आषाढाचा पहिला दिवस खरंतर महाकवी कालिदास दिन. पण माझ्यासाठी तो आणखी एका गोष्टीने महत्वाचा असतो. तो म्हणजे माझं खाद्यकॅलेंडर त्या दिवशीपासून सुरु होतं. आषाढातली अशी संततधार कोसळू लागते आणि विविध खाद्यपदार्थांचे आपसूकच वेध लागतात. मे महिना एकूणच निवांत गेलेला असतो. शाळा कॉलेजच्या जीवनात सुट्ट्यांमुळे आणि आता कोर्टालाही सुट्टी असते त्यामुळे निम्मं काम तरी कमी असतं. आणि आंब्यांच्या सिझनमध्ये आमरसा खेरीज दुसरं काहीही करावं लागतही नाही आणि इच्छाही होत नाही. त्यामुळे माझ्यासाठी ती शैक्षणिक वर्षासारखी वर्षाखेर असते. पण एकदा का आंब्याचा सिझन संपला की मात्र स्वैपाकात अशी टाळाटाळ करण्याचे दिवस संपतात. मग मलाही चुकल्या चुकल्यासारखं होतं आणि एकेक पदार्थांची आठवण व्हायला लागते.
तशी सुरुवात आषाढी एकादशीने किंवा लेकीच्या वाढदिवसाच्या गुलाबजामने होते. एकादशीला खिचडी, वरई, रताळी, बटाट्याचा कीस, गोड थालीपीठं, चिवडा, वेफर्स, बटाटा पापड आणि रात्री उरलेलं सगळं एकत्र करून केलेले साबुदाणा वडे आणि झालंच तर फ्रुट सलाड! म्हणजे म्हणायचं उपवास पण तो झाला की, पुढचे दोन दिवस डीटॉक्सवर राहावं लागतं! मग आखाड तळायचा म्हणून एकदा एखादं तिखट तळण जसं वाटल्या डाळीच्या करंज्या आणि लाल भोपळा आणि गुळ घालून केलेले भोपळ घारगे होऊन जातात. पूर्वी आई आणि तिच्या मैत्रिणी कांदे नवमी करायच्या. तेंव्हा कांद्याच्या पदार्थांची रेलचेल असायची. आता ती कधी होऊन जाते ते कळतही नाही आणि अर्थात आता कांदा लसूण असं काही श्रावण असला तरी पाळायला जमत नाही. नवमी नाही तर नाही पण वाढत्या पावसाबरोबर कांद्याची भजी किंवा कांदा घालून केलेले भाजणीचे वडे हे अगदी नित्य नेमाने केले जातात. आणि मग येतो सगळ्यात हवाहवासा दिवस. दीप अमावास्या. बाजरीची भरड काढून आणि काणिकेमध्ये गुळ घालून केलेले इडलीच्या कुकर मध्ये वाफवलेले दिवे, तेही भरभरून तूप घेऊन किंवा कुस्करून दुधात भिजवून आणि बरोबर टॉमॅटोचं सार आणि बटाट्याची भाजी. अहाहा! वर्षभर ह्या दिवसाची मी आवर्जून वाट बघत असते. सगळे जुने पुराणे दिवे घासून लखलखीत करून त्यांना आराम द्यायचा दिवस. आजकाल तसा त्यांना आरामच असतो आणि बल्बची काही आपण पूजा करत नाही. असे कितीतरी दिवस आपण संकल्पनात्मक साजरे करतो. अर्थातच संस्कृती जपली गेलीच पाहिजे आणि खाद्यसंस्कृती तर नक्कीच अशा विचाराने माझं खाद्यवर्षाचं कॅलेंडर आषाढ महिन्यापासून सुरु होतं.
