : काय अवंती... नवरात्राची तयारी झालेले दिसत्ये. घटस्थापना होऊन दुसरी माळ चढली सुद्धा तरी पावसाला उसंत नाहीये कारण, मानवी हस्तक्षेपाने ऋतुमानात झालेले बदल. ‘बदल’ ही एकमेव संकल्पना जी कधीही बदलत नसते, तरीही माणसाच्या स्वार्थ आणि हव्यासापायी झालेल्या अनपेक्षित बदलांमुळे, निसर्ग धोक्याची घंटा वाजवतो आहे. मात्र, आता आपल्या अभ्यासात बदल होतो आहे तो लक्षात घे. आता  ‘निवारा’,  ‘घर’ या दुसऱ्या प्राथमिक गरजेच्या संदर्भातल्या म्हणी-वाकप्रचाराचा अभ्यास पूर्ण करून आपण ‘वस्त्र’ या तिसऱ्या गरजेचा अभ्यास आता सुरु करतोय. याचे कारण इतकेच की नवरात्रीपासून आपल्या उल्हास-उत्साहाला उधाण येते, घराघरांत रंगीबेरंगी कपड्यांच्या खरेदीची लगबग सुरु होते म्हणून आपणही आपला अभ्यास तशाच उत्साहाने करूया...!!

 

अवंती : मेधाकाकू... मस्त-मस्त. दिप्तीबरोबर कालच खरेदीला गेले होते मी, तिने सांगितले असेलच तुला. काय सुरेख नक्षीचे चणीया-चोळी मिळालेत मला आणि दीप्तीला...!! 

 

मेधाकाकू : वस्त्र–अर्थात परिधान याचा अभ्यास आपण शिरोभूषण म्हणजेच टोपी पासून सुरु करुया. आज जसे अनुभवता येते तसेच काही शतकांपासून विविधता ही भारतीय समाजाची प्राथमिक ओळख राहिलेली आहे. आता तुझ्या लक्षात येईल की टोपी हे त्या काळात जसे आपल्या संस्कृतीची ओळख देण्याचे साधन होते तसेच स्वतःचा सन्मान जपण्याचे आभूषण होते. यशस्वी आणि सधन कुटुंबातील गृहस्थ, डोक्यावर टोपी घातल्याशिवाय घराबाहेर पडत नसत. पारसी, मोहमेडन, ज्यू धर्मीय त्यांच्या टोप्यांमुळे आणि सीख आपल्या फेट्यामुळे आपल्या धर्मसंस्कृतीचा परिचय देत असत, आजही देतात. महाराष्ट्रात तर, गांधी टोपी, मुंडासे, फेटा, पंचा, पागोटे आणि पगडी अशी शिरोभूषणे आजही वापरली जातात. अशा या टोप्यांचा संदर्भ म्हणी आणि वाकप्रचारात होणे साहजिकच होते. 

 

 

उघडा बोडका बाळसंतोष

 

अवंती : अरेच्या मेधाकाकू... एकदम बाळसंतोष नावाचा छोटा मुलगा कुठून आठवला तुला ?

 

