आज हॅरी पॉटरला २० वर्ष झाली.. त्या निमित्ताने आठवणींचा हा एक छोटासा प्रवास..
लॅपटॉप ऑन केला आणि नकळत कर्सर हॅरी पॉटरच्या फोल्डर कडे गेला. सिनेमा सुरु झाला आणि मी भानावर आले.
हॅरी पॉटर म्हणजे माझं बालपण.. हॅरी पॉटर म्हणजे माझी जादुई दुनिया.. हॅरी पॉटर म्हणजे मैत्री, हॅरी पॉटर म्हणजे प्रेम, नकळत अनेक गोष्टी शिकवणारा हॅरी पॉटर माझ्या खूप खूप जवळचा आहे.
हॅरी पॉटरचे वेड मला लागले ते साधारण १०-१५ वर्षापूर्वी, ते ही माझ्या मोठ्या भावामुळे. दादा जे करेल ते मला करायला फार आवडायचं. त्याच्याकडे इंग्रजी हैरी पॉटर ची पुस्तकं होती, मी बाबांच्या मागे लागून अनुवादित घेतली. आणि मी कधी या जगात हरवून गेले माझे मलाच कळले नाही. हॅरीनं मला एक नवीन जग दिलं. एकदा का हातात हॅरीचं पुस्तक आलं की ते काही परत हातातून सुटायचं नाही. दादा आणि माझ्यात स्पर्धा असायची कोण आधी जिंकणार आणि त्यातच आपण आधी वाचलं तर मुद्दाम दादाला सगळा सस्पेंस सांगायचा आणि तेच त्याने केलं तर मात्र माझा पार मूड जायचा.
मी पहिल्यांदा हॅरी पॉटर वाचलं तेंव्हा मला सगळ्यात जास्त भावलेली गेष्ट म्हणजे " वोल्डेमॉर्टच्या अक्षम्य शापापासून हॅरी वाचला ते केवळ त्याच्या आईने त्याला दिलेल्या प्रेमाच्या शक्तिमुळे." आजच्या एकल कुटुंब पद्धती आणि मटेरिअलिस्टिक जगामध्ये आपल्या लोकांचे, नातेसंबंधांचे, मैत्रीचे महत्व जे.के. रोलिंग नामक एका विदेशी स्त्रीने किती वेगळ्या पद्धतीने समजावले याचे कौतुक आहे. हॅरी पॉटरचा नवीन भाग आल्या आल्या युनिवर्सल लायब्ररी अॅण्ड बुक स्टोरमधून तो विकत आणायचा आणि हावरटासारखा वाचायचा याची मजाच वेगळी होती. अजूनही मी हैरी पॉटर कुठुनही कधीही वाचू शकते. कदाचित त्याच प्रेमामुळे प्रत्येक वेळा हॅरी पॉटर वाचताना एखाद्या नवीनच गोष्टीची वेगळ्याने ओळख होते.
नंतर या पुस्तकांवर आधारित आठ भागांमध्ये सिनेमे आले. मी प्रत्येक भाग अगदी न चुकता थिएटरमध्ये जावून बघितला आहे. पाय फ्रॅक्चर असताना सुद्धा. हे वेड केवळ या सिनेमांमधील जादुई दुनिया, वेगवेगळे इफेक्ट्स किंवा भरपूर जगमगाटामुळे नाही तर या सिनेमा आणि पुस्तकांच्या मागे असलेल्या संकल्पनेमुळे लागतं. यामधील हॅरीची हिंमत, हरमाईनीचा आत्मविश्वास, साहस आणि ज्ञान, रॉनची मैत्री निभवण्याची तयारी आणि हैरी वर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत असलेली समर्पणाची भावना खूप काही शिकवून जाते. आपल्या माणसांची साथ असेल तर जगातील कुठल्याही संकटाला तोंड देऊन अजिंक्य विजय मिळवता येऊ शकतो हे हैरी पॉटरच्या प्रत्येक भागाने शिकवले आहे.
आपल्या प्रत्येकामध्येच एक उजळ बाजू असते आणि एक काळी बाजू. आपण नेहमीच ती उजळ बाजू जगासमोर आणायचा प्रयत्न करत असतो. मात्र काळ्या बाजूला नाकारता येत नाही. आणि ती काळी बाजू असणं म्हणजे काहीच गैर नाही. हेच या पुस्तकांमधून आणि चित्रपटांमधून पण दिसून येतं. हॅरीमध्ये काही अंशात या सिनेमातील मुख्य खलनायक वोल्डेमॉर्टचा भागही असतो. जादूच्या शक्तीमुळे ते दोघेही एकमेकांशी जोडले जातात. हॅरी ते अॅक्सेप्ट करतो, आणि त्यावर कशी मात करता येईल याकडे लक्ष केंद्रित करतो. आपणही आपल्या रोजच्या आयुष्यात स्वत:ची काळी बाजू 'अॅक्सेप्ट' करणं शिकलो तर कित्ती प्रश्न सुटतील नाही..
