शाळेचा रस्ता

12 Aug 2017 12:59:43


 

 
शालेय वयात मला जर थोडी सूट मिळाली असती ना, तर मी शाळा सोडून दिवसभर रानात हुंदडले असते. झाडांवर चढले असते. काठीने मातीत रेघोट्या मारल्या असत्या, अन् दिवस मावळ्याच्या वेळेला घरी आले असते. पण, काय करणार ? घरचे संस्कार आड आले.

शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शाळेची नावड! पहिलीत असतांना, मी आणि माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे असलेली मैत्रीण क्षितिजा, “आज उशीर झालाय, आता शाळेत गेलो की छडी मिळेल.” असे म्हणून शाळेत न जाता, वाटेतल्या एका जुन्या गोठ्यात खेळत बसलो. पण वेळ जाता जाईना. मग परत घरी आलो. घरी पोचल्यावर, पप्पांनी मला पुन्हा शाळेत नेऊन सोडले. फार वाईट वाटले. घरच्यांच्या ‘रोज शाळेत जायला हवे’ या अपेक्षे विरुद्ध माझे शाळा बुडवायचे विविध प्रयोग! बरोबर शाळेच्या वेळेला उद्भवणाऱ्या पोटदुखीच्या व्यथेचे लवकरच हसे झाले. आणिक काही प्रयोग फसले. मग एक दिवस साक्षात्कार झाला. शाळेतून सुटकेचा राजमार्ग मिळाला. तो म्हणजे - दहावी पास होणे!

शाळा आवडली नाही तरी, शाळेच्या रस्त्याशी दोस्ती होती! दगड गोट्यांचा, पांढरट मातीचा रस्ता. आजूबाजूला माळरान. पलीकडे एक दोन पडकी घरे. चढ उतारचा, वळणा वळणांचा रस्ता चालता चालता अचानक एका ओढ्यापाशी थबकायचा. मग ओढ्यातल्या दगडां वरून उड्या मारत पलीकडे गेलं की पुन्हा बोट धरून पुढे घेऊन जायचा. वाट संपण्यासाठी पक्ष्यांचे आवाज ऐकवयाचा, खेळायला दगड गोटे द्यायचा. आणि हसत खिदळत शाळेत जाणाऱ्या पाखरांच्या थव्याला, थेट शाळेच्या मागच्या गेटात नेऊन सोडायचा.

ह्या मागच्या गेटला दोन मोठे लोखंडी दरवाजे होते. पटकन निसटून जायला बाजूला लहानसे फाटक ही नव्हते. गेट मधून आत जातांना बंदिस्त ठिकाणी जात असल्यासारखे वाटे. इथून पुढे एक अनाकलनीय विश्व सुरु व्हायचं. (अनाकलनीय कारण इथे काहीच शिकवलेलं कळायचंच नाही.)

शाळेच्या मागच्या आवारात एक जुनी दगडी चर्च होती, की चर्चच्या आवारात शाळा होती? कोणास ठाऊक. गेटातून आत शिरलं की आधी चर्च लागायची.

उंच छतामुळे, आतून चर्च खूप मोठी वाटायची. त्या उंच पोकळीत स्टेन्ड ग्लासच्या खिडक्यां मधून निळसर पिवळसर प्रकाशाच्या रेघा यायच्या. आणि एक निरव शांतता पसरलेली असायची. चर्चच्या मध्यभागी एक उंच पुतळा होता. कृश येशूचा क्रुसावर चढवलेला अत्यंत करूण पुतळा. पांढऱ्या शुभ्र मार्बलच्या शिल्पातले क्रौर्य पाहून – पोटात कसंस व्हायचं, शांतता भीषण वाटायची, पोकळी अंगावर यायची आणि अंधार अजून गडद व्हायचा. “कोणी केलं त्याला असं? का केलं? मग तो पुतळा इथे का ठेवला?” असे कितीतरी “का?” ने मन अस्वस्थ होत असे.

चर्चच्या समोर सदैव फुललेल्या गुलाबाच्या बागेला सुद्धा मनातली अस्वस्थता कधी कमी करता आली नाही.

बागेच्या पलीकडे, वीस एक पायऱ्या उतरल्या की, शाळेची इमारत. भव्य, स्वच्छ, नीटनेटकी आणि एकदम शांत. तिथल्या बॉब कट केलेल्या, स्कर्ट, मॅक्सी किंवा बॉबी पॅंट परिधान करणाऱ्या ‘miss’. तेल लावून वेण्या घातलेल्या आम्हा मुलींना त्या परग्रहावरच्या वाटायच्या. त्यात आणि त्या इंग्रजीत बोलायच्या! त्यांच्या वेशभूषेने आणि भाषेने आम्हाला परकं केलेलं.

शाळेत काहीच आवडण्यासारखे नव्हते असे नाही. काही आवडणाऱ्या गोष्टी पण होत्या – उन्हाळ्याची सुट्टी, नाताळाची सुट्टी आणि नाताळात घोडागाडीतून चोकलेट वाटणारा सॅंटा क्लॉस!

