लहान मूल जेव्हा एखादे हाव भाव करतं, तेव्हा ते कित्ती गोड, सुंदर आणि निरागस वाटतं नाही. मात्र याच हावभावांना जर वेगळं रूप दिलं, त्यांना मोठ्यांसारखे हावभाव करायला शिकवलं, तर तेच त्यांच्यावर किती विचित्र दिसेल? हे झालं साधं निरीक्षण पण एखाद्या कलेत जर जाणून बूझून लहान मुलांना मोठ्यांसारखं प्रस्तुतीकरण करायला शिकवलं जाईल, त्यांच्यातील निरागसतेला मारून जगाला काय हवंय हे दाखवलं जाईल तर हे किती वाईट दिसेल ना?
तेच होतंय सध्या कलर्स चॅनलवर प्रसारित होणाऱ्या "ढोलकीच्या तालावर" या कार्यक्रमात. खरंतर लहान मुलांचं नृत्य हे त्यांच्या वयाला साजेसं असं असायला हवं. नृत्य ही एक अनुभूती असते. जो पर्यंत एखादा नर्तक आपण काय नृत्य सादर करतोय हे समजू शकत नाही, तो पर्यंत ते प्रेक्षकांना देखील समजणार नाही. मात्र लहान मुलांचं विश्व वेगळं असतं. त्यांच्या विश्वात त्यांना समजेल अशा गाण्यांवर त्यांने नृत्य सादर केल्यास ते भावतं. ते आकर्षकही वाटतं आणि सुंदरही. ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम एक रिअॅलिटी शो आहे, या कार्यक्रमातून लहान मुलींमधील लावणी नृत्याची कला जगासमोर सादर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याला लावणी रिअॅलिटी डान्स शो असंही म्हटलं आहे. मात्र केवळ ५-६ वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर "माघाची ही थंडी" किंवा " या रावजी बसा भावजी" या गाण्यातील भाव दिसले तर ते कसं वाटेल?
लावणी हा नृत्याचा एक प्रकार आहे. लावणी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक महत्वाची कला मानली जाते. लावणी करणाऱ्या महिलांना सन्मान मिळावा, लावणीला अश्लीलतेच्या दृष्टीने नाही तर कलेच्या दृष्टीने बघावं, हे सगळं मान्य आहे. लावणी ही कला म्हणूनच बघितली गेली पाहीजे. मात्र लावणीचा जो भाव आहे, लावणीच्या गाण्यांचे जे शब्द आहेत, त्यावर एका तरुणीने किंवा एका महिलेने नृत्य केल्यास ती त्या भावनांना समजू शकते. कदाचित ती ते सर्व भाव जगलेली असते. एका ५-६ वर्षाच्या मुलीला "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा" या ओळीचा अर्थ कसा समजावून सांगणार? तसंच तिला शिकवणाऱ्या कोरिओग्राफर्स उत्तम लावणी करणाऱ्या आहेत. त्या त्यांना शिकवतीलही की हा भाव चेहऱ्यावर आला पाहीजे, मात्र एखादी चिमुकली ओठ तिरपा करुन डोळा मारताना कशी दिसेल हे तुम्ही या कार्यक्रमात बघूच शकता.
असं म्हणतात कला माणसाला घडवते. त्याचे व्यक्तिमत्व घडवते. इतक्या लहान वयात या मुलींचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जर नृत्यासारख्या पवित्र कलेचा असा वापर केला जाईल तर भविष्यात त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा काय परिणाम होईल हे या मुलींच्या पालकांच्या लक्षात आलेले आहे का?
या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत लावणी साम्राज्ञी शकुंतला नगरकर, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर आणि प्रसिद्ध अभिनेते जीतेंद्र जोशी. या तीनही परीक्षकांच्या प्रतिक्रिया "अरे वाह.. आय हाय हाय.. क्या बात है.. " अशा प्रकारच्या असतात. या कार्यक्रमात हिंदी गाण्यांवरही लावणी सादर करण्यात आली आहे. लावणी करण्याविषयी गैर काहीच नाही. मात्र लावणी ५-६ वर्षाच्या वयाच्या मुलीने करणे गैर आहे. आणि त्याला परीक्षकांनी असे प्रोत्साहन देणे ही गैर आहे.
लहान मुलं हे मातीच्या घड्यासारखे असतात, त्यांना आपण जो आकार देवू ते त्या आकारात घडत जातात. इतक्या कमी वयात या पद्धतीचे नृत्य करणे त्यांच्या कलेसाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी घातक ठरू शकतं. लावणी एक नितांत सुंदर लोककला आहे, मात्र त्यासाठी त्या वयाचं असणं आवश्यक आहे.
केवळ आपलं मूल टी.व्ही. वर दिसेल या आशेने , अपेक्षेने आणि क्रेझने काही पालक आपल्या मुलांना अशा डान्स रिअॅलिटी शोज मध्ये पाठवतात. तिथे त्यांच्या वयापेक्षा कितीतरी प्रमाणात जास्त त्यांना शिकवले जाते. लहान मुलांचा निरागसपणा जपून ठेवयाचा असेल तर योग्य वय आल्याशिवाय त्यांना असे हाव भाव करायला लागू नये याची काळजी पालकांनी घेणे आवश्यक आहे.
लावणी ही एक सुंदर कला आहे, तिच्या कडे सन्मानानीच बघितले पाहीजे मात्र लहान मुलींनी ती कला सादर करणे योग्य नाही. लहान मुलांचे बालपण त्यांच्या निरागस हावभाावंमध्येच असते, त्यांनी तसे नृत्य सादर केल्यासच ते सुंदर दिसते. त्यांच्या या निरागसतेला जपण्यासाठी इतक्यालवकर त्यांच्या माथ्यावर प्रौढत्वाचा टिळा लागू नये इतकंच..
शेवटी सौमित्र गोखले यांनी लिहिलेले शब्द या परिस्थितीत किती चपखल बसतात ना,...
"प्रौढत्वाचा टिळा कशाला निरागसाच्या भाळी"