या सिनेमात 'स्नेप' नावाची एक 'ग्रे शेड' असलेली भूमिका आहे. शेवटच्या भागात मात्र या भूमिकेच्या मी अक्षरश: प्रेमात पडले. कारणही तसंच होतं. माणूस नेहमीच दिसतो तसा नसतो. स्नेपचं हॅरीच्या आईवर म्हणजेच लीलीवर आतोनात प्रेम असतं, त्याला ती मिळू शकत नाही म्हणून त्याचा हॅरीच्या वडिलांवर आणि त्याच कारणाने हॅरीवर रागही असतो. हॅरीला वाचवताना लीलीचे प्राण जातात. म्हणून कदाचित तो हॅरीला कधीच माफ करु शकत नाही असे वाटत असतानाच शेवटच्या भागात मोठा खुलासा होतो, आणि आयुष्यभर एकही अक्षर न बोलून दाखवता तो केवळ हॅरीचे रक्षणच करत असतो, हे लक्षात येतं. आपल्याही आयुष्यात असे अनेक लोक असतील ज्यांच्या वागण्यामुळे कदाचित आपल्याला ते आवडत नसतील, मात्र आपले रक्षण करणारे, आपल्या हिताचा विचार करणारे असे लोकच आपले खरे लोक असतात. त्याचा तो शेवटचा संवाद "ऑलवेज..." आजही शहारा देऊन जातो.
हॅरी हा केवळ त्याच्या एकट्याच्या कतृत्वामुळे 'हीरो' ठरला नाही. तर त्याच्यासोबत सतत असणारे, कठीणातील कठीण परिस्थिती येऊन सुद्धा त्याची साथ देणारे खरे मित्र असल्यामुळे तो हीरो ठरला, केवळ प्रेमाच्या शक्तीने त्याचा जीव वाचवणाऱ्या त्याच्या आईमुळे, त्याचे प्राण वाचविण्यासाठी स्वत:चे प्राण गमावणारे सीरीयस ब्लॅक, जेम्स पॉटर, रीमस ल्यूपिन, फ्रेड, जॉर्ज, अॅलिस्टर मूडी, अगदी त्याचे लाडके प्रोफेसर डंबलडोअर यांच्या बलिदानामुळे आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या त्याच्या मित्रांमुळे तो हीरो ठरला. या एका गोष्टीने मला हेच शिकवले की यश हे कधीच आपलं एकट्याचं नसतं. त्या यशाच्या प्रवासात आपल्याला साथ देणाऱ्या असंख्य आपल्या लोकांच्या मदतीमुळे आणि त्यांच्या त्यागामुळे ते आपल्याला मिळालं असतं, आणि त्याची जाणीव आपल्याला असली पाहीजे.
जे.के. रोलिंगने हॅरीचा पहिला भाग एका रेस्टॉरंट मध्ये काही पानांवर लिहिला. परंतु नंतर या आठही भागांनी संपूर्ण जगाला वेड लावले. चांगली प्रवृत्ती ही नेहमी वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवते या भारतीय संकल्पनेचे चित्रण हॅरी पॉटरमध्ये दिसून येते.
हॅरी पॉटरचा हिंदी अनुवाद जास्त जवळचा वाटतो. "निरस्त्र भव", " त क्षण मरणासन्न", "पीडीतो", " पितृदेव संरक्षणम" या सारख्या संस्कृत शब्दांमुळे हॅरी आपलासा वाटतो. हॅरी पॉटर ही संकल्पना नक्कीच विदेशातली आहे. पण त्याचं मूळ भारतीय मूल्यांच्या कितीतरी जवळ जाणारं आहे, त्यामुळे हॅरी आपल्याला खूप आपलासा वाटतो. हॅरीने मला खूप खूप काही दिले आहे. आणि आमच्या पिढीतील अनेकांच्या भावना माझ्या सारख्याच असणार याची मला खात्री आहे. आज हॅरी पॉटरला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्हाला ही जादुई दुनिया दिल्यामुळे आमची पिढी जे.के. रोलिंगची नक्कीच ऋणी राहील..