डॉक्टर बंग तुम्ही सुद्धा?

08 Jun 2017 21:07:02
 
 
 
 
चांगले काम करणार्‍यांचे कौतुक व्हायलाच हवे, यात काहीच शंका नाही. मात्र, डॉ. बंग जसा विचार स्वातंत्र्याबाबत प्रश्न उपस्थित करीत आहेत, तसेच प्रश्न त्यांनी त्यांच्या लाडक्या एनडीटीव्हीलाही विचारावे. पत्रकारितेच्या कुठल्या आचारसंहितेत एक व्यक्ती आणि विचारधारेचे सातत्याने प्रतिमा भंजन करण्याचा निकष बसतो ? नरेंद्र मोदींना नरराक्षस ठरविणारी हीच मंडळी होती.
 

 
डॉ. अभय बंग आणि त्यांच्या सुविद्य पत्नी राणी बंग यांना उभा महाराष्ट्र त्यांच्या सामाजिक कामासाठी ओळखतो. गडचिरोलीसारख्या अत्यंत दुर्गम जिल्ह्यात काम करून बालमृत्यू सारख्या दुर्दैवी समस्येवर त्यांनी केलेले काम नक्कीच वंदनीय व अनुकरणीय आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतभर त्यांच्या कामाची चर्चा होत असते. ‘डब्ल्यु.एच.ओ’ व ‘युनिसेफ’सारख्या जागतिक स्तरावर काम करणार्‍या संस्था त्यांच्या कामाचे मॉडेल जगभरात आवश्यकता भासेल तिथे राबवत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी आपण त्यांना जितके सलाम करावे तितके कमीच आहेत. पण डॉ. अभय बंग यांची आता एक नवीन ओळखही करून द्यावी लागेल, असे संकेत मिळत आहेत. नागपूर येथील एका पुरस्कार सोहळ्यात देशात विचार स्वातंत्र्यांची गळचेपी होत असल्याचा सूर त्यांनी आळवला आहे. अर्थात असा राग आलापणारे ते काही पहिले नाहीत. एनडीटीव्ही प्रकरणात प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकल्यानंतर माध्यमांची गळचेपी सुरू झाली, अशी रडारड अनेकांनी केली होती. आता बंगही यात सहभागी झाले आहेत. बंग यांनी वरील विधाने केल्यानंतर सरकारवर ताशेरे वगैरे असे मथळे लोकांनी रंगवायला सुरुवातही केली आणि दोन-तीन दिवसांत काही माध्यमांनी त्यांच्या या विधानांच्या आधारावर सरकारकडून कशी विचारस्वातंत्र्याबाबत गळचेपी होत आहे, यावर चर्चा सुरू केली आहे. टीका करणारी ही सगळी मंडळी फार मोठी आहेत. कंपनी, कंपनी कायदे, कंपन्यांचे सीएसआर वगैरे उत्तम समजणारी ही मंडळी आहेत. यापैकी कुणालीही एनडीटीव्ही प्रकरणात एनडीटीव्हीला कोणताही प्रश्न विचारावा, असे वाटत नाही. अभय बंग यांनी तर विकासासाठी विचारस्वातंत्र्याचा बळी द्याल का? असा सवालच केला आहे. अभय बंगना नेमके काय म्हणायचे आहे तेच समजत नाही. जातीपाती, लांगूलचालन, घराणेशाही याच्या पलीकडे जाऊन विकासाच्या अजेंडावर या देशाचे राजकारण घेऊन जाण्याचे मोठे काम नरेंद्र मोदी यांनी केले, ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल? बंग म्हणतात, ’’विकास हवा की विचार स्वातंत्र्य?’’ हा प्रश्नच मुळी अप्रस्तुत आहे. एका निकोप देशाकरता या दोन्हींची आवश्यकता आहे. बंग यांना वेगळे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीत नक्कीच आहे, मात्र असे विचित्र तर्कट लावण्याचे कारण काय? 
 