श्रावण तर ह्या कॅलेंडर मधला राजा! नागपंचमीला पुरणाची फारशी (मला) आवडत नाहीत म्हणून गुळ खोबऱ्याचं सारण करून केलेली दिंड आणि वर ओतलेली साजूक तुपाची धार. नारळी पौर्णिमेचा नारळी भात, स्वातंत्र्यदिनी आणलेल्या जिलेब्या, अष्टमीला कालवलेला दही पोह्यांचा काला, श्रावणी शुक्रवारी माम्या मावश्या ह्यांच्या घराची आमंत्रणं आणि ‘तुला कोण आयत देणार’ असं म्हणत म्हणत त्यांनी वाढलेल्या गरम गरम पुरणाच्या पोळ्या, मग जवळपास ३ - ४ मंगळागौरींची आमंत्रणं आणि मंगळागौरीचा एक टिपिकल पुणेरी मेनू म्हणजे भाजणीचे वडे आणि मटकीची उसळ, शुक्रवारच्या जिवतीच्या पुरणाच्या औक्षणानंतर ताम्हणातला तुपात भिजलेला पुरणाचा गोळा ह्या सगळ्याने माझा श्रावण महिना अगदी समृद्ध होऊन जातो. मग शुक्रवारच्या ऐवजी रविवारी घरी काम करणाऱ्या मावशींनाच जेवायला बोलावलं आणि खरोखर ज्यांना कधीच आयत जेवायला मिळत नाही त्यांच्या चेहेऱ्यावरचं समाधान बघितलं की माझाही श्रावण महिना समाधानाने पार पडतो. ह्यात स्वातंत्र्यदिनी आजकाल लेकीला काहीतरी ट्रिपल कलरचा पदार्थ हवा असतो. ट्रिपल कलर राईस, पुडिंग वगैरे. मग अशा प्रकारे फ्युजन सादर करायला वाव मिळतो.
गणेश उत्सवाच्या धामधुमीत आई करते ती हरतालिका आणि ऋषीपंचमी काळाच्या ओघात माझ्याकडून मागे पडली तरीही ह्याची निदान एक आठवण तरी होऊन जातेच. तळणीचे आणि उकडीचे मोदक एकेकदा होऊन जातातच पण एका गणपतीत केलेल्या पनीर आणि डेसिकेटेड कोकोनटच्या बॉल्सचं इतकं कौतुक झालं की, आजकाल गणपतीत ते करायची माझ्यापुरती प्रथाच होऊन गेलीय. सारखंच गोड खाऊन कंटाळलेल्या गौरीं आणि गणपतीने मिळूनच त्यांच्या मेनूमध्ये अळूच्या वड्या, वाटली डाळ, घोसाळ्याची भजी, गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी साताळी डाळ हे पदार्थ ठरवले असणार! आजकाल एका दिवशी करणं आणि खाणं होत नाही त्यामुळे ह्यातले बरेचसे पदार्थ मी तीन दिवसात विभागून करते.
गौरी गणपतीची धामधूम संपली की, एखाद्या समंजस गृहिणीसारखी देवी घरातल्या गृहिणीला १५ दिवस हक्काची रजा देते आणि नवरात्रात येते तेही फुलोऱ्याव्यतिरिक्त काही विशेष मागणी न घेता. ह्यादरम्यान मी नैवेद्याच्या निमित्ताने पाक असलेल्या पाककृती म्हणजे लाडू आणि वड्या ह्यांची ट्रायल घेते. मागची कितीतरी वर्ष मी ह्याची ट्रायलच घेते. दरवेळेस नव्याने पाक कच्चा तरी राहतो किंवा मग इतका पक्का होतो की लाडूचा टप्पा पडावा. आजकाल कोजागिरीला चंद्र दिसो न दिसो पण आकाशात कुठेतरी असणाऱ्या त्याला मस्त आटवलेल केशरी चारोळीयुक्त दूध बाल्कनीमध्ये ठेवल्याखेरीज आपल्या ओठाला लावावसंच वाटत नाही.
ह्या सगळ्या धामधुमीत मध्ये कधीतरी नवऱ्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घरी एखादा थाई, मेक्सिकन पदार्थ होऊन जातो आणि त्याला घेतलेल्या मोठ्ठ्या गिफ्टच्या निमित्ताने का होईना आम्हाला एखाद्या grand हॉटेल मध्ये grand पार्टी मिळते. आता ह्यावर्षी दिवाळीला काही फारसं करायचं नाही, असंही सगळच एकदम खाल्लं जात नाही, आई वगैरे देतच असते असं मनाशी बजावून ठेवते मग लक्ष्मीपूजनाला लागतात म्हणून अनारसे आणि लाडू मस्ट. मग वेगळा आयटम म्हणून चोकोलेट बॉल्स, चीज शंकरपाळे, पटकनच तर होतो म्हणून चिवडा, करंज्या करणं चांगलं असतं, शकुनाचं असतं (असं आज्जी असंख्य वेळा म्हणायची!) म्हणून करंज्या आणि बघू तिच्यापेक्षा माझ्या छान कुरकुरीत होतात हे दाखवण्यासाठी चकल्या आणि मला करायला आवडतात म्हणून चिरोटे असा घाट घातलाच जातो. मध्ये कधीतरी नणंदेबरोबर फोन झालेलाच असतो मग ती काय करतीये ह्याचा अंदाज घेऊन पुन्हा पदार्थ वाढवले जातात.