मेधाकाकू : अवंती... हिच तर गम्मत या आपल्या मराठी लोकसंस्कृतीची. धक्कातंत्र वापरून जोराचा झटका देण्याची ताकद या चार शब्दांत ठासून भरल्ये हे लक्षांत घे. या वाकप्रचारात, हा ‘बाळसंतोष’ नावाचा कोणी छोटा मुलगा नसून, महाराष्ट्रातील एक पारंपारिक भिक्षेकरी ज्ञाती या ‘बाळसंतोष’ नावाने ओळखली जाते, त्याचा संदर्भ आहे हा. दारोदार फिरत जुने-फाटके कपडे भिक्षां म्हणून मागणे हे यांच्या भिक्षा मागण्याचे वैशिष्ट्य. शिजलेले अन्न किंवा धान्य, भिक्षां म्हणून हे ‘बाळसंतोष’ कधीच स्वीकारत नसत मात्र यांचे जुने-पुराणे-फाटके रंगीबेरंगी कपडे, यावरून हे भिक्षेकरी ओळखू येत असत. जुने-फाटके कपडे घालणाऱ्या अशा भिक्षेकऱ्यामधे एक उघडा बोडका बाळसंतोष कधी दिसायचा. अंगावर एकही कपडा नसलेला उघडा आणि डोईवर काहीही नसलेला म्हणजे बोडका. म्हणजे सांभाळायला कोणीही नाही अशा या व्यक्तीकडे भिकेचा का होईना एकही कपडा नाहीये इतका हा निर्धन-गरीब आहे. आता लक्षात घे की समाजातील बेवारस आणि बेवारस व्यक्तीसाठी वापरलेले, “उघडा बोडका बाळसंतोष” हे रूपक आहे. याचे कारण असे की कपड्यांची भिक्षा मागणाऱ्याकडे एकही कपडा नसणे हा यातला भिषण विरोधाभास, या वाकप्रचारात प्रचलित झाला, समाजातल्या टोकाच्या आर्थिक परिस्थितीवर टिप्पणी करतांना काही शतकांपूर्वी वापरला गेला. अवंती, डोके झाकल्या शिवाय समाजात न वावरणाऱ्या लोकांचा, ज्या काळाचा विचार आपण करतोय, त्या सामाजाचा, त्या पध्दतींचा विचार केल्यास या वाकप्रचारातील विरोधाभास अलंकाराचे महत्व तुला नक्की जाणवेल. तत्कालीन समाजाच्या विलक्षण निरीक्षण कौशल्याचा आणि भाषा संपदेचा हा सर्वोत्तम नमुना. पोटापाण्याचे अन्य व्यवसाय स्वीकारल्यामुळे, अलीकडे हे ‘बाळसंतोष’ भिक्षा मागताना दिसत नाहीत.    

 

अवंती : मेधाकाकू... हे थरारक आहे आणि तू त्यातलं गंभीर वास्तव ज्या प्रकारे उलगडतीयेस ती परिस्थिती आणि ते भाषा कौशल्य मी थक्क झाल्ये आज...!!

 

मेधाकाकू : अवंती, आता ऐक... पुन्हा एक टोपी पुराण.. निव्वळ महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तर लक्षात येते की; गांधी टोपी, मुंडासे, फेटा, पंचा, पागोटे आणि पगडी अशी शिरोभूषणे बघितली तर त्याच्या पुढच्या मागच्या बाजूचा आकार खूपच वेगळा असतो. मात्र साधारण तीनशे वर्षांपूर्वी भारतात आणि महाराष्ट्रात आलेल्या पोर्तुगीज, डच आणि इंग्लिश व्यापाऱ्यांच्या त्रिकोणी टोपीने आपल्या मराठी वाकप्रचारात जणू हक्काची जागा पटकावली. या टोपीच्या विशेष आकारामुळे, या व्यापाऱ्यांना ‘टोपीकर’ असे संबोधन सुद्धा वापरले गेले. अशा त्रिकोणी टोपीची गम्मत ऐक आता...!!  

 

 

तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच

साधारण या सारखाच मथितार्थ सांगणारी हा गुजराती बोलीतला मराठी वाकप्रचार.  

 

अंग्रेजी टोपी जेम फेरवो तें सिधी

या त्रिकोणी किंवा तीन कोनाच्या टोपीची गम्मत अशी आहे की याला बाजू सुद्धा तीनच असतात आणि त्याची रुंदी-उंची एकसारखी असते. या आकारामुळे टोपी फिरवली तरी त्याची मागची-पुढची बाजू कुठली ते आपल्याला समजू शकत नाही. राज्यकर्त्या मराठ्यांनी, या परदेशी व्यापाऱ्यांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या पक्क्या व्यवहारी आणि काहीशा लबाड वृत्तीचा, गोड बोलण्याचा अंदाज आला. आपल्या फायद्यासाठी मते आणि पक्ष बदलण्याच्या त्यांच्या व्यवहारांत एक निश्चित तत्व किंवा धोरण कुठेही दिसेना. कदाचित तेंव्हापासून, हा वाकप्रचार मराठीत प्रचलित झाला असावा. खरे म्हणजे आत्ताच्या घडीला, अशा तत्वशून्य आणि लबाड-फसव्या राजकारण्यांसाठी हे रूपक वापरले जाते. 

 

अवंती : मेधाकाकू, आज एकदम पार माझ्या डोक्यावरची  टोपीच उडवलीस की..  मात्र आज मी तुला पुणेरी पगडी देऊन सन्मानित करणारे. इतकी माझी आवडती गुरु खास आहे...!! 

 

- अरुण फडके

 

 

Powered By Sangraha 9.0