प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी छंद असावा' असे मी नाही म्हणणार तर अनेक छंद असावेत असे मी म्हणेन. कारण वयानुसार आणि स्थलकालानुसार आपले अनेक छंद बाद होत जातात पण काही छंद आपल्याला घरात बसून जोपासता येतात आणि त्या छंदाचा आनंद आणि उपयोग सुद्धा एकट्या आपल्यालाच नाही, तर घरातल्या माणसांना व इतरांना सुद्धा होतो.
"वामन तनु वृक्ष" अर्थात बोन्सायच्या छंदाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अर्थात हा छंद मी जाणून बुजून जोपासला असे नाही, तर हा छंद मला जडला! हे आता आता वयाच्या ६० व्या वर्षानंतर मला असे वाटते की, माझा हा छंद फार योग्य असा आहे.
कुठलीही गोष्ट चालू स्थितीत राहण्यासाठी त्याला चार्जिंगची अथवा सर्विसिंगची आवश्यकता असतेच. माणसांचेही तसेच आहे. अस्वच्छ वातावरण, प्रदूषणयुक्त हवा आणि धकाधकीच्या जीवनाने आपली बॅटरी पण डाऊन होते. आपला उत्साह कमी होतो. काही काम करू नये असे वाटते. अश्यावेळी निसर्गाची सोबत आपल्याला परत ताजेतवाने करते.
ह्याच कारणासाठी खूप पूर्वीपासूनच मनुष्याने निसर्गाशी विविध निमित्ताने नाते जोडले आहे. निसर्गात राहिल्याने उत्साह येतो, तरतरी येते. म्हणूनच घरात रांधा वाढा उष्टी काढा करणाऱ्या पूर्वीच्या बायकांना व्रतवैकल्ये म्हणजे वटपौर्णिमा, तुळशीचे लग्न, आवळीभोजन या नावाखाली, घराबाहेर - निसर्गात जाण्यासाठी या गोष्टी सांगितल्या गेल्या. जेणेकरून त्यांना निसर्गातली शुद्ध हवा मिळेल. पण मधल्या काळात हे सर्व थोतांड आहे, तुळशीला प्रदक्षिणा घालून काय होणार आहे ? वटपौर्णिमेला वडाजवळच कशाला जायला हवे? अश्या अनेक शंका त्या परंपरेमागची शास्त्रीय करणे समजून न घेता घेतल्या गेल्या. असो!
लहानपणापासून मला झाडांची, निसर्गाची खूप आवड होती. पुण्याच्या टिळक स्मारक मंदिराच्या आवारात असंख्य मोठमोठे वृक्ष होते. श्रावणात आघाडा-दुर्वा-फुले आणावयाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या मैत्रिणी सक्काळी सक्काळी त्या बागेत हिंडून या गोष्टी घेऊन येत असू. ८-९ वाजेपर्यंत तरी दाट झाडीमुळे ऊन खाली येत नसे. गेले ते दिवस. आत्ताच्या मुलींना एवढी थोरली बाग बघायलाच नाही मिळणार !
लग्न झाल्यावर ४ थ्या मजल्यावर फ्लॅट मध्ये राहायला आलो. फ्लॅट मधली छोटीशी गच्ची! त्यात कितीश्या कुंड्या मावणार! फ्लॅटमध्ये राहायला गेल्यावर एका दिवाळी अंकात बोन्साय बद्दल वाचले. मोठ्या वृक्षांचे आपण बोन्साय करू शकतो. कृती पण दिली होती. त्याच दिवशी गच्चीमध्ये एक वडाचे ४-५ पानांचे रोप, एका कुंडीमध्ये आपोआप आलेले पहिले. लगेच बोन्साय कृतीत आणायचे ठरवले. दररोज रस्त्याने जाताना मोठ्या वृक्षाच्या बिया जमविणे सुरु झाले आणि मासिकामध्ये दिलेल्या कृतीप्रमाणे त्यांचे बोन्सायमध्ये रूपांतर झाले. आता ५० डेरेदार वृक्ष आमच्या छोट्याशा गाचीमध्ये मस्तपणे विसावा घेत आहेत.