मग एकदा खंडेराय येऊन वांग्याची भाजी, कांद्याची पात, भाकरी खाऊन जातात. ह्या सगळ्यानंतर खरंतर हरे रामा म्हणावसं वाटतं पण डिसेंबर महिना चालू असल्याने ओह जिझस असं म्हणून एखादा फ्रुट केक केला की, जरा हुश्श व्हायला होतं. खरंतर हुश्श एवढ्याच साठी की अगदी ह्याच वेळी ह्याच दिवशी हे केलंच पाहिजे असा अट्टाहास नंतर राहत नाही. पण मग स्वतःची आवड निवड सुरु होते. तोपर्यंत थंडी एकदम ऐन बहरात असते. मग मलाच म्हणून हुलग्याच्या पिठाच्या शेंगोळ्याची आठवण येते. चर्र लसणाची फोडणी देऊन, आधण ठेवून त्यात ह्या पिठाच्या हाताने केलेली वाटोळी सोडायची आणि गरम गरम भाकरीबरोबर हे शेंगोळे खायचे. थंडीत एकूणच वेगवेगळी सुप्स, करी, छोले, डिंकाचे आणि अळीवाचे लाडू, झालंच तर नाष्ट्याला गव्हाचा तूप आणि जायफळ घातलेला गोड किंवा जिरेपूड आणि तेल घातलेला मिठाचा चिक, बाजरीची भरड घेऊन केलेली खिचडी बरोबर पोह्याची मिरगुंड हे चालूच राहतं. हे सगळं झाल्यावर माझ्याकडून एकतर चुईंगगम सारख्या चिवट किंवा मग भुगा तरी होणाऱ्या तिळाच्या वड्या वगैरेकडे मी फार लक्ष देत नाही. पण गुळाच्या पोळ्या आजकाल मस्त जमतात. ही खास आईची रेसिपी. महाशिवरात्रीला एकादशीप्रमाणेच जंगी मेन्यू असतो. त्यातली कवठाची चटणी आणि रताळ्याच्या साखर गुळातल्या फोडी हे अगदी लाडके पदार्थ. किती वेळा म्हटलं तरी एरवी केले जात नाहीत. मग अॅनिवर्सरी निमित्ताने पुन्हा एकदा काहीतरी अभारतीय डिशचे प्रयोग सुरु होतात.
मग जरा आरामाचे थोडेसे ‘अच्छे दिन’ जवळ येतात. तरी चैत्राची चाहूल लागली की, आपोआप वाढत्या उन्हाबरोबर लोणची, टक्कू, मेथांबा ह्यांची आठवण व्हायला लागते. चैत्रगौरीच्या निमित्ताने कैरीची डाळ, पन्हं, शेवयाची खीर होतच राहते. होळीला पुरणाच्या पोळ्या पुन्हा एकदा होऊन जातात. आणि आजकाल लेक आणि तिचं मित्रमंडळ भरपूर रंग खेळतात म्हणून खसखस, बदाम, काळीमिरी, बडीशेप, वेलची, केशर दुधात वाटून घाटून थंडाई केली जाते. त्याचा तो तोंडाला चटका लावणारा गोडवा! त्या त्या सण समारंभाचं आणि पदार्थांचं अतूट नातं असतं. ते एकमेकांची लज्जत वाढवतात.
