आज वटपौर्णिमा. मी शहरापासून थोडी दूर, गावात राहते. मी राहते तिथे आजही बायका नटून थाटून वडाला सूत गुंडाळायला जातात. वडाची पूजा केल्याने सात जन्म हाच पती मिळतो ह्या कथेवर जरी माझा विश्वास नसला तरीही मला हा सोहळा बघायला मनापासून आवडतो. विशेषतः एखाद्या जुन्या, डेरेदार, प्रचंड मोठे खोड आणि खाली दगडी पार बांधलेल्या वडाच्या झाडाखाली सुंदर रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या स्त्रिया एकत्र आलेल्या बघणं हा एक खूप सुंदर, चित्रदर्शी अनुभव आहे.
आपल्याकडच्या सर्वच सणांमागे सहसा निसर्ग पूजेचं गुपित दडलेलं असतं. वटपौर्णिमा तरी ह्याला अपवाद कशी असेल. वटपूजेचे प्रयोजन मुळात वृक्षपूजेचे आहे, त्यातही वडाचे झाड मोठे असते, सदाहरित असते, मुबलक प्राणवायू देते. त्याच्या आधाराने पक्षी जगत असतात. रस्त्याच्या कडेला वडाची झाडे लावली तर भर उन्हाळयात देखील गार सावली मिळते त्यासाठी वडाचे झाड कुणी तोडू नये म्हणून ह्या वटपौर्णिमेच्या पूजेचा संकल्प केला गेला असावा. तशीही आपल्या संस्कृतीत वड, पिंपळ आणि औदुंबर ही तीन झाडे सहसा तोडत नाहीत. ही झाडे तोडली तर वंशक्षय होतो अशी समजूत भारतातल्या जनमानसात आजही रूढ आहे. ही तिन्ही झाडे खास आपल्या देशातली आहेत, आपल्या संस्कृतीत रुजलेली आहेत म्हणून असेल कदाचित. मी मागे कुठेतरी वाचले होते की वडाच्या झाडाला संस्कृतमध्ये न्यग्रोध म्हणतात. खाली खाली वाढत जाणारा असा या शब्दाचा अर्थ आहे. वटवृक्षाला अक्षय्यवृक्ष असेही म्हणतात कारण त्याचे मूळ खोड जरी कालांतराने मृत झाले तरीही वडाच्या फुटणाऱ्या पारंब्या वाढून जमिनीत शिरतात आणि त्यातून नवी खोडे तयार होतात पण वृक्ष सहसा मृत होत नाही. ह्या वृक्षाप्रमाणेच आपला वंशही खंडित न होता निरंतर वाढत जावो अशीच काहीशी भावना ह्या वृक्षाची पूजा करण्यामागे असावी.
मुळात वडाचं झाड दिसतंच किती सुंदर. ओबडधोबड, पारंब्यांनी वेढलेलं खोड, जाड, गोलसर, सदा हिरवी असणारी पानं आणि मधूनच डोकावणारी लालचुटुक फळं. वडाच्या झाडावर सदैव पक्षी वस्तीला असतात. पुण्यात एकेकाळी खूप वडाची झाडे होती. फर्ग्युसन रस्ता आणि सिंहगड रस्त्यावर तर मोठमोठ्या डेरेदार वडाच्या झाडांच्या रांगांच्या रांगा होत्या. आज दुर्दैवाने शहरीकरणाच्या आणि अनिर्बंध विकासाच्या लाटेमध्ये ही सगळी झाडे निर्दयपणे कापली गेलेली आहेत. पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये मात्र सुदैवाने अजूनही अशी बरीच मोठी, डेरेदार वडाची झाडं शिल्लक आहेत. पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीकडून खाली एलिस पार्ककडे जाणारा रस्ता तर त्यावरच्या वडाच्या कमानींमुळे आजही एकाद्या वेदकालीन आश्रमातल्या रस्त्यासारखा दिसतो. जंगलीमहाराज रस्त्यावर पाताळेश्वर गुंफांच्या कडेलाही एक सुंदर, खूप मोठा वटवृक्ष आहे. कॅंपमध्येही अजूनही रस्त्याच्या कडेला लावलेली बरीच वडाची झाडे शिल्लक आहेत. पाषाणच्या रस्त्यावरही एनसीएलच्या परिसराजवळ एक खूप मोठं वडाचं झाड आहे ज्याच्या पारंब्या इंग्रजी एमच्या आकारात दिसतात साधारण. ही सगळी वडाची झाडं माझ्या रोजच्या ओळखीची आहेत, त्यांना बघितलं की माहेरचं एखादं वडीलधारं माणूस भेटल्याचा आनंद होतो मला. वटवृक्ष म्हणजे फायकस बेंगालेन्सिस भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे ते उगाच नाही.
