विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २२

15 Jun 2017 21:18:12


 

अवंती : मेधाकाकू, उद्यापासून शाळा सुरू....! आणि पावसाची शाळाही सुरू झालेली आहे चार दिवसांपूर्वीच...!! आणि आता आपली दोघींची शाळा भरली आहे...!

     

मेधाकाकू : अवंती, अलीकडेच आपल्या या म्हणींच्या गप्पांच्या मधेच एक फ्रेंच मनोविश्लेषणवादी सिद्घांतकार जॅक लाकाँ (Jacques Lacan -1901-81) याचे पुस्तक वाचायला घेतले आहे. डॉ कार्ल गुस्ताव यंग याच्या सारखाच हा सुद्धा डॉ सिग्मंड फ्रॉईड या नामवंत मनोविश्लेषकाचा चाहता. या मनोविज्ञान विश्लेषक लेखकाने जगभरातील कुठल्याही संस्कृतीमधील-विविध भाषातीलं प्रचलित गद्य आणि पद्य अशा विविध पारंपरिक रचना, साहित्यकृती आणि त्यामधून समाजाला नकळत जाणवणारे अबोध अर्थ इत्यादींचा विचार केला. याच अभ्यासामध्ये त्याने अशा संहिता आणि वाचक ह्यांच्यातील परस्पर संबंध ह्याचाही अभ्यास मांडला...!! १९५९ मध्ये पॅरिस येथे त्याने ‘नीओ-फ्रॉइडियन’ ( नव-फ्रॉइडवादी ) गटाची स्थापना केली आणि त्याचवेळी त्याने डॉ सिग्मंड फ्रॉईड याच्या सामूहिक अबोध म्हणजेच (कलेक्टिव्ह अन्‌कॉन्शस) या संकल्पनेचा विस्तार करणारे लेखन केले. आता तू म्हणशील इतका वेगळा विषय, मी आज अचानक का घेतलाय आपल्या गप्पांमधे तर, त्याला कारणही तितकेच संयुक्तिक आहे. ते म्हणजे आपल्या पारंपारिक मराठी म्हणी - वाकप्रचार आणि मराठी समाजमन.          

 

अवंती : अरेच्या... मेधाकाकू, असे दिसताय की मी शाळेत वरच्या इयत्तेत गेल्याबरोबर तू या अभ्यासातही वरच्या इयत्तेत घातलेलं दिसताय. सही है यार काकू.. मस्त मस्त..!! म्हणून हा धडा जरा पुढचा आहेसे दिसताय मला. मेधाकाकू, मला सांग, या संहिता आणि वाचक यांचा परस्पर संबंध म्हणजे नक्की काय सांगतोय हा लेखक...??     

   

मेधाकाकू : क्या बात है भीडू... एकदम सही प्रश्न विचारलायस. हा लेखक नेमके तेच सांगतोय जे आपण गेले सहा महिने या विषयाबद्दल बोलतोय. म्हणी आणि वाकप्रचारांचा आपल्या समाजातला-समाजश्रुती मधला संदर्भ आपण शोधतोय.. कालच्या अभ्यासात आपण पहिले की अन्न-धान्य-आहार-जेवण-भोजन ही  आपली प्राथमिक गरज. जगभरातल्या  सगळ्याच संस्कृतींमध्ये सारखीच असणार आहे. अनेक शतकांपासून या विषयातले अनुभवाचे विचार प्रत्येक संस्कृतींमधील रचना आणि साहित्यात नोंदले गेले आहेत, एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे दिले जात आहेत आणि विद्यमान समाजावर याचा निश्चित परिणाम होत असतो. या फ्रेंच मनोविश्लेषणवादी सिद्घांतकार जॅक लाकाँ याने असा विस्तृत विचार मांडला आणि नेमका हाच आपल्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय आहे...!!..आता ही अनेक शतके प्रचलित म्हण काय सांगते या तीन शब्दात...!!  अंतकालापेक्षा मध्यान्ह काल कठीण.

 

अवंती : मेधाकाकू, अंतकाल म्हणजे मृत्यू जवळ येणे... असा अर्थ मला महित्ये पण मध्यान्हकाल म्हणजे काय असेल बरे. काही टोटल लागत नाहीये मला...!!