मी तिसरीत असतांना पप्पांची बदली पुण्याला झाली. मग नवीन शाळा!

या लहानशा शाळेत pindrop silence वगैरे काही नाही, नुसता मच्छी बाजार! असं इथल्या teachers म्हणायच्या! पण शाळा इंग्रजी असली, तरी वळण मराठी! शाळेत दही हंडी, भोंडला असे मजेदार उत्सव साजरे होत. आणि सुट्ट्या तर कित्ती! गौरी – गणपतीला सुट्टी, दिवाळीला मोठी सुट्टी आणि नाताळाला पण लहानशी सुट्टी. आणि इथे सुद्धा सॅंटा क्लॉस यायचा! शिवाय शाळा सकाळची असल्याने, गृहपाठ आटोपला की पूर्ण दुपार माझीच असे. पण इतक्या सुट्ट्या देऊन, सण समारंभ करून सुद्धा शाळा काय आवडली नाही ती नाहीच!

या शाळेत जाणारा रस्ता मात्र अगदीच सरळसोट होता. गुळगुळीत, काळाकुट्ट डांबरी रस्ता. रहदारीचा, वर्दळीचा आणि खूप वाहनांचा. कुणाशी घेणं देणं नसलेला. कोरडा. या रस्त्याला कधी शाळेतलं हितगुज सांगावस वाटलं नाही. त्याच्याशी कधी साध्या गप्पा पण झाल्या नाहीत. उलट तो ओलांडताना उलुश्या मुठीत जीव धरून पळावे लागे.


नाही म्हणायला एकदा हा रस्ता रुंद करायला काढला, तेंव्हा टाकलेल्या खडी मध्ये चिक्कार चमकणारे दगड होते. रोज शाळेतून येतांना, दप्तरातून ८-१० दगड मी गोळा करून आणत असे. घरात लहानशी पेटीभरून दगड जमवले होते. एखाद्या रविवारी तो खजीना काढून, पाण्यात धुवून, उन्हात वाळवून, मोजून, निरखून पुन्हा पेटीत बंदिस्त करत असे. पुढे रंगीबेरंगी पिसांसाठी, मोर पिसांसाठी, जाळीदार पिंपळ पानासाठी, Jungle Book च्या stickers साठी, तो रस्त्याने दिलेला खजीना रिता झाला.

असो! एक एक करत एकदाची दहावी होऊन मी शाळेतून सुटले! शाळा संपल्याचा आनंद फक्त मलाच झाला होता असे नाही, बहुतेक शाळेला पण झाला असावा! शाळेने मला शाळा सोडल्याचा दाखलाच दिला! लेखी!

११ वी, १२ वी क्लास जास्त आणि कॉलेज कमी असे करून संपले (एकदाचे). आणि मग गरवारे कॉलेजात संगणक शाखेत अध्ययन सुरु झाले.

कॉलेजला जाणाऱ्या रस्त्याने हमसफर सहाद्यायी दिले. ( इथे ‘हमसफर’ म्हणजे project, submissions, assignments मध्ये बरोबरीने ‘suffer’ होणारे लोक्स. ) तर आम्ही तिघी मैत्रिणी, आपापल्या सायकली घेऊन ठराविक ठिकाणी भेटत असू. आणि मग एका ओळीत  अखंड बडबड करत कॉलेजच्या सायकल स्टॅंडला कसे पोचायचो ते त्या रस्त्याला सुद्धा कळले नसेल! इतके काय बोलायचो काय माहित? एकदा शिल्पाने ‘दिल है के मानता नही’ ची अख्खी गोष्ट सांगितलेली आठवतेय. अगदी बारीक सारीक तपशिलांसह, डायलॉग सकट सांगितली होती! आणि एकदा ज्योतीने Mercury Transit बद्दल हवेत आकृत्या काढून दाखवले होते. सायकल चालवतांना!  

कॉलेज मध्ये आवडत्या विषयाचे अध्ययन सुरु झाले, तेंव्हा कुठे माझी अभ्यासाशी गट्टी जमली. मग लावलेल्या पुस्तकांबरोबर reference पुस्तकांची पण पारायणे केली. अध्यापकांशी चर्चा करून अजून अजून समजून घेण्यात मजा यायला लागली. प्रयोगशाळेत तास अन् तास पडीक राहण्यात धन्यता वाटू लागली. आणि अवघड गणिते वेगवेगळ्या प्रकाराने सोडवण्यातच सगळा आनंद सामावला आहे असे वाटू लागले.

कॉलेजने मला खूप खूप दिले – एक तर शिक्षणा बरोबर, जीवाभावाच्या मैत्रिणी दिल्या. कॉलेज सोडल्याचा दाखला न देता, डिग्री दिली. आणि आजन्म विद्यार्थी राहण्याचा आशीर्वाद दिला!     

 

- दिपाली पाटवदकर 

 

Powered By Sangraha 9.0