एनडीटीव्हीसारख्या माध्यमांनी या देशाचे एक चित्र रंगवून तोच खरा भारत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न चालविला. विचारस्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा उचलून केवळ स्वत:चा पुरेपूर विकास करून घेतला. ’तोट्याच्या गर्तेत सरकणारी दूरचित्रवाणी माध्यमे आणि गलेलठ्ठ पगार घेणारे संपादक’, हे चित्र किंबहुना भारतातच पाहायला मिळत असावे. मग हे तोट्याचे तारू वाचविण्याकरिता या मंडळींनी काय काय उद्योग केले ते नीरा राडिया टेपच्या माध्यमातून बाहेर आलेलेच आहे. नवनवे आयकॉन सादर करण्याचा एक सपाटा एनडीटीव्हीने मांडला होता आणि त्यातूनच डॉ. अभय बंग देशासमोर आले. २००९ साली ’अनस्टॉपेबल इंडियन्स’ ही मालिका बहुदा अनेकांना आठवत नसावी, पण सर्वात प्रथम बंग दाम्पत्य याच शोच्या माध्यमातून नावाजले गेले आणि नंतर देशभरात गौरविले गेले. हा काळच मुळी एनडीटीव्हीच्या चलतीचा होता. चांगले काम करणार्‍यांचे कौतुक व्हायलाच हवे, यात काहीच शंका नाही. मात्र, डॉ. बंग जसा विचारस्वातंत्र्याबाबत प्रश्न उपस्थित करीत आहेत, तसेच प्रश्न त्यांनी त्यांच्या लाडक्या एनडीटीव्हीलाही विचारावे. पत्रकारितेच्या कुठल्या आचारसंहितेत एक व्यक्ती आणि विचारधारेचे सातत्याने प्रतिमाभंजन करण्याचा निकष बसतो? नरेंद्र मोदींना नरराक्षस ठरविणारी हीच मंडळी होती.
 
प्रणव रॉय यांच्याकडे असा कुठला कौशल्य विकास कार्यक्रम होता, ज्यासाठी इंडिया बुल्सने त्यांना तब्बल साडेपाचशे कोटींचे कर्ज दिले? एका सातत्याने तोट्यात जाणार्‍या कंपनीला इतके मोठे कर्ज देण्यासाठी इंडिया बुल्सचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. याच इंडिया बुल्समुळे हरियाणा कॉंग्रेसचा एक माजी मुख्यमंत्री आज चौकशीच्या फेर्‍यात आणि तुरुंगाच्या दारात घुटमळत आहे. या सगळ्या प्रकरणाला वड्रा प्रकरणाची किनार आहे. या मुख्यमंत्र्याने इंडिया बुल्सशी अलीकडे सोयरीकही जुळविली आहे. ही मोठमोठाली कर्जे मिळविण्याचा काळ आणि नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द संपविण्याचे अतोनात प्रयत्न, हा कालखंड समान आहे. आता ही सुपारी कुणाची होती, हे वेगळे लिहिण्याची गरज नाही. अभय बंगनाही याच काळात प्रकाशात आणले गेले, परंतु ते सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांना या सगळ्या खेळीची काही माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही. या गुंतागुंतीच्या कुटील राजकारणात त्यांना ओढण्याचे कारणही नाही. त्यांनी केलेले सामाजिक कामही मोठे आहे. मात्र, त्यांच्यासारख्यांचा उपयोग करून माध्यमे कशी लोकमान्यता मिळवितात आणि या लोकमान्यतेच्या बळावर काय काय धंदे केले जातात, ते कधीतरी बंगसारख्यांनी समजून घेतले तर बरे होईल. दांभिकता आणि शिरजोरी यालाच ‘विचारस्वातंत्र्य’ म्हणायचे असेल, तर आधी ‘विचारस्वातंत्र्य’ या शब्दाचा अर्थ बदलून घेतला पाहिजे. ’माध्यमांच्या विचारस्वातंत्र्याची मुस्कटदाबी म्हणजे त्यांच्या व्यवसाय स्वातंत्र्याची गळचेपी’ असा जावईशोधही काही मंडळींनी लावला आहे. उद्या पकडले गेलेले चोर-दरोडेखोर, ’आमच्या व्यवसाय स्वातंत्र्यावर पोलीस घाला घालत आहेत,’ असा तर्क देऊ लागले तर काय म्हणायचे? पण ते चोर असल्याने असे करणार नाहीत. कारण त्यासाठी शिरजोरही असावे लागते आणि ती कला आपल्याकडच्या काही ठरावीक मंडळींनाच अवगत आहे. ज्यांचा आदर्श ठेवावा, अशी मंडळीच जर अशा प्रकारे अविवेकाने विधाने करू लागली, तर समाजाने आशेने कोणाकडे पाहावे, हा प्रश्नच आहे. आपल्या विचारांना न पटणारी विचारसरणी लोकांनी स्वीकारली, तर त्याकडे सम्यक दृष्टीने पाहून आत्मचिंतन केले, तर ती सहिष्णुता ठरते. मात्र, या उलट असहिष्णुतेचे ढोल बडवित सरकारची नालस्ती करणार्‍या टोळ्यांमध्ये आता निःस्पृह मानली जाणारी मंडळीही सहभागी झाली आहेत, ही खरोखरच चिंतेची बाब आहे.
 
- किरण शेलार
Powered By Sangraha 9.0