शॉर्ट अॅण्ड क्रिस्प "केवडा"

09 May 2017 12:51:38



आपल्या सगळ्यांच्याच घरात कुणी ना कुणी ज्येष्ठ व्यक्ती ही असतेच. आजी, आजोबा, बाबांचे काका, आईची आत्या किंवा अजून कोणी. त्यांच्या सगळ्यांचीच आठवण करुन देणारा हा लघुपट. म्हातारपण हे एकटं, एकाकी असतं. आणि त्यातून आजच्या धावपळीच्या जगात खरंच ते आणखीच एकाकी होत जातं, हे प्रकर्षाने जाणवून देणारा हा चित्रपट आहे. 

मुलं आपल्या म्हाताऱ्या आई वडीलांना त्यांच्या छोट्या घरात त्रास होवू नये म्हणून एखाद्या स्वतंत्र घरात ठेवतात. (वृद्धाश्रमांचे हे बदललेले स्वरूप). तिथे सर्व सोयी सुविधा असतात, वेळ प्रसंगी अगदी काहीही इमरजंसी असेल तर तशा व्यवस्थाही असतात. नसतो तो संवाद आणि सहवास.
 
मग अशाच एका एकाकी आज्जीला जेव्हा तिचा नातू महीन्यातून एकदा भेटायला येतो, तेव्हा तिला खरंच काय करु काय नको असं होत असेल ना. कित्ती काय बोलायचं असतं, सांगायचं असतं. या लघुपटातील नातू लॅपटॉप, मोबाईल आणि टॅबमध्ये गुंग असतो, पण आज्जीकडे अगदीच दुर्लक्ष करत नाही. ऐकतो, सांगतो, आणि त्याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू सुद्धा आणतो.

ज्योती सुभाष यांनी केलेला आज्जींचा अभिनय खूप सुंदर आहे. त्यांचा अभिनय जीवंत आहे. आणि म्हणूनच तो आपलासा वाटतो. कधी कधी आठवणींची पेटी उघडली की, ती बंद होत नसते. असंच काहीसं या लघुपटात दाखवण्यात आलं आहे. याचं दिग्दर्शन केलं आहे अमेय बकनाळकर यांनी. तर कथा आहे सई लळित यांची. या लघुपटाला विविध फिल्म फेस्टीवल्समध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

तंत्रज्ञान, पैसा, धावपळ या सगळ्यात एक क्षण आपल्या ज्येष्ठांना द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा कदाचित ते फक्त या एका क्षणाच्या संवादासाठीच जगत असतील. 
 
पाहूयात तर मग ही छोटीशी गोष्ट -
 
- निहारिका पोळ
Powered By Sangraha 9.0