नवरा फ्रीज उघडतो....

01 Aug 2017 17:10:23


“अग, ही बघ १८५७ मधली भाजी राहिलीये ह्या वाटीत!”, नरेन. फ्रीज मध्ये डोकं असल्याने त्याचा आवाज घुमतो.

“नाही का त्या रात्री, अचानक मित्रांनी तुला पार्टीला नेले? अगदी तुझी इच्छा नसतांना, तुला ओढून नेले. आणि तू पण डायट म्हणून फक्त सूप आणि सलाड खाल्लेस? त्याच रात्रीचा हा उर्वरित भाग आहे!”, मी.    

ध्यानीमनी नसतांना एखाद्या सकाळी उठून, काहीही कारण नसतांना नवरे लोक फ्रीज का उघडतात, ते देवच जाणे! 

“अग, हे वाटीभर वरण, आणि ही परवाची मेथीची भाजी आहे. ती टाकून देतो.” माझ्या आधीच्या कुत्सित बोलण्याकडे अजिबात लक्ष न देता स्वारी आपल्या ध्येयाकडे अविचलपणे वाटचाल करत असते. आज फ्रीज स्वच्छ करायचा त्याने चंगच बांधला असतो.

उरलेले मुगाचे वरण आणि मेथी घालून पराठे करायचा माझा नाश्त्याचा बेत रसातळाला जातांना मी निरुपायाने पाहते. असे पराठे नाहीतर थालीपीठ म्हणजे (कुणाच्याही लक्षात न येता) शिळे संपवायचा हमखास उपाय. पण तो बेत सांगितला तर माझ्या खुसखुशीत पराठ्याचे गुपित कळेल, आणि मग कधीही पराठा खातांना “आपण शिळे अन्न खात आहोत” असे वाटत राहील. म्हणून मी मुग गिळून गप्प बसते.

“आणि हे बघ हा expire झालेला सोया सॉस. हा पण फेकून देतो.” नरेनची ध्येयाकडे घोडदौड चालू असते.

लेक कधीतरी ‘चायनीज’ कर म्हणून मागे लागली, की घरात सोया सॉस, अजिनोमोटो, चिली सॉस यांची एन्ट्री झाली असते. एकदा चीनी पदार्थ करून झाल्यावर पुन्हा करायची वेळ येईपर्यंत या सामनातील काही जण स्वर्गवासी तर काही जण वैकुंठवासी झाले असतात. मग पार्थिवाची विल्हेवाट लावून पुन्हा नवीन आणावे लागतात. असंच ice-cream आणि cake आणि pizza अशा पदार्थांच्या बाबतीत होते. वर्षातून एकदा असली ( थेरं ) करण्यापेक्षा सरळ हे पदार्थ बाहेर जाऊन खाऊन यावेत! अजिबात वाया जात नाहीत. (आणि चवीला पण उजवे असतात!)

“तीन पातेल्यांमध्ये दही आहे. ते सगळ एकत्र करतो!” नरेनच्या वाक्याने मी पुन्हा वर्तमानात येते.

“अरे पण एकाची कढी करायची आहे, आणि दुसरं एक आंबट आहे ते धपाट्यात घालून आधी संपवायचे आहे!” हे बोलून व्हायच्या आत तिन्ही दह्यांचा रुचकर संगम झाला असतो.      

इतक्यात एका जुने झालेल्या सुरकुतलेल्या जीर्ण गाजरावर नरेनची नजर पडते. मग शेपटीला धरून मेलेला उंदीर नाचवल्या सारखं ते गजर नाचवून नरेन म्हणतो, “आपल्याकडे अन्नाला काही किंमतच नाही! किती वाया जाते अन्न! छे!”

खरेतर जगात कोणतीच system अशी नाही की जिथे १००% utilization होते. स्वयंपाकघरात सुद्धा थोडफार तर वाया जातच. पण आता cheif auditor समोर काय बोलणार? चोरी तो पकडी गई है! एका Non-compliance ची नोंद घेऊन मी गुपचूप झाडांना पाणी घालायच्या निमित्ताने स्वयंपाकघरातून निसटते.

सर्वसाधारणपणे फ्रीज हा असाच असतो. थोड्या ताज्या भाज्या, थोड शिळेपाके. माझे काका त्याला शीत - कपाट न म्हणता ‘शिळ – कपाट’ म्हणायचे आणि एके दिवशी त्यांनी शिळ्याला कंटाळून फ्रीज चक्क बंद करून टाकला! एकदा त्यांच्या घरी गेल्यावर पाणी पिण्यासाठी म्हणून फ्रीज उघडला तर आत नीट घडी करून ठेवलेल्या कपड्यांचे ढीग! माझा ‘आ’ पाहून काकूंनी त्यांची “दर्द भरी दासतां” सांगितली ... त्यांना कसं रोज भाजी आणावी लागते, रोजच्या रोज संपवायला लागते, आणि दह्या-दुधाचे प्रश्न वेगळेच! पण काकांनी मात्र त्यांचा प्रयोग कसा यशस्वी आहे ते सांगितले. त्यांना रोज ताजं – ताजं खायला मिळत होते! काकूंबरोबर भाजी आणायच्या निमित्ताने रोज फिरायला जाणे होत होते. शिवाय काकांचे अधून-मधून फ्रीज स्वच्छ करायचे कष्ट देखील वाचले होते!

अगदी गावाला जातांनाच काय तर तो फ्रीज आतून बाहेरून एकदम रिकामा आणि स्वच्छ होतो. स्वच्छ फ्रीज म्हणजे एक तर लोक गावाला जाणार आहेत नाहीत तर कालच गावाहून परत आले आहेत असे समजावे. आणि तसं नसेल तर फ्रीज तरी नवीन असतो नाहीतर बायको तरी नवीन असते! 

नवऱ्याने कोणत्याही मुहूर्तावर फ्रीज उघडला तरी तो असाच जुन्या खाद्यपदार्थांनी भरलेला दिसणार. आणि मग, “मी फ्रीज स्वच्छ केला नाही, तर तो कधीच स्वच्छ होत नाही!” हा समज आणखीन दृढ होणार. तसाच आताही झाल्यावर नरेन समाधानाने अंघोळीला जातो. काहीच शिळ – पाके उरले नसल्याने मी नाश्त्याला मस्त गरम गरम फोडणीचे पोहे करते. आणि पहिला घास खातच नरेनने फ्रीज स्वच्छ केल्याचे चीज झाल्यासारखे वाटते!  

- दिपाली पाटवदकर 

Powered By Sangraha 9.0