इंग्रजीमध्ये वडाच्या झाडाला बनियन ट्री असे म्हणतात. ते नाव ह्या झाडाला कसे पडले ह्याची आख्यायिका मजेदार आहे. गुजरातीमध्ये बनिया म्हणजे व्यापारी. पूर्वी भारतात गावागावातले आठवडा बाजार हे एखाद्या वडाच्या झाडाखाली भरवले जात. त्यामुळे ज्या झाडाखाली ‘बनिया’ लोक म्हणजे हिंदू व्यापारी जमतात तो बनियन ट्री असे ह्या झाडाचे नाव इंग्रजांनी रूढ केले. वडाचा चीक औषधी असतो असे म्हणतात. माझ्या आजोबांचे गुढघे संधिवाताने दुखायचे तेव्हा ते त्यांना वडाच्या पारंब्यांचा चीक लावून बसायचे. त्याचा त्यांना बराच फायदाही झाला होता, सूजही उतरली होती. भारतात अजूनही बऱ्याच ठिकाणी प्रचंड मोठा विस्तार असलेले वटवृक्ष अस्तित्वात आहेत. आंध्र प्रदेशमध्ये तिमन्ना मारीअम्मनू ह्या नावाने प्रसिद्ध असलेला महाकाय वटवृक्ष हा गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदीनुसार जगातला सगळ्यात मोठा वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार जवळ जवळ साडेचार एकरच्या परिसरात पसरलेला आहे. कोलकात्याच्या बॉटनिकल गार्डनमधला ४०० वर्षे जुना वटवृक्ष, चेन्नईचा अड्यार येथील ४५० वर्षांचा वटवृक्ष, बंगळूरजवळच्या रामोहळ्ळी इथला दोड्ड अळद मारा ह्या नावाने ओळखला जाणारा ४०० वर्षांचा वटवृक्ष आणि भडोचजवळ नर्मदेच्या पत्रातल्या एका बेटावरचा संत कबीरांच्या वास्तव्याने पुनीत झालेला कबीरवट हे भारतातले काही प्रसिद्ध मोठे वटवृक्ष, मुद्दाम जाऊन भेट द्यावेत इतके सुंदर आहेत. वटवृक्षाशी भारतीयांच्या धार्मिक भावना जखडल्या गेल्या असल्यामुळेच हे वृक्ष अजून जिवंत आहेत.
दुर्दैवाने आजकाल अनिर्बंध शहरीकरणाच्या रेट्यामध्ये जुने वृक्ष खूप झपाट्याने जमीनदोस्त होत आहेत. त्यात वटपौर्णिमेसाठी म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या वटवृक्षाच्या पारंब्या तोडून त्या घरात आणून त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी तर मी असं ऐकलंय की प्लॅस्टिकच्या वटवृक्षाची पूजा वटपौर्णिमेला केली जाते. अशी पूजा करणे म्हणजे वटपौर्णिमेच्या पूजेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासण्यासारखे आहे. माझ्या एका मैत्रिणीच्या सासूबाईंनी त्यांच्या घरी कुंडीत वटवृक्ष लावलाय. आहे छोटासाच पण त्याच्या त्या इवल्या पारंब्या छान दिसतात. मैत्रिणीच्या सासूबाई म्हणतात की पूजाही होते, फुकट प्राणवायूही येतो घरात आणि त्या इवल्या वृक्षाला फळं आली की ती खायला म्हणून खूप पक्षी किलबिलत येतात त्यांच्या बाल्कनीत. कुठल्यातरी तोडून आणलेल्या सुकलेल्या पारंबीची पूजा करण्यापेक्षा हे बरं नाही का?
नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावे ह्या साठी वटसावित्रीचे व्रत करावे अशी जनमानसात श्रद्धा आहे. पण मलातरी ह्या व्रतामागे सत्यवानापेक्षा सावित्रीच्या चातुर्याचाच गौरव जास्त दिसतो. सावित्री आणि सत्यवानाची कथा महाभारतात येते. सावित्री ही त्या कालच्या पंजाब प्रांताच्या राजा अश्वपतीची मुलगी, अत्यंत बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वतंत्र प्रज्ञेची. जेव्हा तिचा विवाह करायची वेळ येते तेव्हा ती वडिलांना स्पष्ट सांगते की माझा पती मी स्वतः निवडेन. वडिलांच्या इच्छेविरुद्ध ती अत्यंत गरिबीत राहणाऱ्या सत्यवानाची निवड करते, तो अल्पायुषी आहे ह्याची पूर्ण कल्पना असूनदेखील. सत्यवान कुशाग्र बुद्धीचा, सर्वशास्त्र पारंगत आहे ह्याची त्याच्याशी चर्चा करून खात्री केल्यावरच सावित्री हा निर्णय घेते. सत्यवान राजा द्युमत्सेनाचा मुलगा असला तरी त्याचे वडील अंध असतात आणि पदच्युत झाल्यामुळे जंगलात राहात असतात.
आपल्या वडिलांकडचे सारे राज्यवैभव सोडून सावित्री सत्यवानाबरोबर जंगलात राहते. तिचे आणि सत्यवानाचे सहजीवन खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध असते. पुढे सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ येते आणि मृत्युपाश टाकून त्याचे प्राण घेण्यासाठी स्वत: यमधर्म त्या अरण्यात येतो. सावित्री त्याच्या पाठोपाठ जाते आणि आपल्या तीव्र बुद्धिमत्तेने यमाशी युक्तिवाद करते. तिच्या चिकाटीने प्रसन्न झालेला यम तिला 'नवऱ्याचे प्राण सोडून काहीही माग' असा वर देतो आणि ती अत्यंत चातुर्याने आपल्या आईसाठी मुलं, सासऱ्याला दृष्टी आणि राज्य आणि स्वतःसाठी सत्यवानासह सौख्य आणि मुलं मागून घेते. आधीच वचन दिलेले असल्यामुळे यमाचा नाईलाज होतो आणि तो सत्यवानाचा प्राण परत देतो अशी ही गोष्ट. ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. अरुणा ढेरे ह्यांच्या मते निर्णयस्वातंत्र्य, स्वतःहून अंगावर घेतलेली जबाबदारी शेवटपर्यंत निभावणं, बुद्धीचातुर्य आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची हिंमत हे सगळे गुण अंगी असलेली सावित्री ही आजच्या आधुनिक स्त्रीपेक्षा कुठल्याही गोष्टीत कमी पडत नाही. अश्या ह्या चतुर सावित्रीच्या निर्णयाचे कौतुक करणारा हा सण लोकपरंपरेने निव्वळ पतीच्या दीर्घायुष्याशी जोडून खरंतर त्याचे महत्व कमीच केले आहे.
सावित्रीचा यमाबरोबरचा संवाद वडाखाली होतो म्हणून वडाची पूजा करायची असा संकेत आहे. मृत्युपाश आवळणाऱ्या यमधर्माचे प्रतीक म्हणूनच कदाचित वटवृक्षाभोवती सूत गुंडाळले जात असावे. आंधळ्या श्रद्धेपोटी तोडून आणलेल्या वडाच्या पारंब्यांना सुताचे दोरे गुंडाळण्याऐवजी सावित्रीच्या तेजाचे, चातुर्याचे आणि धाडसाचे प्रतीक म्हणून प्रतिवर्षी ह्या दिवशी एखाद्या वडाच्या झाडाची लागवड करून नवरा-बायको दोघांनीही मिळून समृद्ध सहजीवनासाठी हा सण एकत्र साजरा करायला काय हरकत आहे?
- शेफाली वैद्य