३३ वर्षांच्या वडाला भरपूर फांद्या आल्या आहेत. दर वटपौर्णिमेला आम्ही त्या वडाच्या (अजून २/३ वड आहेत.) ह्या वर्षी कोणता वड पुजायचा ते आधीच ठरवून ती कुंडी मध्यात घेतो व व्यवस्थित पूजा, प्रदक्षिणा, सूत गुंडाळणे ह्या गोष्टी पूर्वीप्रमाणे करतो. दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखे जरी असले, तरी अगदी वडाच्या फांद्या न तोडता, घराच्या घरी, कमी वेळात आमची पूजा होते. मनसोक्त पूजा करून मनाला शांतता ( जी हल्ली मिळत नाही ) मिळते. परत निसर्गात गेल्याने शुद्ध हवा ( जी सध्या दुरापास्त झाली आहे.) मिळते. आणि काय पाहिजे?
गच्चीत डोंगरी आवळ्याचेही झाड आहे. आवळीभोजनही करता येईल. पण एवढा वेळ आहे कोणाकडे? कांचनला जांभळी फुले, ताम्हणीला गुलाबी फुले, चिंचेला चिंचा लागतात. ३८ वर्षाचा जेड आहे. पारिजातकाच्या फुलांचा सडा पडतो. तोही आता २५ चा झाला. कामिनी तर दर १५/२० दिवसांनी बहरते. २ वाव्हळ आहेत. २७ वर्षाच्या कडुनिंबाला निंबोण्या लागतात. २० वर्षाची बकुळ आहे. चिक्कूच्या झाडाला चिक्कू लगडतात. वडाची लाल फळ खायला हॉर्नबिल येतात. बेल - शिवरात्रीला शंकराला वाहण्यासाठी बेलाची पाने जरा जास्त लागतात. (त्यामुळे आपोआप खच्चीपण होते. त्यानंतर त्याला नवी फूट पण एवढी येते की झाड मस्त बाहेरून जाते.)
बोन्साय बद्दल बऱ्याच जणांना कुतूहल असते. तसेच काहींना एक प्रश्न सतावत असतो. या झाडाची वाढ खुंटवल्याने आपली वाढ तर नाही ना खुंटणार? पण तुम्ही मला सांगा! जशी बोन्सायची छाटणी होते तशी आपण अनेक झाडांची छाटणी करत असतो. गुलाबाची,कंपाउंडच्या झाडाची करतो, लिंबू, आंबा, पेरू, चिक्कू. इतकेच काय, सुवासिक फुलांच्या वेलांची पण छाटणी करतो. त्यामुळेच सीझनमध्ये त्यांना भरपूर फळे-फुले येतात. मग बोन्सायची छाटणी केली तर काय हरकत आहे?
बोन्साय म्हटले की, आपल्याला वाटते ही कला चिनी किंवा जपानी असेल. पण भारतातील जुन्या ग्रंथांमध्ये “वामन तनू वृक्षदि विद्या" असा उल्लेख आढळतो. पूर्वी आयुर्वेदाचार्य दुर्मिळ वनस्पतीच्या वृक्षांची रोपे, जंगलातून आणून, घरातील कुंड्यांमध्ये लावत असत. ही झाडे वर्षनुवर्षे कशी वाढवायची याची माहिती त्यांना होती. पण याला त्यांनी कलेचा दर्जा दिला नव्हता.
बौद्ध धर्माचा प्रचार करणाऱ्या बौद्ध भिक्षूंना डोंगरदऱ्यातून जाताना खुरटलेली पाण्याविना वाढलेली झाडे दिसत. अशावेळी ते ती झाडे पॉटमध्ये घालत. अशाप्रकारे बोन्साय भारतातूनच जपान चीनमध्ये गेले. म्हणजेच बोन्साय या कलेचे बीज भारतात रुजले व चीनमध्ये ते नावारूपाला आले. बोन्सायला कलेचा दर्जा चीनने दिला. माणूस हल्ली बिल्डिंगच्या जंगलात राहून निसर्गा पासून दुरावला आहे. त्यासाठी बोन्सायचा छंद जोपासताना निसर्गाशी जवळीक साधता येईल असे मला वाटते.
- वीणा गोडबोले