      

मेधाकाकू : अंतकालापेक्षा मध्यान्ह काल कठीण. आता असे बघ अवंती की, मध्यान्ह काल म्हणजे आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेत भोजनाची- जेवणाची वेळ... तू आजचा आपला कुटुंब व्यवहार पाहू नको. तू साधारण शंभर वर्षे मागे जा ज्या काळात प्रत्येक भारतीय कुटुंब आपल्या मध्यान्ह भोजनाचा म्हणजे दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेत असे. कारण भोजन हे जणू आवश्यक तरीही पवित्र कार्य होते...!! असे भोजन सामूहिक नसावे कारण पुरुष मंडळी कामावर असताना घरातल्या स्त्रिया असे भोजन घेऊन मध्यान्ह काळात त्यांच्या कामाच्या ठिकणी जात असत...!! आता या शब्दाची जोड अंतकाळाशी का जोडली असावी ते आपण बघूया. शेती प्रमुख व्यवसाय होता तरीही आपल्या समाजात, एकत्र कुटुंब व्यवस्थेत, सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या घरांमध्ये रोज मिळणार्‍या मजुरीवरच कुटुंबाची गुजराण होत असे. अशा रोज साथीला असणार्‍या परिस्थितीवर एखादा हताश कुटुंब प्रमुख रोज पुटपुटत असावा. एकदाच येणारे मरण अंतकाल परवडला पण रोज येणारा मध्यान्हकाल नकोरे देवा...!! अवंती आता इथे... जॅक लाकाँ म्हणतात... ती हीच जागा आहे जिथे अनेक शतके, प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची विचार धारणा निर्माण होत असावी. हे आहे मौखिक परंपरेतून आलेले बुद्धिवैभव ग्रंथांमधला ज्ञानसंचय. आपल्या आजच्या वाकप्रचारसारखे आणि मग एकमेकांच्या नकळत, समाजश्रुती आणि वैयक्तिक स्मृतींमधून निर्माण होणारी संपूर्ण समाजाची विचार धारणा. यालाच त्यांनी सामूहिक अबोध म्हणजेच “कलेक्टिव्ह अन्‌कॉन्शस” असा शब्द प्रयोग वापरला आहे. हाच तुझ्या प्रश्नाचा उलगडा म्हणजे “संहिता आणि वाचक यांचा परस्पर संबंध” ...!!                          

 

अवंती : ओहो – ओके ...  मेधाकाकू, जगभर किती विलक्षण प्रवास करतोय आपण या म्हणींच्या-वाकप्रचारांच्या अभ्यासात... पण तुझी एक गोष्ट थोडीशी खटकत्ये आज...सांगू का ??...एरवी तू संत साहित्यातले धृष्टांत नेहमी देतेस आज नेमका हा फ्रेंच लेखक का आठवलाय तुला.

मेधाकाकू : अरेच्या असे आहे का... ओके... मी नक्की सांगेन समजाऊन उद्याच्या गप्पांमधे. पण आधी आजचा अभ्यास आणि मग गप्पा... या वाकप्रचारात सांगितल्या प्रमाणेच...!!         

 

अधी अननं मग तननं.                                                                                  

असे बघ अवंती की, आपल्या या मराठी भाषेच्या अलंकारामधे फक्त सुविचार किंवा मार्गदर्शक तत्वे समाज प्रबोधनासाठी  नोंदवली आहेत इतकेच याचे महत्व नाहीये. तुलना करताना - धृष्टांत देताना - साम्य किंवा भेद दाखवताना किंवा चातुर्य - विवेकाचा सल्ला देताना – योग्य व्यवहार शिकवताना विनोद निर्मिती मिश्किल कोटी निरुपद्रवी पण बोचणारी टीका... अशा सगळ्या छटांचा  वापर या म्हणींच्या रचनेत केलेला आपल्याला दिसतो. या बरोबरच उपमा-रूपक-अन्योक्ति-विरोधाभास-अतिशयोक्ति-अनन्वय-भ्रांतिमान आणि श्लेष असे विविध भाषा अलंकार दर्शन या वाकप्रचारातून आपल्याला होते ज्यातून भावार्थ आणि गूढार्थ संकेत मिळतात. अधी अननं मग तननं, अशी मिश्किल कोटी करणारा हा वाकप्रचार द्वयार्थी सुद्धा आहे. आधी पोटोबा... असे सुचवताना शरीरं आद्यम हे माहीत असून सुद्धा अधी अननं (आधी भोजन) असा सल्ला देतोय. तर वेगळ्या चष्म्यातून पाहणारा पेहलवान म्हणतोय... पठ्ठ्या आधी उत्तम खुराक घ्यावा तरच शक्तिवान शरीराची जोपासना करता येईल...!!                                                                                                    

 

अवंती : मेधाकाकू... एकदम सही आजचा अभ्यास... आज तू माझी उत्सुकता वाढवली आहेस, आता उद्याचा दिवस कधी एकदा उगावतोय असे झालंय मला...!!

 

- अरुण फडके

Powered By Sangraha 9.0