मग एकदा का पहिल्या आंब्यांचा आणि रसाचा देवाला नेवेद्य दाखवून झाला की, मग कोणाचाही विचार न करता आपण आणि आंबे. नाही म्हणायला कैरीचे काही पदार्थ आणि अगदीच गेला बाजार मँगो मिल्क शेक आणि शेवटी शेवटी साखरांबा, गुळांब्याच्या बरण्या भरल्या जातातच. पण अगदी येता जाता. हा सिझन खरा आरामाचा सिझन. म्हणजे मी करून टाकलाय. आज्जी, आई ह्याच दरम्यान वेगवेगळे पापड, कुरडया, पापड्या, सांडगे आणि लोणची, मसाले, भाजणी करायची. येता जाता लाट्या तोंडात टाकणं, अर्धवट वाळलेली वाळवणं खाणं ह्यासारखी मजा नाही. पण आता हे घरी होत नाही. आठवण मात्र खूप होते. मग आई, आज्जेसासुबाई आणि आत्त्या देत राहतात पापडाची कच्ची पीठं, मग फक्त खाण्यापुरत्या म्हणून लाट्या करून घ्यायच्या. मग ह्या अजूनही हौशी असणाऱ्या तरुणीं मला भाजण्या, लोणची, मसाले ह्यांची samples (?!) देतात ज्यामध्ये माझे पुढचे अनेक महिने निघून जातात.
तसं हे न संपणारं असतं. हे सगळंच आई करायची तेंव्हा अर्थातच जास्त आल्हाददायक असायचं. आईच्या हातची चव आणि स्वतःला कष्ट नाहीत. आता कधी कधी खूप कामं चालू असताना, मुलगी खूपच लहान असताना, आजारपण, क्लाएंट्सचे फोन कॉल्स, राहिलेलं ड्राफ्टीग आणि आडवारी येणारे सण.... कधी कधी जीव मेटाकुटीला येतो. आणि नाही केलं तर विचित्र रुखरुख लागून राहते. अशामध्ये आईने आणि आज्जीने केलेले पदार्थ आठवत राहतात आणि मग वाटतं आपल्याला हे सुख आपल्या आईने आणि आज्जीने दिलं मग आपल्या मुलीसाठीही आपण करायलाच पाहिजे.
असेही ह्या सगळ्याच पदार्थात भरभरून प्रोटीन्स, विटामीन्स, मिनरल्स असतात. त्या त्या वेळेला ह्या ज्या योजना पूर्वजांनी केलेल्या आहेत त्या किती विचार करून केलेल्या आहेत. अगदी दिवाळीला तळणीचा फराळ हा थंड हवेत चांगला असतो जो उन्हाळ्यात खाऊ नये म्हणतात. अर्थात हे सगळं आपल्याला आई आणि आजीकडून फ्री रेडीमेड मिळत असताना आपल्याला मात्र कळायला कोणीतरी ऋजुता दिवेकर यावी लागते.
हे सगळं सण समारंभ म्हणून केलं जातं. पूर्वी देवाच्या भीतीने ‘हे लागतंच’ अशा हेतूने बायका करत पण आता तर आपल्याला मनापासून वाटतं देवाला काय एक नमस्कारही पुरतो. मग हे कुळधर्म, कुळाचार, हे सोपस्कार, हे नैवेद्य कशासाठी? पण मी माझ्यापुरतं तर बघून ठेवलंय ही व्यवधानं असतात, ह्यानंतर हे आहे, त्यानंतर ते येतं, आता असं करायचं, आता तसं करायचं, इतकच काय पण ‘ह्या वर्षी आमच्याकडे काही करायचं नाहीये’ ह्या विचारानेदेखील येणारी व्यवधानं माणसाला गुंतून ठेवतात. हे सगळं नसेल तर माझं आयुष्य किती रिकामं रिकामं होऊन जाईल ह्याची मी कल्पनाही करू शकत नाही. रिकामं डोकं सैतानाचं घर ! आणि मग किती वेळ मॉल्स मध्ये फिरून निरर्थक घालवेन माहित नाही! कामाच्या व्यवधानातूनही हे सगळं करायला मला आवडतं. आणि संस्कृती तर जपलीच पाहिजे ना? मग माझ्यावर खाद्यसंस्कृतीसारखी सृजनात्मक गोष्ट जपायची जबाबदारी असेल तर अगदी वॅनिला विथ हॉट चॉकलेट सॉस !
- विभावरी बिडवे